२०१३ मध्ये सेन्सेक्सने ऐतिहासिक उच्चांक नोंदविला. वर्षअखेरही मुंबई निर्देशांकाने २०१२ च्या तुलनेत ८.५ टक्के वाढ नोंदविली. मात्र गेले वर्षभर चर्चेत राहिलेल्या बँकिंग क्षेत्राचा निर्देशांक मात्र ९.९२ टक्क्यांनी घसरला.
बाजारात सूचिबद्ध बँकांच्या समभागांवर नजर टाकल्यास लक्षात येईल की सरकारी, सार्वजनिक, राष्ट्रीयकृत बँकांच्या समभाग मूल्यावर जबरदस्त दबाव राहिला. अर्थात त्यामागे भीती ही या बँकांच्या मालमत्ता गुणवत्तेबाबतची होती. सरकारद्वारे बाजारभावापेक्षा कमी दराने बँकांमध्ये सरकारी भांडवल ओतण्याच्या संकेताचाही त्यावर परिणाम झाला.
विद्यमान आर्थिक वर्ष संपण्यास अद्याप एक तिमाही आहे. मात्र २०१३-१४ च्या पहिल्या तिमाहीपासूनच बँकांच्या वाढत्या थकित कर्जाची (एनपीए) चर्चा तिसऱ्या फळीतील नव्या बँक परवाने इतकीच झाली. मोठ-मोठय़ा कंपन्यांचे वाढत्या बुडित/थकित कर्जाने बँकांच्या मालमत्तेवर तसेच त्याच्या समभाग मूल्यावरही विपरित परिणाम झाला. आणि यातूनच गेले वर्षभर बँकांचे समभाग किमान पातळीवर लोळताना दिसले.
यूनियन बँक ऑफ इंडिया (-५२%), बँक ऑफ इंडिया (-३१%), पंजाब नॅशनल बँक (-२८%), स्टेट बँक ऑफ इंडिया (-२६%) यांचे समभाग मूल्य कमालीचे खाली आले. तुलनेने खासगी क्षेत्रातील येस बँक (२०%), कोटक महिंद्र बँक (१२%) यांच्या समभाग मूल्यात वाढ नोंदली गेली.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे पुस्तकी मूल्याशी गुणोत्तर (P/BV ) हे एक टक्क्यापेक्षाही खाली आले. P/BV म्हणजे समभागाच्या पुस्तकी मुल्याच्या तुलनेत त्या समभागाचे (समभाग मूल्य) बाजार भावाचे प्रमाण आहे.
विद्यमान २०१३-१४ या आर्थिक वर्षांत ३४ बँकांपैकी (सार्वजनिक, खासगी) सात बँकांचे पुस्तकी मूल्याशी गुणोत्तर सरासरीच्या वर आहे. यामध्ये एचडीएफसी बँक (४.४ पट), कोटक महिंद्र बँक (३.२ पट), इंडसइंड बँक (३.३ पट), येस बँक (१.९ पट), आयसीआयसीआय बँक (१.७ पट) आणि आयएनजी वैश्य बँक (१.६ पट) यांचा उल्लेख करता येईल.
एक टक्क्योपक्षा ज्या बँकांचे सातत्याने पुस्तकी मूल्याशी गुणोत्तर एक टक्क्यापेक्षाही कमी राहिले त्यात बँक ऑफ महाराष्ट्र (०.८ पट), यूनियन बँक ऑफ इंडिया (०.७ पट), बँक ऑफ इंडिया (०.८ पट) यांचे नाव घ्यावे लागेल. तर सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँक व स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे पुस्तकी मूल्याशी गुणोत्तर २०१३ मध्ये एक टक्क्यापेक्षा अधिक राहिले आहे.
बँक क्षेत्रात पुस्तकी मूल्याशी गुणोत्तर अधिक रक्कम प्रमाणात निधी उभारण्याचे मोठे आव्हान आहे. अशावेळी वाढत्या बुडित कर्जावर नियंत्रण हीदेखील महत्त्वाची बाब बनते. या दोन्ही दृष्टीने खासगी बँका सकारात्मक म्हणायला हव्यात. तसे सार्वजनिक बँकाबाबत नाही. उलट या क्षेत्रातील समभागांवर तर सातत्याने किंमत दबाव निर्माण झालेला दिसतो. तेव्हा चालू वर्षांत हे क्षेत्र आणि पर्यायाने सार्वजनिक बँकांचे समभाग मूल्य सुधारण्याची अधिक शक्यता दिसते.
एकूण सेन्सेक्स वधारता राहिला असताना २०१३ मध्ये बँकेक्स मात्र रोडावला. वाढत्या थकित कर्जापोटी करावे लागणाऱ्या आर्थिक तरतुदीचे फुगलेले आकडे चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या दोन तिमाहीतून ठळकपणे दिसले. त्यानंतर निवडक अशा बँकांमध्ये सरकारी भांडवल ओतण्याच्या चर्चेने संबंधित बँकांचे समभाग मूल्य खालच्या पातळीवर आले. नव्या वर्षांतील गुंतवणुकीसाठी या बँकांच्या पुस्तकी मूल्याशी गुणोत्तरावर नजर फिरविण्यास हरकत नाही.