पूजा गिऱ्हे poojagirhe81@gmail.com

करोना साथीच्या प्रसारामुळे लोकांना चांगला आरोग्य विमा (मेडिक्लेम पॉलिसी) असण्याचे महत्त्व कळायला लागले आहे. वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळवायच्या असतील तर तगडय़ा आरोग्य विम्याची गरज असते हे लोकांना हळूहळू पटायला लागले आहे. स्वत:ला आणि कुटुंबीयांना आरोग्य विमा संरक्षण देण्याची आवश्यकता पटल्याने यंदा आरोग्य विम्याच्या प्रथम हप्ते संकलनात मोठी वाढ झालेली दिसून येते. अन्य विमा प्रकाराच्या वितरण पद्धतीत बँका, इन्शुरन्स ब्रोकर्स अशा संस्थात्मक विक्रेत्यांचे प्राबल्य असले तरी आरोग्य विमा या विमा प्रकारात वैयक्तिक विमा विक्रेते सर्वात प्रबळ असल्याचे दिसते. विमा नियामकांकडून विम्याच्या प्रथम हप्त्याबाबत जी आकडेवारी प्रस्तुत होते त्या आकडेवारीत आरोग्य विम्याच्या पहिल्या हप्त्याच्या संकलनात वैयक्तिक विमा सल्लागारांचा सर्वाधिक वाटा असल्याचे दिसून येते. अजूनही कोणी आरोग्य विम्याचे संरक्षण घेतले नसेल आणि असा विमा अर्थात ‘मेडिक्लेम पॉलिसी’ खरेदी करण्याचा ते विचार करीत असतील, तर या खरेदीपूर्वी नेमक्या कोणत्या गोष्टी जाणून घ्यायला हव्यात, हे त्यांना माहीत असायला हवे.

आरोग्य विम्याचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे जुन्या आजारांना नवीन पॉलिसीत उपलब्ध असलेले संरक्षण. विम्यासाठी अर्ज करण्यापूर्वीपासून एखादी आरोग्य समस्या अस्तित्वात असेल तर तिला अथवा अन्य कुठल्या आजारांना नवीन विम्यात संरक्षण मिळणार आहे आणि पॉलिसी खरेदी केल्यापासून किती काळानंतर त्या आजारांवरील उपचारांच्या खर्चाना संरक्षण आहे हे जाणून घेणे गरजेचे असते. हृदयरोग, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाशी संबंधित आजारांच्या उपचाराला पहिले ४८ महिने संरक्षण नसते. प्रत्येक पॉलिसीसाठी लगेच विमा संरक्षण नसलेल्या आजारांची यादी उपलब्ध असते. ही यादी मिळवून त्यापैकी कोणते आजार आपल्याला आहेत आणि या आजारांना कधीपासून संरक्षण असेल हे पॉलिसी खरेदीपूर्वी जाणून घ्यायला हवे.

कुटुंबासाठी सर्वोत्तम आरोग्य विमा योजनांचा इंटरनेटवर शोध घेताना एकाच रकमेचे विमा संरक्षण असलेल्या विमा पॉलिसीचा हप्ता कमी-अधिक असतो. खरेदीपूर्व आजारांना असलेले संरक्षण हे त्यामागील एक कारण आहे. आपण २० लाखांचे विमा छत्र असलेली पॉलिसी घेतली असली तरी विमा कंपनीने ‘रोगनिहाय कमाल खर्चा’ची मर्यादा घातलेली असते. विशिष्ट आजारांवरील उपचाराला किती संरक्षण आहे त्यावरसुद्धा विम्याचा हप्ता ठरत असतो. ही कमाल मर्यादा जितकी अधिक तितके विमाधारकासाठी चांगले असते.

प्रत्येक आरोग्य विमा उपचाराच्या निश्चित रकमेला संरक्षण असते. विमाधारकाने एखादा दावा सादर केल्यानंतर त्यापैकी काही खर्च विमाधारकाने करायचा असतो. विमा परिभाषेत याला ‘को-पे’ किंवा ‘को-पेमेंट क्लॉज’ असे म्हणतात. वैद्यकीय खर्चाच्या किमान ९० टक्के खर्चाला विमा संरक्षण देणारी पॉलिसी असणे उत्तम. कुठल्याही विमा पॉलिसीचा ‘क्लेम सेटलमेंट रेशो’ महत्त्वाचा असतो. तसा आरोग्य विम्यातसुद्धा पॉलिसी निवडण्याचा हा एक प्रमुख निकष आहे. ज्या विमा कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो ९० टक्क्यांहून अधिक आहे त्याच कंपनीची विमा पॉलिसी खरेदी करायला हवी.

अनेक तरुण जोडपी प्रसूती खर्चाला संरक्षण असलेल्या आरोग्य विमा पॉलिसीच्या शोधात असतात. अनेक विमा पॉलिसी दोन बाळंतपणापर्यंतच्या प्रसूती खर्चाला संरक्षण देतात. परंतु त्यामुळे हप्त्यात वाढ होते. समान खर्चाच्या प्रसूती खर्चाला संरक्षण दिलेल्या पॉलिसी आणि संरक्षण नसलेल्या पॉलिसी यांच्या हप्त्यांची तुलना करून निर्णय घ्यावा. संरक्षण असलेल्या वैद्यकीय चाचण्यांचा समावेश असलेल्या पॉलिसींना पसंती द्यायला हवी. काही आरोग्य विम्याच्या पॉलिसीच्या रचनेत मोठय़ा आजाराचे निदान करणाऱ्या प्रतिबंधक आरोग्य चाचणी खर्च समावेश असतो. जीवनशैलीशी निगडित आजाराच्या रोगाच्या तपासणीसाठी या प्रकारच्या खर्चाचा समावेश असलेल्या आरोग्य विमा पॉलिसी अतिशय लाभदायक ठरू शकतात.

आपला विमाधारक निरोगी असल्याचा फायदा काही विमा कंपनीला होतो. हल्ली काही विमा पॉलिसी कमाल मर्यादेपर्यंत ‘जिम’चे वार्षिक सदस्यत्व यासारख्या निरोगीपणा किंवा तंदुरुस्ती सेवांसाठी वर्षांकाठी निश्चित रकमेची तरतूद करते. आरोग्यम् धनसंपदा हे जरी खरे असले तरी संचित धन अनारोग्य खर्चावर उधळायचे नसेल तर एका चांगल्या आरोग्य विमा पॉलिसीची खरेदी आजच करा.