08 March 2021

News Flash

हॅप्पी इन्व्हेस्टिंग!

प्रत्येक वर्ष आपल्याला काहीतरी शिकवून जाते. २०१८ या वर्षांने देखील आपल्याला काही महत्वाचे धडे दिले आहेत.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| अजय वाळिंबे

प्रत्येक वर्ष आपल्याला काहीतरी शिकवून जाते. २०१८ या वर्षांने देखील आपल्याला काही महत्वाचे धडे दिले आहेत. त्यातला पहिला महत्वाचा धडा म्हणजे निर्देशांक न घसरता देखील आपण गुंतवणूक केलेले शेअर्स मात्र पडू शकतात, डेट फंडातील गुंतवणूक बँकेच्या मुदत ठेवीपेक्षा आकर्षक परतावा देऊ शकते हा समज खोटा ठरवणारा दूसरा धडा आणि सोने किंवा रियल इस्टेटमधील गुंतवणूकदेखील तुम्हाला अनिश्चित काळात तारू शकत नाही ही शिकवण देणारा तिसरा धडा.

वर्ष २०१५ मध्ये नवीन जीडीपी फॉम्र्युला अंमलात आणल्यानंतर वाढलेला प्रगतीचा वेग यंदाच्या वर्षांत पहिल्यांदाच मंदावलेला दिसला. नोटाबंदी आणि घाईघाईत राबविलेल्या जीएसटीनंतरही आपल्या आर्थिक वाढीचा वेग आता उत्तम आहे असे कितीही म्हटले तरी त्या वल्गनाच. आपल्या अर्थव्यवस्थेला सध्या भडसावणारे अनेक प्रश्न आहेत. रसातळाला गेलेल्या कच्च्या तेलाच्या किमती आपल्या अर्थव्यवस्थेला गेली दोन-तीन वर्ष तारत होत्या हे वास्तव आहे हे एव्हाना कळून चुकले आहे.

वर्षांच्या सुरुवातीला ३३,८१२,७५ अंशांवर असणारा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक वर्षांखेरीला २८ डिसेंबर रोजी ३६,०७६.७२ अंशांवर बंद झाला. म्हणजे निर्देशांकांत २,२२६३.९७ अंशांची वाढच झाली. मात्र तरीही मंदीसदृश वातावरण असल्याची भावना गुंतवणूकदारांची राहिली. खरे तर यंदाच्या वर्षांत ऑगस्ट २०१८ पर्यंत केवळ पाच महिन्यांत मुंबई शेअर बाजार निर्देशांकांत तब्बल ६,३०० अंशांनी वाढ झाली होती. हाच टप्पा गाठायला मुंबई निर्देशांकाला या आधी तब्बल १६ महीने लागले होते. मात्र त्या नंतर गेल्या चार महिन्यांत एक ना अनेक कारणांची शेअर बाजाराने गंभीर दखल घेत निर्देशांक दोलायमान ठेवला. यामध्ये प्रामुख्याने जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, घसरता रुपया, अमेरिकेतील वाढते व्याज दर, डोनाल्ड ट्रम्प यांची राजनिती आणि अर्थात आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यापारी युद्ध या सर्वांचा समावेश करायला हवा. आणि अर्थातच चार राज्यांत झालेल्या निवडणुकांचे ताजे निकाल आणि येऊ घातलेली लोकसभेची निवडणूक तसेच सध्या भासत असलेली रोकड चणचण याचाही परिणाम शेअर बाजारावर झालेला दिसतो. शेअर बाजाराची ही परिस्थिति नजीकच्या कालावधीतही असेल. त्यामुळेच २०१९ मध्ये देखील पहिले अर्ध वर्षांत गुंतवणूकदारांच्या संयमाची परीक्षा पाहिली जाईल.

वर्ष २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये ‘आयपीओ’द्वारे उभारलेली रक्कम देखील ५४ टक्क्य़ांनी कमी झाली आहे. २०१७ मध्ये ३६ कंपन्यांनी ६७,१४७ कोटी रुपये जमा केले होते, त्या तुलनेत २०१८ मध्ये २४ कंपन्यांनी केवळ ३०,९५९ कोटी जमा केले. शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते भारतीय बाजारातील स्मॉल आणि मिड कॅप शेअर्सचे मूल्यांकन जागतिक बाजारपेठेतील तुलनेत अवाजवी जास्त आहे. आणि त्याची परिणीती विक्रीत होऊन या समभागांचे भाव कोसळले. त्यामुळेच यंदा ज्यांनी म्युच्युअल फंडांत गुंतवणूक केली असेल त्यांचेदेखील नुकसानच झाले असण्याची शक्यता जास्त.

कुठल्याही गुंतवणूकदाराला काळजी वाटावी अशीच ही स्थिती. परंतु दर वर्षी शेअर बाजारात केवळ नफा मिळेल अशी अपेक्षा करणेच चुकीचे आहे. उत्तम कंपन्यांच्या समभागात केलेली दीर्घकालीन गुंतवणूकच फायदेशीर ठरते हा अनुभव आहे. त्यामुळेच आपला पोर्टफोलियोदेखील सध्या ४.६ टक्के नुकसानीत दिसत असला तरीही सुचविलेली गुंतवणूक ही दीर्घकालीन असल्याने वाचक गुंतवणूकदारांनी गांगरून जाण्याचे काहीच कारण नाही. खरेदी केलेल्या काही शेअर्सचे भाव खाली आले असल्यास आणि त्या कंपन्या दीर्घकालीन गुंतवणुकीस योग्य असल्यास सद्य परिस्थितीत खरेदी करून सरासरी भाव खाली आणू शकता. अशा अनिश्चित बाजारात उत्तम कंपन्यांच्या शेअर्सची टप्प्याटप्प्याने केलेली खरेदी फायद्याची ठरू शकते. २०१९ या नवीन वर्षांतील निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत शेअर बाजाराकड्न फार आशा बाळगू नये. किंबहुना प्रत्येक पडझडीत उत्तम कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचे धोरण ठेवावे. सरत्या वर्षांने आपल्याला काय शिकवले हे लक्षात घेतानाच, ‘माझा पोर्टफोलियो’चे वाचक नवीन वर्षांत चुका टाळून संयम दाखवतील अशी अपेक्षा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 12:03 am

Web Title: best investment options in india 3
Next Stories
1 वर्ष २०१९ : संकल्प कर अनुपालनाचा!
2 कुणी रखडती धुळीत आणिक कुणास लाभे हेम!
3 इकडे आड, तिकडे विहीर
Just Now!
X