अजय वाळिंबे

वर्ष १९९४ मध्ये युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया आणि लाइफ इन्शुरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन झालेली अ‍ॅक्सिस बँक ही भारतातील खासगी क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी बँक आहे. बँक मोठय़ा आणि मध्यम-कॉपरेरेट्स, एमएसएमई, कृषी आणि किरकोळ व्यवसाय व्यापणाऱ्या ग्राहकांना आर्थिक सेवा पुरवते. आपल्या विविध सेवा पुरवण्यासाठी बँकेने अ‍ॅक्सिस कॅपिटल, अ‍ॅक्सिस सिक्युरिटीज, अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंड, अ‍ॅक्सिस फायनान्स, ईट्रेड आणि फ्री-चार्ज अशा सहा उपकंपन्या स्थापन केल्या आहेत. या सर्वच कंपन्यांची कामगिरी सरस आहे. सेवा विस्तार करण्यासाठी बँकेने नुकतेच विमा क्षेत्रात प्रवेश करून मॅक्स लाइफ इन्शुरन्समधील आपली गुंतवणूक वाढविली आहे.

गेल्या २६ वर्षांत अ‍ॅक्सिस बँकेने उत्तम प्रगती तसेच विस्तारीकरण केले असून आज बँकेच्या देशभरात ४,५९४ शाखा तर ११,३३३ एटीएम आहेत. बँकेची ओव्हरसीज ऑपरेशन्स आठ आंतरराष्ट्रीय कार्यालयांमध्ये पसरलेली आहेत. सिंगापूर, दुबई आणि गिफ्ट सिटी-आयबीयू येथे बँकेच्या शाखा असून ढाका, दुबई, आबू धाबी, शारजाह येथे प्रातिनिधिक कार्यालये आहेत तर ब्रिटनमध्ये उपकंपनी स्थापन केली आहे.

बँकेने ३१ मार्च २०२१ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांचे लेखापरीक्षित निष्कर्ष जाहीर केले आहेत. गेल्या वर्षभरात बँकेच्या ठेवींमध्ये ९ टक्के वाढ झाली असून कर्ज वितरणात १२ टक्के वाढ झाली आहे. तर नक्त नफ्यात तब्बल ३०५ टक्के वाढ होऊन तो १,६२७ कोटी रुपयांवरुन ६,५८८ कोटींवर गेला आहे. बँकेचे नक्त अनुत्पादित (एनपीए) कर्जाचे प्रमाण ०.७४ टक्क्य़ांवर आले असून निम (नेट इंटरेस्ट मार्जिन) गुणोत्तर देखील ३.५६ टक्क्य़ांवरून ३.७१ टक्क्य़ांवर गेले आहे. एकंदरीत गेले वर्ष कठीण असूनही बँकेने उत्तम कामगिरी करून दाखविली आहे. सध्याचा ट्रेंड पाहता आगामी कालावधीत अ‍ॅक्सिस बँकदेखील ‘आयपीओ’द्वारे तिच्या उपकंपन्यांतील गुंतवणूक कमी करून त्या कंपन्यांचे शेअर्सची शेअर बाजारात नोंद करू शकेल. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून अ‍ॅक्सिस बँक तुमच्या पोर्टफोलियोला झळाळी देऊ शकेल.

अ‍ॅक्सिस बँक लिमिटेड

(बीएसई कोड – ५३२२१५)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ६८५/-

वर्षांतील उच्चांक/ नीचांक : रु. ८००/३३३

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

बाजार भांडवल :

रु. २,०९,९१४ कोटी

भरणा झालेले भागभांडवल :

रु. ६१२.७५ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  १३.५८

परदेशी गुंतवणूकदार      ५१.४३

बँक/ म्यु. फंड/ सरकार    २३.२७

इतर/ जनता     ११.७२

संक्षिप्त विवरण

* शेअर गट     : लार्ज कॅप

* प्रवर्तक       : यूटीआय, एलआयसी, जीआयसी

* व्यवसाय क्षेत्र  :  पाइप्स, टय़ूब्स

* पुस्तकी मूल्य : रु. ३३२

* दर्शनी मूल्य   : रु. २/-

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न : रु. २३.६०

*  पी/ई गुणोत्तर :      २९.२

*  समग्र पी/ई गुणोत्तर : २७.५

*  नक्त एनपीए (अनुत्पादित कर्ज) : ०.३२

*  कासा गुणोत्तर :     ४२%

*  कॅपिटल अ‍ॅडेक्वेसी गुणोत्तर :  १९.३१

*  नेट इंटरेस्ट मार्जिन :  ३.७१%

*  बीटा :      १.६