01 April 2020

News Flash

अर्थ वल्लभ : तारांकित सुधारणेचा संभाव्य लाभार्थी

२०१६-१७ दरम्यान गुंतवणुकीत केलेल्या बदलांचा परिणाम आता दिसून येत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

वसंत कुलकर्णी

एलआयसी एमएफ लार्जकॅप, जो पूर्वी एलआयसी एमएफ ग्रोथ फंड या नावाने ओळखला जात होता. या फंडाने मागील वर्षभरात १८.८६ टक्के वार्षिक परतावा दिला असून लार्जकॅप गटात हा फंड दिनांक ८ नोव्हेंबरच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार तिसऱ्या क्रमांकावर, तर एक वर्षांच्या ‘एसआयपी’ परताव्यात लार्जकॅप गटात चौथ्या स्थानी असून त्याने २१.५२ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. तीन वर्षे ‘एसआयपी’ परताव्यात हा फंड लार्जकॅप गटात तिसऱ्या क्रमांकावर असून वार्षिक १०.७१ टक्के, तर पाच वर्षे ‘एसआयपी’ परताव्यात लार्जकॅप गटात हा फंड वार्षिक ९.०७ टक्के परताव्यासह अकराव्या स्थानी आहे. एकरकमी गुंतवणुकीत पाच वर्षांच्या कालावधीत बाराव्या क्रमांकावर असलेल्या या फंडाने मागील सहा वर्षे प्रत्येक तिमाहीत आपल्या मानदंडापेक्षा सरस कामगिरी केली आहे. बहुसंख्य लार्जकॅप फंड मागील वर्षभरात आपल्या मानदंडापेक्षा सरस कामगिरी करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत असताना निधी व्यवस्थापकांच्या सक्रिय व्यवस्थापनामुळे फंडाची कामगिरी वाखाणण्याजोगी राहिली आहे. बाजाराच्या कलानुसार फंडाच्या नक्त मालमत्ता मूल्यात चढ-उतार होतच असतात; परंतु दिवसेंदिवस फंड गटातील अन्य फंडांपेक्षा कामगिरी सुधारणा दीर्घकाळ होत राहून गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा देणारा हा फंड ठरला आहे. त्यामुळे या फंडाच्या तारांकनात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

सचिन रेळेकर यांची ५ मार्च २०१५ पासून या फंडाचे निधी व्यवस्थापक म्हणून नेमणूक झाली होती. त्यांना फंड घराण्याचे मुख्य समभाग गुंतवणूक अधिकारी म्हणून बढती मिळाल्यानंतर ३१ ऑक्टोबर २०१९ पासून सचिन रेळेकर यांच्या साहाय्याला रितू मोदी यांची सह-निधी व्यवस्थापक म्हणून फंड घराण्याने नेमणूक केली आहे. सचिन रेळेकर यांनी फंडाचे निधी व्यवस्थापक म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर फंडाच्या रणनीतीत बदल झाले. हे बदल झाल्यानंतर फंडाची कामगिरी खालावली. २०१६-१७ दरम्यान गुंतवणुकीत केलेल्या बदलांचा परिणाम आता दिसून येत आहे. आर्थिक वर्ष २०१८ च्या तिसऱ्या तिमाहीपासून फंडाच्या कामगिरीत सुधारणा होऊ लागली. या फंडाच्या लार्जकॅप गटातील क्रमवारीत हा फंड प्रत्येक तिमाहीत सुधारणा दाखवत होता. जानेवारी-मार्च २०१९ या तिमाहीत फंडाची कामगिरी स्थिरावली. जुलै-सप्टेंबर २०१९ तिमाहीत पुन्हा फंडाची कामगिरी उंचावल्याने हा फंड क्रमवारीत अग्रस्थानी राहिला. निधी व्यवस्थापकांनी संतुलित रणनीती सोडून, आक्रमक रणनीती अवलंबली. समभागकेंद्रित आक्रमक गुंतवणूक केल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.

मुख्यत: निधी व्यवस्थापकांनी तीन पलूंमध्ये बदल केले:

एकाग्रता : मागील तीन वर्षांत या फंडाच्या गुंतवणुकीत २३ ते २७ समभागांचा समावेश राहिला आहे. आघाडीच्या पाच गुंतवणुका पोर्टफोलिओच्या ३५ ते ३८ टक्के आणि आघाडीच्या दहा गुंतवणुका ६२ ते ६८ टक्के राहिल्या आहेत. एचडीएफसी बँक, कोटक मिहद्र बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स आणि बजाज फिनसव्‍‌र्ह हे सर्वाधिक गुंतवणूक असलेले समभाग आहेत. मागील तीन वर्षांत हे पाच समभाग फंडाच्या गुंतवणुकीतील आघाडीच्या कंपन्या राहिल्या आहेत. जरी फंडाने समभागकेंद्रित गुंतवणुका केल्या तरी फंडाच्या शेपटाकडील (तळाच्या) गुंतवणूक कायम बदलत राहिल्या आहेत. निधी व्यवस्थापक कायम समाधानकारक उच्च व्यवस्थापकीय नीतिमत्ता असलेल्या कंपन्यांच्या शोधात असल्याचे दिसते.

मालमत्ता विभाजन : सेबीच्या फंड सुसूत्रीकरणाआधी हा फंड एलआयसी एमएफ ग्रोथ या नावाने ओळखला जात असे. हा फंड मिडकॅपकडे झुकलेला होता. सुसूत्रीकरणानंतर फंड घराण्याने फंडाचा समावेश लार्जकॅप गटात केल्याने फंडाच्या गुंतवणुकीत सेबीच्या नवीन वर्गीकरणानुसार किमान ८० टक्के लार्ज कॅप समभागांचा समावेश करणे गरजेचे होते. एप्रिल २०१८ पासून फंडाच्या गुंतवणुकीतून मिडकॅप मात्रा कमी करीत लार्जकॅप समभागांचा समावेश केला गेला. हे करत असताना अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट यांसारख्या मिडकॅप समभागाची मात्रा वाढवत ताज्या उपलब्ध आकडेवारीनुसार ४.१४ टक्क्यांवर नेली. परिणामी फंडाची कामगिरी बलाढय़ सुधारली. या फंडाने समानधर्मी एचडीएफसी टॉप १००, आयसीआयसीआय प्रू. ब्लूचिप, यूटीआय मास्टरशेअर, फ्रँकलिन इंडिया ब्ल्यूचिपसारख्या मोठी मालमत्ता असलेल्या फंडांना या कालावधीत परताव्याच्या आकडेवारीत मागे टाकले.

रणनीतीविषयक दृष्टिकोन – थोडय़ाफार गुंतवणुका एखाद्या घटनेवर किंवा अपेक्षित धोरणात्मक बदलांवर विसंबून केल्या जातात. या प्रकारच्या गुंतवणुकांचे यश निधी व्यवस्थापक आणि त्याला मदत करणारे समभाग संशोधकांचे चातुर्य आणि कसब यावर अवलंबून असते. मिडकॅपमधून बाहेर पडताना रोकड समतुल्य गुंतवणुका वाढवीत योग्य पातळीवर योग्य समभागांचा समावेश करण्यावर भर दिला. उदाहरणार्थ, सध्या तीन टक्क्यांच्या जवळपास असलेल्या मारुती सुझुकीचे गुंतवणुकीतील प्रमाण एका वर्षांपासून कमी करीत आणले आहे. मारुती सुझुकीच्या समभाग गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक नसल्याने समभागाचा बाजारभाव शिखरावर असल्यापासून मारुती सुझुकीमध्ये नफावसुली सुरू केली. नंतर टप्प्याटप्प्याने गुंतवणूक कमी केली. कंपनी किंवा उद्योग क्षेत्रात नफ्याची संभाव्यता दिसते तिथे ती संधी, वेळ योग्य प्रकारे व्यवस्थापित करण्यात निधी व्यवस्थापक यशस्वी झाल्याचे दिसते.

फंडाच्या गुंतवणुकीत समभागकेंद्रित जोखीम स्वीकारण्याचे धोरण असूनही पोर्टफोलिओत खरेदी-विक्री अन्य फंडांच्या तुलनेत कमी आहे. या फंडाचे प्रमाणित विचलन (स्टँडर्ड डेव्हिएशन),जे फंडाची अस्थिरता मोजण्याचे एक माप आहे. समानधर्मी लार्जकॅप फंडांच्या सरासरीपेक्षा कमी आहे. यामुळे जोखीम-समायोजित परतावा निर्मितीस कारणीभूत ठरते. मागील एका वर्षांच्या चलत परताव्याच्या आधारे, फंडाचा जोखीम-समायोजित परताव्याच्या तुलनेत एलआयसी एमएफ लार्जकॅप तिसऱ्या क्रमांकावर आहे. एलआयसी एमएफ लार्जकॅप फंड सामान्य जोखीम स्वीकारून दीर्घ मुदतीत (५ वर्षे किंवा अधिक) समानधर्मी फंडाच्या सरासरीहून अधिक परताव्याच्या शोधात असलेले गुंतवणूकदार या फंडाचा विचार करू शकतात.

सामान्यत: ‘पोर्टफोलिओ बीटा’ निर्देशांकाच्या तुलनेत फंडाची कामगिरी निश्चित करीत असताना प्रमाणित विचलन एखाद्या गुंतवणुकीची अस्थिरता सांख्यिकी पद्धतीने मोजते. गुंतवणुकीचा एका मानदंडाशी परतावा मोजण्याऐवजी प्रमाणित विचलन एखाद्या गुंतवणुकीच्या वैयक्तिक परताव्याची (उदाहरणार्थ रोजची एनएव्ही) त्याच कालावधीच्या निर्देशांकाच्या सरासरी परताव्याच्या तुलनेत एका विशिष्ट कालावधीसापेक्ष तुलना केली जाते. गुंतवणुकीच्या सरासरी परताव्यापासून जितके प्रमाणित विचलन कमी तितका फंड अधिक सुरक्षित समजला जातो. मागील सहा तिमाही तारांकित सुधारणेसाठी आवश्यक असलेल्या या महत्त्वाच्या निकषांवर फंडाची कामगिरी सुधारत असल्याने या फंडाच्या तारांकित मानांकनात लवकरच सुधारणा होणे अपेक्षित आहे. आपल्या जोखीमंकानुसार या फंडाचा नव्याने गुंतवणुकीसाठी विचार करण्यास हरकत नाही.

shreeyachebaba@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2019 4:03 am

Web Title: beneficiary lic mf largecap lic mf growth fund abn 97
Next Stories
1 इच्छापत्र : समज-गैरसमज : इच्छापत्र : समज-गैरसमज
2 बाजाराचातंत्र कल : निर्देशांकावर तेजीची रोषणाई
3 वित्त शेष : ख्वाईश लवकर निवृत्त होण्याची
Just Now!
X