|| वसंत कुलकर्णी

कालच्या रविवारी गंपूची शताब्दी साजरी झाली. आईची वात्सल्य भावना तृप्त करण्यासाठी जन्माला आलेल्या गंपूला या भूतलावर येऊन १०० वर्षे झाली. शुद्ध आगाऊपणाच्या आधारावर त्याचा बुटका सोशिक देह वयानुसार जरी वाकला असला तरी त्याच्या मनाचा ताठा तसाच आहे. पुण्यातील अप्पा बळवंत चौकातला पोटभरेंच्या वाडय़ात ‘परोपकारी गंपू’ लहानाचा मोठा झाला. गंपूच्या पुढल्या पिढीतील सदस्य या वाडय़ाच्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या इमारतीत नांदत आहे. पूर्वी बाजीराव रस्त्यावरून टिळक रस्त्यावर सायकल मारून जाणाऱ्या गंपू पणजोबांना त्यांचा पणतू पार्थ किंवा त्याची पत्नी श्वेता मोटारीतून चक्कर मारून आणते. गंपूने आग्रह केला म्हणून पार्थ आणि श्वेता एकदा टिळक स्मारक मंदिरात झालेल्या ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रमाला उपस्थित राहिले. या कार्यक्रमानंतर ‘एसआयपी म्हणजे काय असते’ हे अनुभवावे म्हणून श्वेताने आपल्या शिल्लक रकमेच्या गुंतवणुकीसाठी एसआयपी मार्ग आजमावण्याचे ठरविले. मागील दोन वर्षांपासून ‘एसआयपी’ करूनदेखील १ लाख २० हजाराच्या मुद्दलावर केवळ ५०० रुपयांची वाढ.. एकंदर चिंतेचा विषय बनल्याने श्वेताने आपली चिंता पणजोबांना बोलून दाखविली.

‘‘माझ्या गुंतवणुकीवर मिळालेला नफा एक टक्कासुद्धा नाही. हीच रक्कम बचत खात्यात ठेवली असती तर किमान चार टक्के तरी व्याज मिळाले असते.’’

‘‘आपल्या सर्व प्रश्नांचे ‘एसआयपी’ हे उत्तर आहे असे वाटणाऱ्या पिढीची तू प्रतिनिधी आहेस. नमो सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला तेव्हा जून २०१४ मध्ये म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’च्या माध्यमातून होणारी गुंतवणूक १२०० कोटीची होती. दुसऱ्या इिनगसाठी नमो आणि इतर असा सामना सुरू होण्याआधी फेब्रुवारी २०१९ मध्ये म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’च्या माध्यमातून होणाऱ्या गुंतवणुकीने ८,०९४ कोटींचा टप्पा गाठला आहे. मोदी लाट वैगरे होती आणि ती या निवडणुकीतसुद्धा आहे. ‘विरोधकांना ती दिसत नाही,’ असे कोणी भक्त छप्पन्न इंचाच्या छातीची आण घेऊन सांगो बापडे, पण नमोंच्या राज्याभिषेकानंतर सुरू झालेली ‘एसआयपी’ची लाट मात्र कायम आहे,’’ गंपू पणजोबांनी श्वेताच्या शंकेचे निरसन केले.

‘‘मतदान वाढावे म्हणून निवडणूक आयोग वेगवेगळे उपक्रम हाती घेतात, पण या उपक्रमाला प्रतिसाद मिळतोच असे नाही. पण ‘अ‍ॅम्फी’ने म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत वाढ व्हावी म्हणून सुरू केलेल्या ‘म्युच्युअल फंड सही है’ या अर्थसाक्षरता उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभला. म्युच्युअल फंड फोलिओत आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीत वाढ दिसून आली. दृकश्राव्य, छापील आणि श्राव्य माध्यमातून एकाच वेळी चालविलेला हा उपक्रम अपेक्षेपेक्षा किती तरी पट अधिक यशस्वी झाला.’’

‘‘पण पणजोबा, मी मागील दोन वर्षे मिड कॅप फंडात एसआयपी करीत आहे पण माझ्या गुंतवणुकीवर अवघा २ टक्के परतावा दिसत आहे. माझे नेमके काय चुकले?’’

‘‘देअर यू आर श्वेता, आपण गुंतवणूक करतो ती त्या गुंतवणुकीवर चांगला नफा होण्यासाठी. बचत खात्यात शिल्लक असलेल्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजदराइतका नफा होत नसेल तर म्युच्युअल फंडात गुंतवणूक का करावी असा तुला पडलेला प्रश्न योग्यच म्हणायला हवा.’’

‘‘सध्याच्या निवडणूकपूर्व अस्थिर बाजारपेठेत, जेव्हा अनेक फंडातील एक वर्षांपूर्वीच्या गुंतवणुकीवर तोटा होत असल्याची प्रत्येक जण तक्रार करीत आहे. विशेषत: ज्यांना गेल्या दोन वर्षांमध्ये ‘एसआयपी’ करूनही माझ्या गुंतवणुकीवर चांगला परतावा का मिळत नाही असा प्रश्न पडला आहे.’’

‘‘बाजारात ‘पी हळद अन् हो गोरी’ असे नसते. आगामी निवडणुकीनंतर जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही राष्ट्रावर कोण स्वबळावर सत्तेत येतो की नमोंना दूर ठेवण्याइतपत विरोधकांना खासदार निवडून आणता येतात का, हा जगभरातील देशांमध्येही उत्सुकतेचा विषय आहे. निवडणूक जवळ येईल तशी येत्या दिवसांत भारतीय शेअर बाजारांमधील अस्थिरता नक्कीच वाढेल. या कालावधीत नेमकी कोठे व किती गुंतवणूक करावी की आधीची गुंतवणूक काढून घ्यावी, असा प्रश्न तुझ्यासारख्या नवख्या गुंतवणूकदारांना पडणे स्वाभाविक आहे.’’

‘‘केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर नव्या सरकारने आधीच्या सरकारच्या आर्थिक सुधारणा थांबविल्या किंवा आधीच्या सरकारच्या धोरणांविरुद्ध धोरणे आखली असे दिसत नाही. प्रधानसेवक मोदी देखील याला अपवाद नाहीत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना ‘जीएसटी’ला विरोध करणाऱ्या मोदींनी पंतप्रधानपदी असताना ‘जीएसटी’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर केले. खड्डे खोदण्यासाठी पैसे देणारी योजना असल्याची ‘मनारेगा’वर टीका करणाऱ्या मोदींनी आजपर्यंतच्या कुठल्याही सरकारने केली नसेल इतकी तरतूद ‘मनारेगा’साठी केली. कुठलेही सरकार आले तरी आर्थिक दिशा व धोरणे यांत फार फरक पडत नाही. बाजाराची बदलती स्थिती गृहीत धरून योग्य मालमत्ता विभाजन केल्यास निर्देशांकाच्या अस्थिरतेवर मात करता येईल. शेअर बाजारातील गुंतवणूक ही प्रामुख्याने लोभ व भय या दोन घटकांच्या आधारे चालते. मात्र निवडणुकीच्या काळातील बाजारासंबंधी संभाव्य अस्थिरतेचा विचार करता तू लोभ वा भय अशा दोन्ही विचारांना दूर सारून गुंतवणूक तशीच ठेवणे गरजेचे आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही दीर्घकालीन असावी, शिवाय तिला आर्थिक उद्दिष्टांचाही आधार असणे आवश्यक आहे. तेव्हा  सध्या परतावा देत नसली मिड कॅप गुंतवणूक तरी तुला त्याबद्दल चिंता वाटण्याचे कारण नाही.’’

‘‘फेब्रुवारी महिन्यात मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पानंतर अनेक मिड कॅप समभागांत जवळपास १० टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. मिड कॅप निर्देशांकांनी वार्षकि सरासरी १४.४० टक्के दराने मागील दहा वर्षांत नफा कमावला आहे. मिड कॅप फंडांनी तर या मानदंडापेक्षा अधिक नफ्याचे माप गुंतवणूकदारांच्या पदरात टाकले आहे. त्यामुळे या फंडांची अल्पकाळातील कामगिरी अस्थिर असली, तरी या क्षेत्राची दीर्घावधीतील कामगिरी दमदारच राहिली आहे.’’

‘‘कालच एका निधी व्यवस्थापकाची मुलाखत मी ऐकत होतो, त्याच्या म्हणण्यानुसार लोक नेहमीच चुकीच्या वेळी गुंतवणुकीतून बाहेर पडतात. जेव्हा ‘एसआयपी’वरील परतावा नकारात्मक असतो, तेव्हा लोकांना बाजारातील गुंतवणूक काढावीशी वाटते. परतावा जास्त असतो तेव्हा लोकांना बाजारातील गुंतवणूक वाढवावी असे वाटते. हाच भावनिक मुद्दा घात करतो. माझ्यासारखे गुंतवणूकदार आर्थिक आवर्तनातून परिपक्व झाले तरी गुंतवणूकदारांची एक पिढी नेहमीच नव्याने डाव खेळण्यास तयार असते. गेल्या काही वर्षांमध्ये ‘एसआयपी’चे सरासरीने मूल्य आणि सरासरी कालावधीत वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांसाठी ‘एसआयपी’नेच संपत्ती निर्माण झाली आहे. हे विसरू नकोस. आम्हाला हे खूप उशिरा कळले. ‘अ‍ॅम्फी’च्या आर्थिक साक्षरता समितीच्या कल्पनेतून ‘म्युच्युअल फंड सही है’ हा उपक्रम राबवला जातो. या समितीत संदीप वाळुंज, कैलाश कुलकर्णी, आशुतोष बिष्णोई यांच्यासारखे परिचित असल्याने त्यांच्याशी गप्पा मारताना मला बऱ्याच गोष्टी कळतात. तुला कमावत्या वयात ‘एसआयपी’चे महत्त्व शिकविणाऱ्या या समितीचे तू आभार मानायला हवेत.’’

shreeyachebaba@gmail.com