|| आशीष ठाकूर

आठवडय़ाच्या पूर्वार्धात निफ्टीवरील १०,७०० चा स्तर तोडला गेला आणि आता निफ्टी १०,५०० पर्यंत खाली घरंगळत येणार असे वाटत असतानाच, निफ्टीने १०,७००च्या वर साप्ताहिक बंद दिला. परिणामी तेजीची धुगधुगी मात्र कायम राखली गेली आहे.

येणाऱ्या दिवसात निर्देशांकांनी सेन्सेक्सवर ३५,५०० व निफ्टीवर १०,७०० चा स्तर टिकवण्यात निर्देशांक यशस्वी ठरला तर प्रथम वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३६,३०० व निफ्टीवर १०,८५० ते १०,९०० व नंतरचे लक्ष्य सेन्सेक्सवर ३७,१७० व निफ्टीवर ११,१०० असेल. अन्यथा सेन्सेक्स ३५,६०० व निफ्टी १०,७००चा स्तर टिकवण्यात अपयशी ठरल्यास सेन्सेक्स ३५,००० व निफ्टी १०,५०० पर्यंत खाली येऊ शकते. आता आपण महत्त्वाच्या विषयाकडे / माहितीकडे वळणार आहोत व त्या माहितीचे पृथक्करण करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

नुकतीच म्युच्युअल फंड उद्योगाची संघटना ‘अ‍ॅम्फी’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, नवीन ‘एसआयपी’ खात्यांच्या संख्येत चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या नऊ महिन्यांत ६१ टक्कय़ांनी घट झाली आहे व त्या बरोबरच ‘एसआयपी’ खाती खंडित होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. गुंतवणूकदारांचा मानसिक कल हा रोकड राखून ठेवण्याकडे आहे. गुंतवणूकदारांनी असा टोकाचा निर्णय घेण्याअगोदर जरा इतिहासात डोकावून पाहू या.

ऐंशीचे दशक हे राजकीय, आर्थिक व सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताच्या अखंडत्वाला चहूबाजूंनी आव्हान दिले गेलेला कालखंड आहे. उत्तरेकडे पंजाबमधील फुटीरतावादी खलिस्तान चळवळ, ती मोडून काढण्यासाठी अतिरेक्यांनी गड केलेल्या सुवर्णमंदिरात लष्करी कारवाई करावी लागली, त्याचा परिणाम तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यांचे मारेकरी हे त्यांचेच अंगरक्षक सतवंतसिंग व बियांतसिंग हे शीख समाजाचे असल्याने नंतरच्या जनक्षोभातील दंगलीत दिल्लीत शिखांचे हत्याकांड झाले. ईशान्यपूर्व राज्यात आसाममध्ये भूमिपुत्रांना डावलण्यात येत असल्याने आसाम विद्यार्थी परिषदेची चळवळ, मिझोराममध्ये लालडेंगाची चळवळ तर दक्षिणेला श्रीलंकेतील तमिळी वाघांचा नेता प्रभाकरन याच्या दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी श्रीलंकेच्या लष्कराची कारवाई, त्यामुळे तेथील तामिळांचे समूह तामिळनाडूत निर्वासित म्हणून धडकत होते. अशी भारताच्या अखंडत्वाला उत्तर, पूर्व व दक्षिणेकडून आव्हान देणारी भीषण परिस्थिती त्या काळात होती, व त्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या.

आता जे पैसे असून गुंतवणूक टाळत आहेत, ती मध्येच मोडत आहेत, गुंतवणूक न करण्याची हजार कारणे देत आहेत. त्यांनी आताची तुलना १९८४ सालाशी जरूर करावी. मग जाणवेल आता आपण किती सुस्थितीत आहोत. किंबहुना १९८४ व २०१९ ची तुलनाच होऊ शकत नाही. पण ज्यांनी १९८४ सालच्या लोकसभेच्या निवडणुकांअगोदर, त्या वेळच्या अस्थिर वातावरणात गुंतवणूक केली, ती सूर्योदयापूर्वीच्या अंध:कारातील गुंतवणूक होती, त्या नंतरचा उष:काल होता होता.. अल्पावधीत त्यांना किती घसघशीत नफा मिळाला ते पुढल्या लेखात जाणून घेऊ या.

ashishthakur1966@gmail.com