|| वसंत माधव कुळकर्णी

अ‍ॅक्सिस लाँग टर्म इक्विटी फंड

सर्वाधिक मालमत्ता आणि परतावाही सर्वोत्तम असा अनुभव म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी दुर्मिळच..  हे एवढेच नव्हे तर सर्वात कमी मालमत्ता व्यवस्थापन खर्च हेही याचे वैशिष्टय़. गुंतवणूकदारांना भरभरून देणाऱ्या या करबचतीच्या योजनेविषयी..

अ‍ॅक्सिस लाँग टर्म इक्विटी फंड हा ‘ईएलएसएस फंड’ गटात सर्वाधिक मालमत्ता असलेला आणि गुंतवणूकदारांना चांगला ‘एसआयपी’ परतावा दिलेला फंड आहे. २० सप्टेंबर २०१८च्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार एका वर्षांच्या एसआयपी परताव्याच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर, पाच वर्षांच्या एसआयपी परताव्याच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आणि तीन वर्षांच्या क्रमवारीत बाराव्या क्रमांकावर असलेला हा फंड आहे.

या फंडातील गुंतवणूक वैयक्तिक करदात्यांसाठी आयकराच्या ‘कलम ८० सी’खाली मिळणाऱ्या कर वजावटीस पात्र असून फंडाच्या सुरुवातीपासून मागील १०५ महिने दरमहा ५००० रुपयांची नियोजनबद्ध गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराच्या ५.२५ लाख गुंतवणुकीवर वार्षिक १९.३२ टक्के नफा मिळाला आहे. २० सप्टेंबर २०१८च्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार या गुंतवणुकीचे बाजारमूल्य १२.५७ लाख रुपये होते. ३१ ऑगस्ट रोजी फंडाची मालमत्ता १८,७५२ कोटी रुपये होती. सर्वाधिक मालमत्ता आणि सर्वोत्तम परतावा या दुर्मीळ गोष्टी या फंडातील गुंतवणूकदार अनुभवत आहेत. फंडाचा मालमत्ता व्यवस्थापन खर्च (एक्स्पेन्स रेशो) २.२५ टक्के असून मागील तीन वर्षांत फंडाच्या मालमत्ता व्यवस्थापन खर्चाची टक्केवारी कमी होताना दिसत आहे. ‘सेबी’च्या नवीन आदेशानुसार ५ हजार कोटींपेक्षा अधिक मालमत्ता असल्याने हा फंड सर्वात कमी मालमत्ता व्यवस्थापन खर्च असलेल्या फंड गटात असेल.

अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंड घराण्याचे मुख्य गुंतवणूक अधिकारी (समभाग) जिनेश गोपानी हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. फंडाची पहिली एनएव्ही २९ डिसेंबर २००९ रोजी जाहीर झाली. फंडाच्या सुरवातीच्या काळात फंड घराण्याचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रेश निगम निधी व्यवस्थापन पाहात असत. दरम्यानच्या काळात जिनेश गोपानी फंडाचे सह-निधी व्यवस्थापक झाले. जानेवारी २०१३ पासून गोपानी हे पूर्णपणे निधी व्यवस्थापनाची धुरा समर्थपणे हाताळत आहेत.

फंडाची गुंतवणूक लार्ज कॅप केंद्रित आहे. ३१ ऑगस्टच्या गुंतवणूक विवरणानुसार फंडाच्या गुंतवणुकीत ७०.०५ टक्के लार्ज कॅप, २५.६९ टक्के मिड कॅप, १.७४ टक्के स्मॉल कॅप आणि २.५२ अन्य गुंतवणुका आहेत. गुंतवणूक केल्यापासून किमान तीन ते पाच वर्षे वृद्धिक्षम समभागांचा गुंतवणुकीत समावेश करून दीर्घकाळ ते समभाग राखून ठेवणे अर्थात ‘बाय अँड होल्ड’ हे फंडाचे धोरण आहे. समभागांची निवड करताना कंपनी व्यवस्थापनाच्या आदर्श कामकाज पद्धत हा महत्त्वाचा निकष आहे. आर्थिक आवर्तनांशी निगडित आणि कठोर नियंत्रण असलेली उद्योग क्षेत्रे निधी व्यवस्थापकांनी टाळली आहेत. मारुतीच्या समभागाचा अपवाद वगळता सध्याच्या आघाडीच्या गुंतवणुकात बदल झालेला नाही. फंडाच्या आघाडीच्या दहा गुंतवणुका अनुक्रमे, एचडीएफसी बँक, टीसीएस, कोटक महिंद्रा बँक, पिडिलाइट इंडस्ट्रीज, एचडीएफसी, बजाज फायनान्स, मारुती, गृह फायनान्स, बंधन बँक, अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट अशा आहेत. बँका (२१.२३ टक्के), वित्तपुरवठा (२०.४९ टक्के), सॉफ्टवेअर (१०.३३ टक्के), वाहन उद्योग (७.९९ टक्के), वाहन उद्योगासाठी पूरक उत्पादने (७.८० टक्के) ही सर्वाधिक गुंतवणूक असलेली उद्योग क्षेत्रे आहेत. निधी व्यवस्थापक समभाग निवडीसाठी ‘व्हॅल्यू स्ट्रॅटेजी’चा वापर करतात.

मध्यंतरी फंडाची कामगिरी घसरल्याने फंडाच्या ‘स्टार रेटिंग’मध्ये घसरण झाली होती. फंडाच्या ‘स्टार रेटिंग’चे दास असलेल्या वितरकांनी गुंतवणूकदारांना या फंडाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला. ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड’ यादीत हा फंड आपले स्थान अबाधित राखून आहे. कामगिरी खालावलेल्या काळातसुद्धा या फंडाला ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड’ यादीतून न वगळण्याचा निर्णय फंडाची विद्यमान कामगिरी सुधारल्याने ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड’ संशोधन पद्धतीवर शिक्कामोर्तब झाले.

आयकराच्या ‘कलम ८० सी’खाली मिळणाऱ्या कर वाजावटपात्र गुंतवणुका दीर्घकालीन असाव्यात जेणे करून मिळणाऱ्या मोठय़ा रकमेवर निवृत्तीपश्चात उदरनिर्वाह किंवा दीर्घकालीन वित्तीय ध्येयांची पूर्तता करता येईल. आर्थिक नियोजनात कर नियोजनाकडे लक्ष देणे गरजेचे असते. आयकराच्या ‘कलम ८० सी’खाली वजावट पात्रतेसाठी २० हून अधिक पर्याय उपलब्ध आहेत. करदात्यांची अर्थजाणीव बेताची असल्याने शेअर बाजारात गुंतवणूक नको या सबबीखाली निश्चित उत्पन्न देणाऱ्या योजनांना पसंती दिली जाते. निश्चित उत्पन्न देणाऱ्या योजनांतून बचतीची बेरीज होते. कर वजावटीसाठी केलेल्या बचतीचा गुणाकार करायचा असेल तर ‘ईएलएसएस’ला पर्याय नाही. म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजार जोखमींच्या अधीन असते हे लक्षात घेऊन दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी अ‍ॅक्सिस लाँग टर्म इक्विटी फंडाचा गुंतवणुकीत समावेश करावा.

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)