’ अजय वाळिंबे

बँको प्रॉडक्ट्स (इंडिया) लि.

(बीएसई कोड – ५०००३९)

शुक्रवारचा बंद भाव : रु. १७१/-

वर्षांतील उच्चांक/ नीचांक : रु. १७९ / ६६

बँको प्रॉडक्ट्सची स्थापना सुमारे ५६ वर्षांपूर्वी म्हणजे १९६१ मध्ये झाली. वाहनांसाठी आवश्यक असलेली इंजिन कूलिंग सिस्टम आणि इंजिन सीलिंग सिस्टम बनवणारी ती भारतातील एक अग्रगण्य कंपनी मानली जाते. बँको प्रॉडक्ट्स (इंडिया) लिमिटेड देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात इंजिन कूलिंग मॉडय़ूल्स आणि ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक अनुप्रयोगांसाठी प्रणाली तयार करतात आणि पुरवतात. सरकारमान्य स्टार एक्सपोर्ट हाऊस असलेल्या बँको प्रोडक्ट्सचे भारतात बडोदे येथे दोन तर जमशेदपूर, रुद्रपूर, जाहिराबाद आणि भरूच येथे अद्ययावत कारखाने/ उत्पादन केंद्रे आहेत. बडोदे येथील युनिट १०० टक्के निर्यात प्रधान प्रकल्प आहे. कायम संशोधन आणि गुणवत्तेवर भर देणाऱ्या या कंपनीने २०१० मध्ये नेदरलँडमधील एनआरएफ ही कंपनी ताब्यात घेऊन युरोपमध्ये पाय रोवले. १९२७ पासून अ‍ॅल्युमिनियम आणि तांब्याचे रेडिएटर बनवणारी ही कंपनी जगभरात आपल्या ‘एनआरएफ’ या ब्रँड नावाने प्रसिद्ध आहे. एनआरएफचे युरोपमध्ये तीन कारखाने असून युरोप आणि अमेरिकेत ११ गोदामे आणि वितरण केंद्रेदेखील आहेत. बँको आणि एनआरएफ या दोन महत्त्वाच्या ब्रँडमुळे ओळखली जाणारी बँको प्रॉडक्ट्स अनेक देशांत आपल्या उत्पादनांची निर्यात करते.

केवळ वाहन उद्योगच नव्हे तर इतर औद्योगिक आणि इंजिनीयरिंग उत्पादनांसाठी कंपनी आपली उत्पादने पुरवते. कंपनीच्या प्रमुख ग्राहकांत अशोक लेलँड, बीईएमएल, भारतीय रेल्वे, कॅटरपिलर, कमिन्स, आयशर, एस्कॉर्ट्स, गोदरेज, टाटा, टीव्हीएस, मित्सुबिशी, फोर्स मोटर्स, किर्लोस्कर, जॉन डियर, महिंद्र, हार्ले डेव्हिडसन, जेसीबी इ. नामवंत कंपन्यांचा समावेश करता येईल. डिसेंबर २०२० साठी संपलेल्या नऊमाहीकरिता कंपनीने ४३५.८८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ५२.४६ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. तर डिसेंबरच्या तिमाहीत १९६.६३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २८.१९ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तिमाहीच्या तुलनेत तो तब्बल १७६ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीचे यंदाच्या आर्थिक वर्षांचे तसेच चौथ्या तिमाहीचे निकाल लवकरच जाहीर होतील. हे निकाल अभ्यासून गुंतवणूकदारानी खरेदीचे धोरण ठरवावे.

मात्र सध्या वाहन क्षेत्राला आणि वाहन पूरक व्यवसायाला बरे दिवस आहेत तसेच आपल्या गुणवत्तेच्या जोरावर कायम उत्तम कामगिरी करून दाखवणारी तसेच अत्यल्प कर्ज असलेली बँको प्रॉडक्ट्स आगामी कालावधीत वार्षिक १५ ते २० टक्क्य़ांपर्यंत वाढ दाखवू शकेल.

बाजार भांडवल : रु. १,२३० कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. १४.३० कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक                   ६७.८८

परदेशी गुंतवणूकदार         ०.२६

बँक/ म्यु. फंड/ सरकार       ०.०२

इतर/ जनता               ३१.८४

संक्षिप्त विवरण

* शेअर गट               : मायक्रो कॅप

* प्रवर्तक                 : मेहुल पटेल

* व्यवसाय क्षेत्र            : ऑटो अ‍ॅन्सिलरी

* पुस्तकी मूल्य            : रु. १०८

* दर्शनी मूल्य             : रु. २/-

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :   रु. १५.७६

*  पी/ई गुणोत्तर :         ११

*  समग्र पी/ई गुणोत्तर :    ३३.१

*  डेट इक्विटी गुणोत्तर :    ०.१२

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : ६१.६

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड :       १३.१

*  बीटा :                ०.९

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.