|| अतुल कोतकर

यंदाच्या अर्थसंकल्पात भविष्य निर्वाह निधीसाठी वर्षांकाठी अडीच लाख रुपयांच्या योगदानावर मिळणारे व्याज करमुक्त ठेऊन उर्वरित योगदानावरील व्याज करपात्र करण्यात आले आहे. याचा अर्थ एखाद्या कर्मचाऱ्याने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) किंवा ऐच्छिक भविष्य निर्वाह निधीत (व्हीपीएफ) वर्षांला २.५१ लाख रुपयांचे योगदान दिले असेल तर एक हजाराच्या योगदानावर मिळणारे व्याज करपात्र असेल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी रोकडसुलभ नसूनही सर्वात सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. निर्वाह निधी इतकीच मुद्दलाची सुरक्षितता असलेल्या सरकारी अल्पबचत साधनांचा विचार केल्यास, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीतील (पीपीएफ) योगदानावर वार्षिक ७.१ टक्के दराने मिळणारे व्याज करमुक्त आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत वार्षिक योगदानाची कमाल मर्यादा १.५० लाख रुपये आहे. सरकारी योजनांपैकी रिझव्‍‌र्ह बँकेचे रोखे (वार्षिक ७.१५ टक्के), किसान विकास पत्र (वार्षिक ६.९ टक्के), राष्ट्रीय बचत प्रमाण पत्र (वार्षिक ६.८ टक्के) मिळणारे व्याज करपात्र आहे.

परतावा निश्चित नसलेल्या परंतु कर कार्यक्षम पर्यायाचा जर गुंतवणूकदार शोध घेत असेल, तर दीर्घ मुदतीच्या सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक असणाऱ्या फंडांचा विचार तो नक्कीच करू शकेल. असाच एक पर्याय म्हणजे ‘निप्पॉन इंडिया निवेश लक्ष्य फंड’. हा फंड २५ वर्षांंपेक्षा अधिक मुदतीच्या सरकारी रोख्यांत गुंतवणूक करणारा फंड आहे. दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या वित्तीय ध्येयांसाठी हा फंड एक आदर्श पर्याय आहे. तीन वर्षांंहून अधिक कालावधीवरील भांडवली लाभावर ‘इंडेक्सेशन’ लाभाचा पर्याय उपलब्ध असल्याने करपश्चात परतावा ‘पीपीएफ’पेक्षा अधिक असेल. रोखे गुंतवणुकीत दोन धोके असतात पहिला मुद्दल व व्याज वेळेवर मिळण्याचा आणि दुसरा व्याजदर वाढण्याचा धोका. हा फंड सरकारी रोख्यांत गुंतवणूक करीत असल्याने मुद्दल व व्याजाची सर्वोच्च सुरक्षितता आहे. व्याजदर वाढले तर रोख्यांच्या किंमती घसरतात. व्याजदर कमी झाले तर रोख्यांच्या किंमती वाढतात. हा फंड ‘रोल डाऊन’ धोरणाचा अवलंब करतो. म्हणजे खरेदी केलेले रोखे मुदतपूर्तीपर्यंत राखून ठेवतो. परिणामी बाजारातील रोख्यांच्या किंमतीतील चढ-उतारांचा परिणाम दीर्घ काळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांच्या परताव्यावर फारच कमी होतो. ‘पीपीएफ’ इतकाच दीर्घावधीत सुरक्षित आणि गुंतवणुकीवर कमाल मर्यादा नसलेल्या या फंडाचा ‘वायटीएम’ ७.२५ टक्के असून ‘मॉडिफाइड डय़ुरेशन’ ११.०७ वर्षे आहे. याचा अर्थ या फंडात ११.०७ वर्षांंसाठी गुंतवणूक केल्यास ७.२५ टक्के वार्षिक दराने परतावा मिळेल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. निप्पॉन इंडिया निवेश लक्ष्य फंड हा एक गुंतवणुकीसाठी कायम खुला असलेला (ओपन एंडेड) रोकडसुलभ फंड आहे. दीर्घ मुदतीच्या सरकारी रोख्यांत गुंतवणूक करणाऱ्या या योजनेचा कर कार्यक्षमतेच्या दृष्टीने विचार करून, गुंतवणूकदारांनी एक रणनीती म्हणून या फंडात गुंतवणुकीचा विचार करावा.

 

गुंतवणूकदारांनी जर सरकारी रोख्यांमध्ये दीर्घ मुदतीची अथवा मुदतपूर्ती पर्यंत गुंतवणूक केल्यास त्यांना रोख्यांवरील परताव्याच्या पुनर्गुंतवणुकीतून चक्रवाढ लाभाचे फायदे मिळू शकतात. निप्पॉन इंडिया निवेश लक्ष्य फंड त्याच धर्तीवर मार्गक्रमण करणारा सुरक्षित फंड आहे. या फंडाचा गुंतवणूकदारांनी दीर्घावधीच्या आर्थिक ध्येयांसाठी (उदा. निवृत्तीपश्चात निश्चित उत्पन्न मिळविण्यासाठी) विचार नक्कीच करावा.

अमित त्रिपाठी मुख्य गुंतवणूक अधिकारी (निश्चित उत्पन्न)

 

निप्पॉन इंडिया निवेश लक्ष्य फंड

* फंड गट : दीर्घ मुदतीचे रोख

* फंड प्रारंभ : ६ जुलै २०१८

* फंड मालमत्ता : रु. १,७१७ कोटी (३१ जानेवारी २०२१)

* मानदंड : क्रिसिल लाँग टर्म डेट

* निधी व्यवस्थापक : प्रशांत पिंपळे

atul@sampannanivesh.com