|| अजय वाळिंबे

वर्ष १९८७ मध्ये महावीर प्रसाद पोद्दार यांनी स्थापन केलेली बालकृष्ण इंडस्ट्रीज ही टायरचे उत्पादन करणारी सर्वसामान्य कंपनी नव्हे. कारण ही कंपनी ऑफ-हायवे टायर्सचे उत्पादन करते. गेल्या ३० वर्षांत कंपनीने मोठा पल्ला गाठला असून आज बालकृष्ण इंडस्ट्रीजचे (बीकेटी) औरंगाबाद, भिवडी, डोंबिवली, चोपंकी आणि भुज येथे उत्पादन प्रकल्प आहेत. या पाच कारखान्यांमधील उत्पादने ही माइिनग, औद्योगिक, शेती व बागकाम यासाठी वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट वाहनासाठी उपयोगी ठरतात.

कंपनी जेसीबी, जॉन डीअर आणि सीएनएच इंडस्ट्रियलसारख्या कंपन्यांसाठी ओईएम विक्रेता असून सध्या जागतिक ऑफ-द-रोड टायर क्षेत्रात सुमारे ६ टक्के बाजार हिस्सा बालकृष्ण इंडस्ट्रीजचा आहे. कंपनीची उत्पादने प्रामुख्याने उत्तर अमेरिका आणि युरोपमधील बदलणाऱ्या बाजारपेठेला पूरक आहेत. जगभरातील सुमारे १३० देशांत कंपनी आपली उत्पादने विकते. युरोप आणि उत्तर अमेरिकेत कंपनीच्या चार उपकंपन्या आहेत.

मार्च २०१९ साठी संपलेल्या आíथक वर्षांकरिता कंपनीने ५,२४४.५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ७३९.१९ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. सध्या औद्योगिक, जागतिक आणि शेअर बाजारातील मंदीला अनुसरून कंपनीच्या शेअरची वाटचाल चालू आहे. त्यामुळे ५२ आठवडय़ांच्या तळाशी असलेला हा शेअर अजूनही खाली जाऊ शकेल. उत्तम शेअर्स खरेदी करण्याची हीच संधी असल्याने दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून बालकृष्ण इंडस्ट्रीजचा जरूर विचार करावा.

सध्या शेअर बाजारातील वातावरण कुठल्याही गुंतवणूकदारासाठी चिंतेचे वाटावे असेच आहे. साधारण १० वर्षांपूर्वी म्हणजे २००८ मध्येदेखील अशीच परिस्थिती होती. त्या वेळी हिंमत दाखवून ज्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली त्यांना भरपूर फायदा झाला. अर्थात संयम आणि योग्य वेळ या शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी गुरुकिल्ल्या आहेत. ‘माझा पोर्टफोलियो’ सदरातून जे शेअर्स सुचविले जातात तेसुद्धा सध्या योग्य वेळ आणि संधी पाहूनच खरेदी करावेत.