|| वसंत कुलकर्णी

आर्थिक क्षेत्रातील व्यक्ती आणि घटना यांची दखल घेणारे साप्ताहिक सदर..

आदरणीय पुलं,

तुमचा उल्लेख ‘पुलं’ तुमच्या नावातील दोन आद्याक्षरांनी करावा इतके प्रेम सर्वानी तुमच्या निर्मितीवर केले. महाराष्ट्रातील लाखोंना तुमच्या माझ्यातील संवाद मुखोद्गत आहेत. आज एका यात्रा कंपनीने ‘भ्रमणमंडळ’ हा ब्रॅण्ड बनविला आहे. साहजिकच तुमचा मानसपुत्र या नात्याने तुमची जन्मशताब्दी साजरी करताना आनंद होत आहे. कुठल्याही पुत्राला आपल्या जन्मदात्याचे संवत्सर वर्ष साजरे करण्यास बाह्य़ जीवनसत्त्वाची गरज नसते. तुम्ही मला आप्पा बळवंत चौकातील गटणे वाडय़ातून प्रसिद्ध केल्याने मला तुमची जन्मशताब्दी साजरी करण्यास विशेष आत्मीयता वाटत आहे. तुमची जन्मशताब्दी शासकीय पातळीवर सुरूच आहेच, ‘लोकसत्ता’सारख्या दैनिकाने तुमचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करून तुम्हाला आदरांजली वाहिली. महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्त्वातील वल्लीपण सर्वाना भावल्याने तुमची जन्मशताब्दी महाराष्ट्रात अनेक जण तुम्ही काही त्यांच्या घरातील सदस्य असल्यागत साजरी करीत आहे.

गिरगांवातून जाणारी ट्राम बंद होऊन अर्धे शतक लोटले. आताच्या गिरगांवात मेट्रोचे काम सुरू असल्याने अनेक रस्ते बंद आहेत. ‘चाळीं’चे अपार्टमेंट होऊन काळ लोटला. आता अपार्टमेंटसुद्धा पुनर्निमाणाच्या प्रतीक्षेत आहे. मायबाप सरकारने निवडणुकांच्या तोंडावर ‘सीआरझेड’ नियमांत शिथिलता आणल्याने वर्षभरात बटाटा टॉवरचे काम सुरू होईल. बबलीबायच्या पाटल्या मारवाडय़ाकडे गहाण पडल्याची बातमी गहाणखतावरची शाई वाळण्याआधी चाळीभर पसरली. पण आज मुलगी पाहायला गेल्यावर भावी जावयाच्या घरासकट घरातील कुठली गोष्ट कोणाकडे गहाण असेल याचा अंदाज लागत नाही. आज राहते घर, घराखालील उभी असलेली गाडी घरातील दैनंदिन वापराच्या वस्तू सगळेच ‘सुलभ हप्त्या’वर असल्याने, सगळंच गहाण पडलेलं असतं. शेअर बाजार ही दिवाळं काढण्याची जागा नसून दीर्घकालीन गुंतवणूक करून संपत्ती निर्मिती करण्याची जागा आहे यावर या मंडळींचा आताशा विश्वास बसला आहे. चाळीतील मंडळी गच्ची कोणाची हा वाद न घालता कोणत्या फंडातील ‘एसआयपी’ अधिक लाभदायक यावर वाद घालतात. कोणता शेअर घेतल्यापासून खालीच चालला आहे याची दबक्या आवाजात चर्चा करतात. हे वाद नळावर किंवा संडासाच्या लायनीत उभे राहून न होता व्हॉटसअप ग्रुपवर होत आहेत. नाथा कामतचीच गोष्ट घ्या. एलफिन्स्टन आणि लोअर परेल या स्टेशनांवर ‘नाथा’ला कोणी ‘जीव लावणारी’ भेटली नाही अशी तुम्ही तक्रार केलीत. एलफिन्स्टनचे प्रभादेवी आता झालंय. ‘नाथा’ आज त्या वयात असता तर त्याला प्रभादेवी आणि लोअर परेल सोडून मुंबईभर पायपीट करण्याची गरज भासली नसती. कार्यालयात जायच्या सुटायच्या वेळी मुंबईतील तमाम ‘सृष्टीसौंदर्य’ या दोन रेल्वे स्टेशनांवरच एकवटलेले असते.

तुमच्या जडणघडणीत वाटा असलेले ‘मंदिर’ आज शताब्दीच्या उंबरठय़ावर उभे आहे. पाल्र्यातील मुलांना ‘घडविण्याचे’ व्रत घेतलेले कार्यकर्ते पाल्र्यात अजूनसुद्धा आहेत. मुलांच्या बरोबर मध्यम वयाच्या मंडळींना सुद्धा शहाणे करण्याचे व्रत घेतलेली मंडळी निष्ठेने दर रविवारी एकत्र जमून अर्थसाक्षरतेचे वर्ग भरवत आहेत. उभ्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत वेगाने बदल घडत आहेत. या बदलांपैकी बदलत्या अर्थसंस्कृतीची ओळख वर्षभर मी करून देणार आहे. ‘कुणी सखे न सोबती कुणी इथे कुणी तिथे’ या उक्तीप्रमाणे सदरांत आर्थिक क्षेत्रातील नामांकित व्यक्तींचे व्यक्तीचित्रण असेल. तुम्ही जशी फणसाळकर मास्तरांची ओळख करून दिलीत तसे तुमच्या मंदिरातील त्याच निष्ठेने काम करणारे कोणी असतील. ‘ब्रॅण्ड पुणे’ असलेले मिलिंद बर्वे, ‘आरएम’पासून ते ‘सीइओ’पर्यंतचा पल्ला यशस्वीपणे गाठलेले कैलाश कुलकर्णी यासारखी म्युच्युअल फंड व्यवसायातील नामांकित व्यक्तिमत्त्वे असतील. तुम्ही चितारलेल्या ‘ऋग्वेदी’चे पणतू आणि ९० हजार कोटींचा ताळेबंद असलेली कंपनी समर्थपणे सांभाळणारे दीनानाथ दुभाषींसारख्या ‘गणगोतां’ची महती असेल. विमा क्षेत्रात असूनही देव टाकीच्या पाण्याइतके मनाने निर्मल असलेले नीलेश साठे यांचे ‘गुण आवडीने गाईन’.. आर्थिक क्षेत्रातील घडामोडींवर ‘बिन पैशाचा तमाशा’ असेल. एखादी सुंदर ‘रविवारची सकाळ’ असेल. या व्यवसायाच्या निमित्ताने संपर्कात आलेल्या आणि लक्षात राहिलेल्या ‘वल्ली’ असतील

तुमच्या शिकवणीनुसार कोणाला शब्दांनी बोचकारले तरी त्याच्या मनावर ओरखडा उठणार नाही याची काळजी नक्कीच घेईन. तुमच्या साहित्यात मला जीवनविषयक तत्त्वज्ञान सापडले. आजच्या पिढीच्या बदलत्या जाणिवांना साजेसे आर्थिक तत्त्वज्ञान सापडणे गरजेचे आहे. तुमच्या शताब्दीचा आधार घेत जिज्ञासू वाचकांना अर्थसाक्षर करण्याचा हा एक प्रयत्न असेल. तुमच्या शताब्दीनिमित्ताने सुरू होणाऱ्या या सदरातून कुणाला अर्थविषयक तत्त्वज्ञान सापडले तर तुमची शताब्दी साजरी करण्यासाठी केलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटेल.

आपला मानसपुत्र,

सखाराम अप्पाजी गटणे

shreeyachebaba@gmail.com