18 July 2019

News Flash

॥ दास म्हणे रे सद्गुण धाम, उत्तम गुण मज दे रे राम॥

नीलेश (३२) आणि अमिता (३०) हे मुंबईत राहतात.

|| अनुराधा किरण सहस्रबुद्धे

नीलेश (३२) आणि अमिता (३०) हे मुंबईत राहतात. नीलेश एका खाजगी कंपनीत तर अमिता खाजगी विमा कंपनीत नोकरी करतात. वर्षभरापूर्वी त्यांच्या कुटुंबात सईचे (१ वर्षे) आगमन झाले. अनिता यांची ईमेल आल्यावर त्यांच्याशी बोलणे झाले. त्यानुसार त्यांना एक ढोबळ नियोजन करून दिले. सध्या त्यांच्याकडे जितकी बचत असायला हवी तितकी शिल्लक उरत नाही, पण नियोजन केल्याने किती बचत करायला हवी याचा त्यांना अंदाज आला.

१. आयुर्विमा : नीलेश आणि अमिता यांनी गृहकर्ज घेतेवेळी एसबीआय लाईफ इन्शुरन्सची एसबीआय ऋणरक्षा ही विमा पॉलिसी खरेदी केली आहे. या पॉलिसीमुळे कर्जदाराच्या अकाली मृत्यूनंतर त्याच्या वाटय़ाचे कर्ज फेडण्याची जबाबदारी एसबीआय लाईफ इन्शुरन्सने स्वीकारली आहे. नीलेश यांचे वय, पैसे कमावण्याची क्षमता आणि त्यांच्या वित्तीय जबाबदाऱ्या लक्षात घेऊन त्यांना किमान १ कोटीचे विमा छत्र गरजेचे आहे त्यांनी सध्याच्या ५० लाखाचे विमा छत्र असलेल्या पॉलिसीव्यतिरिक्त अजून ५० लाखाचे विमा छत्र खरेदी करणे गरजेचे आहे. कर्ज फेडणे ही नीलेश आणि अमिता या दोघांची जबाबदारी आहे तसे सईच्या उच्च शिक्षणासाठी करावयाची तरतूद आणि निवृत्तिपश्चातच्या खर्चाची तरतूद ही वित्तीय ध्येये दोघांनी पूर्ण करावयाची आहेत. अमिता यांच्याकडे मुदतीचा विमा नाही. अमिता यांचे वय आणि अजून ३० वर्षे पैसे कमावण्याची क्षमता लक्षात घेऊन त्यांना किमान १ कोटीचे विमा छत्र गरजेचे आहे.

२. आरोग्य विमा : नीलेश आणि अमिता यांना नोकरीच्या ठिकाणी प्रत्येकी ३ लाखाच्या आरोग्य विम्याचे छत्र असल्याने त्यांनी खरेदी केलेल्या आरोग्य विम्याचे ५ लाखाचे संरक्षण सध्या पुरेसे आहे.

३ गुंतवणूक : सध्या अभियांत्रिकी शिक्षणाचा खर्च वार्षिक १.२५ लाख रुपये आहे अजून १६ वर्षांनी वार्षिक खर्च ४ लाख रुपये अपेक्षित असल्याने त्यासाठी दरमहा ४,००० रुपयांची नियोजनबद्ध गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

सईच्या शिक्षणाच्या खर्चाची तरतूद आणि निवृत्तिपश्चातच्या खर्चाची तरतूद मिळून एकूण ५० हजाराच्या नियोजनबद्ध गुंतवणुकीची गरज आहे. नीलेश आणि अमिता यांची १० हजाराची ‘एसआयपी’ सुरू आहे. निवृत्तीसमयी लागणाऱ्या ११ कोटींपैकी अंदाजे निम्मी रक्कम त्यांना निवृत्तिपश्चात मिळणाऱ्या लाभातून मिळेल. त्यांना किमान ५ कोटी इतकी रक्कम पुढील ३० वर्षांत जमवावी लागणार आहे. त्यासाठी त्यांनी मासिक किमान ३३ हजार रुपयांच्या नियोजनबद्ध गुंतवणुकीची गरज आहे. दोन्ही वित्तीय ध्येयांच्या पूर्ततेसाठी ३७ हजाराची बचत असणे गरजेचे आहे. यापैकी त्यांना सध्याच्या बचतीतून ३० हजाराची नियोजनबद्ध गुंतवणूक करता येत आहे. सध्याच्या बचतीतून ते त्यांच्या वित्तीय ध्येयाची ७३ टक्के पूर्तता करू शकतील.

(लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आहेत, akswealth@gmail.com ई-मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल)

First Published on February 25, 2019 1:06 am

Web Title: best investment options in india 1