अजय वाळिंबे

प्रथम बजाज होल्डिंग अँड इन्व्हेस्ट्मेंट्स लिमिटेड (बीएचआयएल) ही काय कंपनी आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या १ डिसेंबर २००० च्या आदेशानुसार बजाज ऑटो लिमिटेडचे विलीनीकरण करण्यात आल्यानंतरची बजाज होल्डिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड ही कंपनी स्थापन झाली. डिमर्जर योजनेनुसार उत्पादन बजाज ऑटो लिमिटेड (बीएएल) कडे हस्तांतरित केले गेले तर विंड फार्मिग व्यवसाय आणि वित्तीय सेवा व्यवसाय यांचा समावेश असलेला धोरणात्मक व्यवसाय उपक्रम बजाज फिनसव्‍‌र्ह लिमिटेड (बीएफएस)कडे देण्यात आला. इतर सर्व मालमत्ता, मालमत्ता, गुंतवणूक आणि पूर्वीच्या बजाज ऑटो लिमिटेडचे दायित्वे आता बीएचआयएलकडे आहेत.

विघटनानंतर, बीएचआयएलचे बजाज ऑटो आणि बजाज फिनसव्‍‌र्हमध्ये प्रत्येकी ३० टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स आहेत. नावाप्रमाणेच बीएचआयएल ही बजाज समूहाची होल्डिंग कंपनी असून तिचा प्रमुख व्यवसाय आणि उद्देश समूहातील शेअर होल्डिंग्सव्यतिरिक्त इतर गुंतवणूक, लाभांश तसेच गुंतवणूक वृद्धी आणि त्यायोगे नफा असा आहे. सप्टेंबर २०२०च्या अहवालानुसार कंपनीकडे बजाज समूहातील प्रमुख कंपन्यांचे शेअर होल्डिंग खालीलप्रमाणे आहे :

> बजाज ऑटो लिमिटेड :        ३५.७७ %

> बजाज फिनसव्‍‌र्ह लिमिटेड :     ४१.६३%

> महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड :     ५१%

> बजाज ऑटो होल्डिंग्स लिमिटेड : १००%

कंपनीने सप्टेंबर २०२० साठी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर केले आहेत. कंपनीने या तिमाहीत १३१.६४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले असून ८००.०८ कोटी समूहातील इतर कंपन्यांचा नफा मिळविला आहे. गेल्या तिमाहीतील कंपनीचा नक्त नफा ८७२.१४ कोटींवर आला आहे (गेल्या वर्षीच्या तिमाहीत १,०२८.६६ कोटी). तर सहामाहीचा नफादेखील १,६९४.९७ कोटींवरून १,५५१.२७ कोटींवर घसरला आहे. इतर क्षेत्रांप्रमाणे वाहन उद्योग आणि बजाज समूहातील कंपन्यांवरदेखील कोविड १९ चा परिणाम झाल्याचे सहामाहीच्या निकालावरून स्पष्ट दिसते. मात्र आगामी कालावधीत करोनाचे सावट दूर झाल्यावर कंपन्यांच्या कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे. सध्या वित्तीय कंपन्या आकर्षक भावात उपलब्ध आहेत आणि बजाज होल्डिंग त्याला अपवाद नाही. पुस्तकी मूल्याहून कमी किमतीत उपलब्ध असलेला हा शेअर मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटतो.

आजच्या परिस्थितीत ‘माझा पोर्टफोलियो’मध्ये सुचविलेले शेअर्स हे तुम्हाला खालच्या भावात मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्यात करावी.

बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्ट्मेंट्स लि.

(बीएसई कोड – ५००४९०)

शुक्रवारचा बंद भाव : रु.  २,४२५.६०

लार्ज कॅप

प्रवर्तक :                                                         बजाज समूह

व्यवसाय :                                                       एनबीएफसी

बाजार भांडवल :                                               रु. २६,९९५ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :                           रु.  ३,९५०/ १,४६०

भागभांडवली भरणा : रु.                                          १११.२९ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक                            ४९.९४

परदेशी गुंतवणूकदार      १५.०७

बँक/ म्यु. फंड/ सरकार    २.७०

इतर/ जनता                    ३२.२०

पुस्तकी मूल्य :                            रु. २८४५

दर्शनी मूल्य :                                रु. १०/-

लाभांश :                                        ४००%

प्रति समभाग उत्पन्न :               रु.२५५.६५

पी/ई गुणोत्तर :  —

समग्र पी/ई गुणोत्तर :                  —

डेट इक्विटी गुणोत्तर :                ००

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :        ३३९

रिटर्न ऑन कॅपिटल :                 १२.२

बीटा :                                         ०.८२

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

२. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.