|| प्रवीण देशपांडे

  • प्रश्न : मी एक छोटा किरकोळ गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय यावर्षी सुरु केला. मला लेखे ठेवणे बंधनकारक आहे का? असल्यास कोणत्या प्रकारचे लेखे ठेवणे गरजेचे आहे? – प्रशांत पाटील, सोलापूर

उत्तर : ज्या व्यक्ती धंदा किंवा व्यवसाय करतात अशा धंदा-व्यवसायाचे उत्पन्न २,५०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे किंवा मागील तीन वर्षांतील कोणत्याही एका वर्षांची उलाढाल किंवा एकूण जमा २५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांना लेखे ठेवणे बंधनकारक आहे. या तरतुदी फक्त वैयक्तिक किंवा हिंदू अविभक्त कुटुंब यांना लागू आहेत, इतर करदात्यांसाठी वरील उत्पन्नाची मर्यादा १,२०,००० रुपये आणि उलाढालीची मर्यादा १० लाख रुपये इतकी आहे.

या तरतुदी ठरावीक व्यवसाय करणाऱ्यांसाठी (म्हणजे वकील, डॉक्टर, सी.ए., इंजिनीअर, वगैरे) लागू नाहीत. आपण आपला धंदा या वर्षी सुरू केला असल्यामुळे वर नमूद केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न किंवा उलाढाल आपल्या धंद्यातून अपेक्षित असेल तर आपल्याला लेखे ठेवणे बंधनकारक आहे.

परंतु आपण ‘कलम ४४ एडी’नुसार जर अनुमानावर आधारित (प्रिझम्प्टिव्ह) आठ किंवा सहा टक्के इतका किंवा जास्त नफा दाखवून त्यावर कर भरणार (आपल्या धंद्याची उलाढाल २ कोटी रुपयांपेक्षा कमी असेल तर) असाल तर आपल्याला लेखे ठेवण्याच्या तरतुदी लागू होत नाहीत. परंतु आपल्या माहितीसाठी लेखे ठेवणे हितावह आहे.

  • प्रश्न : ज्येष्ठ नागरिकांसाठी आता व्याजाच्या उत्पन्नावर काय सवलती आहेत? – अरविंद काळे, ई-मेलद्वारे

उत्तर : ज्येष्ठ नागरिकांना (ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे), ‘कलम ८० टीटीबी’नुसार, बँकेच्या, पोस्ट ऑफिसच्या किंवा सहकारी बँकेच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर ५०,००० रुपयांपर्यंतची उत्पन्नातून सूट मिळते. बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाचासुद्धा यामध्ये समावेश होतो. इतर नागरिकांना ‘कलम ८० टीटीए’नुसार फक्त बचत खात्यावरील व्याजावर १०,००० रुपयांपर्यंतची उत्पन्नातून सूट मिळते. ज्येष्ठ नागरिकांना व्याजावरील उत्पन्नावर होणाऱ्या उद्गम कराच्या (टीडीएस) तरतुदींसाठीसुद्धा मर्यादा ५०,००० रुपये इतकी वाढविली आहे. त्यामुळे ५०,००० रुपयांपेक्षा कमी व्याज मिळणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा टीडीएस कापला जाणार नाही.

  • प्रश्न : मी पर्मनंट अकौंट नंबर (पॅन) काढलेला नाही. माझ्या बँकेत काही जुन्या ठेवी आहेत. या ठेवींवरील व्याज आता १०,००० रुपयांपेक्षा जास्त होत असल्यामुळे उद्गम कराच्या तरतुदी लागू होतील असे बँकेने मला सांगितले आहे आणि उद्गम कर कापला न जाण्यासाठी फॉर्म १५ जी/एच देण्याचे सांगितले आहे. मी हा फॉर्म बँकेला सादर करू शकते का? – मेघा सरदेसाई, ई-मेलद्वारे

उत्तर : ज्या करदात्यांकडे पर्मनंट अकौंट नंबर आहे तेच करदाते फॉर्म १५ जी/एच फॉर्म बँकेला देऊ शकतात. जर आपल्याकडे पॅन नसेल तर बँकेला २० टक्के इतक्या दराने उद्गम कर कापावा लागेल. हे वाचवायचे असेल तर आपण पॅनसाठी अर्ज करून, पॅन मिळाल्यानंतर बँकेला फॉर्म १५ जी/एच सादर करू शकता.

  • प्रश्न : मला फॅमिली पेन्शन मिळते. या वर्षीपासून ४०,००० रुपयांची प्रमाणित वजावट लागू केली आहे, ही वजावट मला फॅमिली पेन्शनच्या उत्पन्नातून घेता येईल का?  – कृष्णा जाधव, ई-मेलद्वारे

उत्तर : या वर्षीपासून (आर्थिक वर्ष २०१८-१९ पासून) लागू करण्यात आलेली ४०,००० रुपयांपर्यंतची प्रमाणित वजावट ही ‘पगारातून’ मिळणाऱ्या उत्पन्नासाठी आहे. फॅमिली पेन्शनचे उत्पन्न हे ‘इतर उत्पन्न’ म्हणून गणले जाते, त्यामुळे ही प्रमाणित वजावट फॅमिली पेन्शनच्या उत्पन्नासाठी घेता येत नाही.

  • प्रश्न : माझ्या ५०व्या वाढदिवसानिमित्त मला माझ्या दहा मित्रांकडून प्रत्येकी सरासरी ६,००० रुपयेप्रमाणे ६०,००० रुपये भेट मिळाले. मला किती उत्पन्न करपात्र आहे? – सुरेंद्र वाघुले, ई-मेलद्वारे

उत्तर : एका वर्षांत करदात्याला ५०,००० रुपयांपेक्षा जास्त भेटी मिळाल्या असतील तर त्या करपात्र आहेत, त्या अनेक व्यक्तींकडून मिळाल्या असल्या तरी. जर एकूण भेटी ५०,००० रुपयांपेक्षा कमी असतील तर ते उत्पन्न करपात्र उत्पन्नात गणले जात नाही. परंतु एकूण भेटी ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असतील तर संपूर्ण रक्कम (फक्त ५०,००० रुपयांच्या पेक्षा जास्त नाही) ही करपात्र उत्पन्नात गणली जाते. त्यामुळे आपल्या बाबतीत एकूण भेट ६०,००० रुपये असल्यामुळे आपल्याला ही संपूर्ण रक्कम करपात्र होईल.

 

  • प्रश्न : मी जून २००४ मध्ये एक प्लॉट ६,५०,००० रुपयांना खरेदी केला होता. हा प्लॉट मी ऑक्टोबर २०१८ मध्ये २६ लाख रुपयांना विकला. या विक्री व्यवहारात मी २५,००० रुपयांची दलाली दिली. मला हे पैसे माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी वापरावयाचे असल्यामुळे मी कर वाचविण्यासाठी कोणतीही गुंतवणूक करू इच्छित नाही. मला या व्यवहारावर किती कर भरावा लागेल? आणि कधी भरावा लागेल? – अजय देशमुख, ई-मेलद्वारे

उत्तर : आपली संपत्ती दीर्घ मुदतीची असल्यामुळे आपल्याला महागाई निर्देशांकाचा फायदा घेता येईल. यानुसार आपल्याला झालेला दीर्घ मुदतीचा भांडवली नफा खालीलप्रमाणे :

 

आपण वर दिलेली प्लॉटची प्रत्यक्ष विक्री किंमत (२६ लाख रुपये) ही मुद्रांक शुल्कानुसारच्या मूल्यांकनापेक्षा जास्त आहे असे गृहीत धरले आहे. विक्रीसाठी झालेल्या खर्चाची वजावट (दलाली) आपल्याला मिळू शकते. यानुसार आपल्याला २,००,५९१ रुपये इतका कर भरावा लागेल. आपण जर निवासी भारतीय ज्येष्ठ नागरिक (वय ६० वर्षांपेक्षा जास्त) असाल आणि आपल्या उत्पन्नात धंदा-व्यवसायाचा समावेश नसेल तर आपण हा कर जुलै २०१९ मध्ये विवरणपत्र भरण्यापूर्वी स्व-निर्धारण कराच्या रूपात भरू शकता.

आपण ज्येष्ठ नागरिक नसाल तर आपल्याला या कराची ७५ टक्के रक्कम (म्हणजेच १,५०,४४३ रुपये) १५ डिसेंबर २०१८ पूर्वी अग्रिम कराच्या रूपात भरावी लागेल आणि बाकीची रक्कम १५ मार्च २०१९ पूर्वी अग्रिम कराच्या रूपात भरावी लागेल.

लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत. त्यांच्याशी ई-मेल pravin3966@rediffmail.com वर संपर्क साधून आपले करविषयक प्रश्न विचारता येतील.