भालचंद्र जोशी

गुंतवणूक/खरेदी-विक्री व्यवहार सर्वानाच जमले असते, तर ‘मार्गदर्शक’ हा पेशाच अस्तित्वात आला नसता. आर्थिक मार्गदर्शक हे ग्राहकांना त्यांच्या वित्तीय उद्दिष्टांपर्यंत निर्धारित वेळेत पोहोचण्यासाठी उपयुक्त भूमिका निभावतात. ही संशोधनाअंती सिद्ध झालेली गोष्ट आहे. तथापि विश्वास ठेवता येईल अशा दीर्घकालीन आर्थिक मार्गदर्शकाची निवड करणे हे सोपे नसते, हेही खरेच.. 

मागील लेखात आपल्या आर्थिक नियोजन प्रक्रियेत गुंतवणूक मार्गदर्शक (एमएफडी किंवा आरआयए) असणे अत्यंत महत्त्वाचे आहे हे आपण जाणून घेतले. यानंतर आजच्या लेखात आर्थिक नियोजन प्रक्रियेत आपल्याबरोबर आर्थिक मार्गदर्शक असण्याचे फायदे जाणून घेऊ. जगातील सर्व क्षेत्रांतील यशस्वी लोकांनी प्रशिक्षकांची नेमणूक आणि वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन किंवा मदत घेतलेली आहे. अव्वल अ‍ॅथलीट्स, बडय़ा कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि यशस्वी उद्योजक यांनी नेमलेले सल्लागार हे सातत्याने त्यांची ज्याने नेमणूक केली आहे त्या व्यक्तींच्या कामगिरीचे सखोल मूल्यमापन करीत असतात व त्यांच्या कामगिरीत अजून सातत्य किंवा सुधारणा कशा प्रकारे करता येईल याबद्दल मार्गदर्शन करतात. सदर लेखातून नेमका हाच मुद्दा स्पष्ट करावयाचा आहे. आर्थिक मार्गदर्शक हे ग्राहकांना त्यांच्या वित्तीय उद्दिष्टांपर्यंत निर्धारित वेळेत पोहोचण्यासाठी त्यांच्या पोर्टफोलिओचे सतत मूल्यमापन करून योग्य ते बदल सुचवीत असतात. आर्थिक नियोजन तसेच गुंतवणूक/खरेदी-विक्री व्यवहार हे स्वयंचलित असते आणि सर्वाना ते जमले असते तर ‘मार्गदर्शक’ हा पेशाच अस्तित्वात आला नसता.

मागील वर्षभरात अशा अनेक स्वत:चे आर्थिक नियोजन करणाऱ्या गुंतवणूकदारांकडून सातत्याने विचारणा होत होती की, एखादा सल्लागार (एमएफडी किंवा आरआयए) सुचवा. आजपर्यंत स्वत:ला स्वयंभू समजणारे अनेक गुंतवणूकदार मागील वर्षभरातील अस्थिरतेने चिंतित आणि गर्भगळित झालेले दिसले. बाजारातील अस्थिरतेने त्यांना हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात आला असावा. असे स्वयंभू गुंतवणूकदार वित्तीय ध्येयाचा व्यापक अर्थ लक्षात न घेता, तो ते ध्येय ढोबळमानाने मासिक, त्रमासिक आणि वार्षिक ध्येयांमध्ये विभाजित करतो. तथापि, जेव्हा गुंतवणूकदार एखाद्या मार्गदर्शकाच्या मदतीने वित्तीय ध्येय साध्य करीत असतो, तेव्हा त्यांना वर्षांतून किमान एकदा/ दोनदा त्यांच्या गुंतवणुकीचे काटेकोरपणे सिंहावलोकन करण्याची उत्तम संधी असते. गुंतवणूकदाराच्या जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांत (संचय आणि वितरण) विशिष्ट गुंतवणूक निश्चित एका पद्धतीने करणे अपेक्षित असते. स्वयंभू गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीच्या कार्यक्षमतेबाबत शंका असल्यास आपल्या जोडीदाराशी किंवा मुलांशी पैशाबाबत चर्चा करण्यास बऱ्याचदा संकोच वाटतो. त्यांच्या विस्तारित कुटुंबातील अन्य सदस्य आणि विश्वासू मित्रांशी चर्चा करण्यास संकोच वाटत नसला तरी त्यांना या विषयात गती असेलच असे नाही. दुसरी गोष्ट अशी की पैसा, कर्ज आणि गुंतवणूक हा विषय काही क्रिकेट किंवा राजकारण यांसारखा रंजक विषय नक्कीच नव्हे. आपण आपल्या आरोग्यविषयक समस्यांची चर्चा जशी कौटुंबिक डॉक्टरबरोबर करतो त्याचप्रमाणे आर्थिक नियोजन हा विषय आपण केवळ विश्वासू आणि तज्ज्ञ व्यक्तींसोबत चर्चा करण्याचा विषय आहे. ‘करोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुंबई बाजाराचा निर्देशांक का वाढत आहे?’ या प्रश्नाची असंख्य वेगवेगळी कारणे समोर येतील. ही आणि अशा प्रकारची कारणे वाचून माझ्या गुंतवणुकीची कामगिरी अपेक्षेनुसार होत आहे का, या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही. याचे नेमके उत्तर एखादा मार्गदर्शक (आरआयए किंवा एमएफडी) मात्र निश्चितच देऊ शकेल.

वर्षांनुवर्षांच्या संशोधनाअंती अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, आर्थिक सल्लागारांचा कल हा वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या तुलनेत बाजारपेठेच्या जोखमीपासून बचाव करण्याच्या धोरणावर अधिक  केंद्रित असतो, तर गुंतवणूकदार जास्त परताव्याच्या मागे लागून जरुरीपेक्षा अधिक जोखीम स्वीकारत असतात. अभ्यासातून असेही दिसून आले आहे की, ८८ टक्के सल्लागारांकडे बाजार घसरणीच्या वेळी ग्राहकांच्या मालमत्तेचे रक्षण करण्याच्या उद्देशाने रणनीती तयार होती, तर त्यांच्या तुलनेत केवळ ३७ टक्के गुंतवणूकदारांकडे संभाव्य घसरणीत स्वत:चे मुद्दल सुरक्षित राखण्याचे धोरण तयार होते. तीव्र घसरणीत अनेकांना मुद्दल सुरक्षित राखण्याची गरज भासते. अमेरिकेसारख्या विकसित बाजारपेठेत आणि भारताच्या तुलनेत अर्थसाक्षरतेचा स्तर उंचावलेल्या देशात ४७ टक्के गुंतवणूकदारांना करोना साथीसारख्या असाधारण स्थितीत, बाजार जोखमीपासून गुंतवणुकीचे संरक्षण करण्याची आणि उत्पन्नाचे साधन म्हणून ठरावीक आर्थिक उत्पन्नाची (अ‍ॅन्युइटीची) गरज भासली. वाढती आयुर्मर्यादा आणि महागाईपासून आपल्या बचतीचे संरक्षण करण्यासाठी प्रामुख्याने व्यावसायिक मार्गदर्शकाची गरज भासते.

करोनासारख्या असामान्य परिस्थितीत अनेक स्वयंभू गुंतवणूकदारांना आर्थिक आणि निधी व्यवस्थापन सल्लय़ासाठी विश्वासार्ह आर्थिक सल्लागार शोधणे क्रमप्राप्त झाले. ज्यावर आपण विश्वास ठेवू शकता अशा एखाद्या दीर्घकालीन आर्थिक सल्लागाराची निवड करणे हे नक्कीच सोपे नसते. आपली ज्याच्याशी तार जुळेल आणि ज्याची कौशल्ये आपल्या अल्प तसेच दीर्घकालीन गरजा भागविण्यासाठी कामी येतील अशा मार्गदर्शकाची तातडीने निवड करायला हवी. जसा आपल्या कुटुंबाचा डॉक्टर असतो तसाच अर्थसल्लागार असणे अतिशय महत्त्वाचे आहे. पुढील लेखात या मार्गदर्शकाची निवड कशी करावी हे जाणून घेऊ.

तळटीप : म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.

लेखक व्हाइट ओक कॅपिटल  मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक आणि मुख्य परिचालन अधिकारी

bhalchandra.joshi@ whiteoakindia.com