|| अजय वाळिंबे

सध्या शेअर बाजारात ‘सेल’ चालू आहे. अनेक उत्तम कंपन्यांचे शेअर्स आकर्षक दरात उपलब्ध आहेत. आज सुचविलेला गुजरात अल्कलीज हा असाच एक शेअर. भारतातील कॉस्टिक सोडय़ाचे उत्पादन करणारी ही सर्वात मोठी कंपनी १९७३ पासून कार्यरत आहे. गेल्या ४५ वर्षांत कंपनीने आपली उत्पादन क्षमता ३७,४२५ टनांवरून ४,२९,०५० टनांपर्यंत वाढवली आहे. कंपनीचे दोन अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प गुजरात राज्यातील बडोदा आणि दहेज येथे आहेत. कॉस्टिक सोडय़ाच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या ऊर्जेसाठी कंपनी बडोदा येथील प्रकल्पात ‘जिप्को’च्या साहाय्याने ऊर्जानिर्मिती करत आहे.

कंपनीचे मुख्य उत्पादन कॉस्टिक-क्लोरिन आहे, याशिवाय कंपनीने सोडियम सायनाइड, क्लोरोमेथेन्स, हायड्रोजन पेरोक्साइड, पोटॅशियम काबरेनेट, फॉस्फोरिक अ‍ॅसिड इत्यादी मूल्यवर्धित उत्पादनांसह विविधता वाढविली आहे. ही मूल्यवर्धित उत्पादने कंपनीला सायक्लिकल चढ-उतारांविरुद्ध हेजिंगद्वारे उपयोगी ठरतात. गुजरात अल्कलीज्ची आज २४ उत्पादने आहेत. कंपनीचे कॉस्टिक-क्लोरिन उद्योगातील बाजारपेठेत १६ टक्के हिस्सा असून आज कंपनी मार्केट लीडर म्हणून ओळखली जाते.

डिसेंबर २०१८ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने उलाढालीत ३२.१६% वाढ दाखवून ती ८१६.२६ कोटीवर गेली आहे, तर याच कलावधीसाठी १६२.२८ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो ४५% अधिक आहे.

अत्यल्प कर्ज आणि पुस्तकी मूल्यापेक्षाही कमी किमतीत उपलब्ध असलेला गुजरात अल्कलीजचा शेअर खरेदीसाठी आकर्षक वाटतो. अर्थात या क्षेत्रातील कंपन्यांचे समग्र पी/ई गुणोत्तर आणि सध्याची शेअर बाजाराची अवस्था पाहता हा शेअर अजूनही खाली येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक बाजार उताराच्या संधीला हा शेअर खरेदी करण्याचे धोरण ठेवावे.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.