भालचंद्र यशवंत जोशी

सध्याच्या करोना साथीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांनाच आपली आर्थिक उद्दिष्टे, गुंतवणूक आणि परतावा या सगळ्या बाबींचा फेरआढावा घेण्याची गरज आहे. अस्थिर सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, म्हणूनच आजच्या लेखात आर्थिक वर्तन (Behavioural Finance) या पैलूशी ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

जेव्हा एका गुंतवणूकदाराला त्याच्या गुंतवणुकीवरील संभाव्य उत्पन्नापेक्षा प्रत्यक्ष उत्पन्न कमी मिळते, तेव्हा संभाव्य उत्पन्न आणि प्रत्यक्षातील उत्पन्न यातील फरक त्याच्या आर्थिक वर्तनामुळे होतो. या प्रकारच्या वर्तणुकीला ‘वर्तन अंतर’ किंवा ‘वर्तनातील दरी’ (Behavioural Gap) अशी संज्ञा दिली गेली आहे.

हे शास्त्र असे मानते की, व्यक्तीवरील मानसशास्त्रीय प्रभाव आणि पूर्वग्रह हे गुंतवणूकदाराच्या आर्थिक सवयी निश्चित करीत असतात. तथापि, सर्व गुंतवणूकदारांच्या एकत्रित आर्थिक वर्तनातील विसंगतीमुळे सुद्धा बाजारात तीव्र चढउतार होतो. या विसंगतीला ‘वर्तनातील दरी’ असे संबोधण्यात आले आहे.

वित्तीय सेवा उद्योगातील आर्थिक वर्तणुकीशी संबंधित विषयावर मोठय़ा प्रमाणात या पूर्वी अभ्यास झाला आहे. आर्थिक सल्लागार, निधी व्यवस्थापकांचे आर्थिक वर्तन अनेकदा स्वत:च्या पूर्वग्रहांमुळे बाधित झालेले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्या या वर्तनातील दरीमुळे गुंतवणूकदारांच्या परताव्यावर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

गुंतवणुकीचा शिस्तबद्ध दृष्टिकोन, गुंतवणूकदारांच्या भावना आणि त्यांनी घेतलेले आर्थिक निर्णय या दरम्यान असलेली दरी बुजवण्यासाठी आर्थिक सल्लागार किंवा आर्थिक नियोजक खूपच मदत करू शकतात. आर्थिक वर्तनातील दरीमुळे झालेल्या सर्वसामान्य चुका सुधारण्यास तुमच्या आर्थिक सल्लागाराची मदत होऊ शकते आणि त्यामुळे वेगवेगळ्या बाजार परिस्थितीत केले जाणारे मालमत्ता विभाजन आणि फंड निवड करणे सोपे जाते. गुंतवणूकदाराने त्याच्या आर्थिक उद्दिष्टांचे विश्लेषण केले पाहिजे आणि आपल्या आर्थिक लक्ष्यानुसार गुंतवणुकीची योजना आखली पाहिजे जेणेकरून आर्थिक नियोजन, गुंतवणुकीचा सल्ला आणि आर्थिक उद्दिष्ट यामधील फरक जाणून घेता येईल. त्यामुळे गुंतवणुकीतील बाजारातील परिस्थितीचा वर्तनात्मक अंतराशी संबंध जोडण्यास मदत होऊ शकेल.

थोडक्यात, वर्तणूकविषयक अर्थशास्त्र म्हणजे मानसशास्त्र आणि वित्त यांचा एकत्रित अभ्यास आहे, कारण ते व्यक्ती आणि संस्थांच्या आर्थिक परिणामामागील निर्णय प्रक्रियेशी संबंधित आहे. आर्थिक वर्तन हे वित्तीय विचारांसह एकत्र करून आर्थिक वर्तनात गतिशीलता प्राप्त करण्यास मदत होऊ शकते.

आर्थिक गुंतवणुकीच्या नियोजन प्रक्रियेत आर्थिक वर्तन (Behavioural Finance) आणि ‘वर्तनातील दरी’ (Behavioural Gap) हे महत्त्वाची भूमिका बजावतात. आज, ज्याला हे वर्तणूक विज्ञान माहीत आहे आणि समजले आहे तो यशस्वीपणे आर्थिक नियोजनामध्ये त्याचा योग्य प्रकारे वापर करू शकतो की, जेणेकरून आपली आर्थिक उद्दिष्टे ठरावीक कालावधीत साध्य करता येतील.

म्युच्युअल फंडाची गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे, सर्व योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully

(लेखक गेली २७ वर्षे बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्रात सक्रिय कार्यरत असून, म्युच्युअल फंड कंपनीच्या गुंतवणूकदार सेवा आणि ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख आहेत.)