कौस्तुभ जोशी

आर्थिक अरिष्टाची मालिका सुरू झाली आणि अर्थव्यवस्थेचे चक्र रुळावरून घसरले की, आर्थिक मंदी आली असे आपण म्हणतो. या सगळ्याची सुरुवात होण्यासाठी एक ‘तात्कालिक कारण’ असते. एकविसाव्या शतकातील पहिल्या आर्थिक अरिष्टाची सुरुवात अकरा वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यात झाली. तात्कालिक कारण होतं अमेरिकेतील बलाढय़ अशा ‘लेहमन ब्रदर्स’ या वित्तसंस्थेच्या दिवाळखोरीचे. एखादी वित्तसंस्था दिवाळखोरीत जाते म्हणजे काय होते? त्यांनी लोकांकडून घेतलेले पैसे परतफेड करण्याची त्यांची क्षमता घसरते? लोकांनी त्यांच्याकडे पसे ठेवू नयेत अशी त्यांची विश्वासार्हता कमी होते? काय झालं असेल ‘लेहमन ब्रदर्स’च्या बाबतीत?

लेहमन ब्रदर्स : इतिहास

जर्मनीतून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या लेहमनबंधूंनी एक जनरल स्टोअर्स म्हणून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. कालानुरूप व्यवसायवृद्धी झाली, वेगवेगळ्या क्षेत्रांत कंपनी आगेकूच करू लागली. एक नामांकित वित्तसंस्था म्हणून लेहमन ब्रदर्स ही वॉल स्ट्रीटवर कार्यरत होती. अमेरिकेत विसाव्या शतकाच्या अखेरीपासून वित्त क्षेत्रांमध्ये धुमाकूळ सुरू होता. रिअल इस्टेट उद्योग, बँका आणि वित्तसंस्था यांच्या आपापसातील सुदृढ संबंधातून(?) एक नवी व्यवस्था निर्माण होत होती! एखाद्या माणसाची गृहकर्ज घेण्याची ऐपत आहे का? गृहकर्ज घेतलं असेल तर ते पुन्हा फेडता येईल अशी भविष्यकालीन स्थिती आहे का? त्याची नोकरी, उद्योग, पशाचा पुरवठा हा निश्चित आहे का? याचा फारसा विचार न करता गृहकर्जे अक्षरश: वाटली गेली!

वर्ष २००७ नंतर अमेरिकेतील गृहकर्जाचे हप्ते परवडू न शकणाऱ्या कुटुंबांनी दिवाळखोरी जाहीर करायला सुरुवात केली. त्यांनी हप्ते भरणे बंद केले, त्यामुळे गृहकर्ज देणाऱ्या कंपन्यांमध्ये हल्लकल्लोळ उडाला.  अमेरिकेतील अनेक वित्तसंस्थांनी डेरिव्हेटिव्ह उत्पादने बाजारात आणली. जी प्रत्यक्ष अ‍ॅसेट नाहीत त्याचे कर्जात रूपांतर करायचे आणि ते प्रत्यक्षात तिसऱ्यालाच विकायचे असेसुद्धा उद्योग सुरू झाले. सुदैवाने भारतातील रिझव्‍‌र्ह बँकेच्या कडक धोरणामुळे मागच्या दशकात अशी डेरिव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स आपण आणली नव्हती हे मुद्दाम नमूद करायला हवे! २००३ सालानंतर युद्धाचे ढग हळूहळू दूर झाले आणि अमेरिकेने अर्थव्यवस्थेत धुगधुगी निर्माण करण्यासाठी बाजारात पसा ओतायला सुरुवात केली. हा पसा कुणाकडे जातोय याचे भान बाळगले पाहिजे हे अर्थसौजन्य पाळले गेले नाही व याचा परिणाम व्हायचा तोच झाला. स्वस्त पतपुरवठा (कर्जपुरवठा सुलभ व्हावा म्हणून मुद्दाम व्याजदर कमी ठेवणे.) हा भलताच महाग ठरला! जो पैसा एके काळी अमेरिकेच्या बाजारांमध्ये सोन्याचे दिवस दाखवत होता त्याच पैशाने अमेरिकी गुंतवणूकदारांना अस्मान दाखवले.

जानेवारी २००८ मध्ये बेअर स्टर्न हे दोन हेज फंड कोसळले आणि अर्थव्यवस्थेत सगळं आलबेल नक्कीच नाही याची खात्री पटली. त्यावर शिक्कामोर्तब झालं ते १५ सप्टेंबर २००८ रोजी ६०० अब्ज डॉलर एवढी प्रचंड मालमत्ता असलेल्या लेहमन ब्रदर्सने दिवाळखोरी जाहीर केली तेव्हा.

‘लेहमन क्रायसिस’ ही नवी संज्ञाच अर्थशास्त्राला यानिमित्ताने मिळाली असे म्हणता येईल!

‘लेहमन क्रायसिस’मधून आपण काय शिकलो?

अर्थव्यवस्थेमध्ये कर्जाचा पुरवठा वाढता राहावा म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेने सतत व्याजदर कमी ठेवावेत, ही अपेक्षा कितपत योग्य आहे?  सरकारी खर्च आणि सरकारी उत्पन्न यातील संतुलन बिघडत जाणे आणि रिझव्‍‌र्ह बँकेला सरकारच्या चुकांना सावरून घेण्यासाठी वापरले जाणे हे कितपत योग्य आहे?

अमेरिकेत ‘लेहमन क्रायसिस’नंतर जी आर्थिक संकटांची मालिका सुरू झाली तसले काही आपल्याकडे झाले तर आपण संस्थात्मकरीत्या या सगळ्याचा सामना करू शकतो का? सरकार आणि मध्यवर्ती बँक यांच्यात योग्य समन्वय आहे का?

व्यवस्थेत पसा अधिक झाला तर तो पचवता यायला हवा! समर्थानी म्हणून ठेवलेच आहे.. घासांमागे घास घातला, अवकाश नाही चावायला,  अवघा बोकणा भरिला पुढे कैसे!

(लेखक वित्तीय नियोजनकार, अर्थशास्त्राचे प्राध्यापक)

joshikd28@gmail.com