News Flash

स्वानुभव हीच सर्वात मोठी शिकवणी

पैशाबद्दल आकर्षण सर्वानाच असते. मनाशी पक्की केलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी गाठीशी पैसा हवाच.

पैशाबद्दल आकर्षण सर्वानाच असते. मनाशी पक्की केलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी गाठीशी पैसा हवाच. पण पैशाने पैसा वाढवत नेण्याचे म्हणजेच गुंतवणुकीचे काहींचे प्रयत्न सफल ठरतात, तर काहींच्या बाबतीत तसे घडतेच असे नाही. कुणी बँक एफडी, सोने-अडके, जमीन जुमल्यात पैसा गुंतवला असेल, तर कुणी शेअर बाजार, म्युच्युअल फंडांचा मार्ग निवडला असेल, तर काहींना विम्याची पॉलिसी, पीपीएफमधील गुंतवणुकीचा मार्ग फलदायी ठरला असेल. गुंतवणुकीच्या या आपल्या प्रयत्नांतील यश-अपयशाची ही अभिव्यक्ती दर पंधरवडय़ाला तुमच्याच शब्दांत..

मी कला शाखेची विद्यार्थिनी, त्यामुळे जमा-खर्च-बचत असे फार काही मला कळत नव्हते; पण बचत करायलाच हवी हे जाणून होते. पहिली नोकरी लागल्यानंतर, म्हणजे साधारणत: १२ वर्षांपूर्वी मी घरातील मोठय़ांच्या मार्गदर्शनाने बँकांच्या मुदत ठेवी, आयुर्विमा योजनांमधून गुंतवणूक करायला सुरुवात केली.

स्थिर उत्पन्नाबरोबरच बचतीची नियमित सवय अंगवळणी पडावी म्हणून मी जुलै २०१४ पासून म्युच्युअल फंड पर्यायाकडे वळले आणि ‘एसआयपी’ सुरू केली. फंडाचे कार्य कसे चालते, त्यातून नफा किती व कसा होतो हे सारे माझ्यासाठी फार महत्त्वाचे नव्हते. कदाचित ते मला कळलेही नसते; पण नियमित बचत व्हावी म्हणून फंडात ‘एसआयपी’चा मार्ग स्वीकारला.

मला सोने आणि घर यातील गुंतवणुकीतून अधिक परतावा मिळतो, असे सुरुवातीला वाटे. मी एका आंतरराष्ट्रीय औषधनिर्मिती कंपनीत सेवेत आहे. त्यामुळे वित्त क्षेत्रातील घडामोडी, योजना, उत्पादने याबाबतच्या माहितीसाठी फार अद्ययावत नसते. मात्र कार्यालयातील सहकाऱ्यांच्या चर्चेतून, प्रसारमाध्यमातील मार्गदर्शनातून मी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे निश्चित केले.

माझी गुंतवणूक असलेल्या म्युच्युअल फंडातून मला निश्चितच लाभ झाला आहे. मात्र त्यापेक्षाही मला बचतीची एक नियमित सवय लागली हे अधिक महत्त्वाचे. यातून मध्यंतरी जमा झालेल्या काही एकरकमी निधीचाही मला उपयोगही झाला. माझ्या मते, जोखीम तर साऱ्याच गुंतवणुकीत आहे. अनेक पर्यायांमध्ये ती कमी-अधिक आहे. मात्र नियमित बचतीची सवय आणि तीही तरुण वयापासून करणे आणि पुढे छोटे कुटुंब (पती, मुलगा व सासू) असताना आव्हानात्मक असले तरी ती सुरू ठेवणे आवश्यक आहे.

आर्थिक उद्दिष्टाप्रमाणे तीन वेगवेगळ्या प्रकारच्या फंडांची निवड करून मी त्यात दरमहा ८,००० रुपये गुंतवण्यास सुरुवात केली. नोटाबंदीमुळे २०१६-१७ मध्ये बाजारात आलेल्या मंदीमुळे काहीशी चिंता वाटू लागली; पण तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक सुरूच ठेवली आणि या आलेल्या अनुभवामुळे गेल्या वर्षभरात भांडवली बाजारात पडझड होऊनदेखील विश्वास मात्र डळमळीत झाला नाही. एवढेच नाही तर पतीनेही करबचतीसाठी म्युच्युअल फंडाच्या ‘ईएलएसएस’ प्रकारात गुंतवणुकीस सुरुवात केली आहे. त्या गुंतवणुकीचा परतावा आजही बाजारात मंदी असूनही वार्षिक १० टक्क्य़ांच्या आसपास आहे. यामधूनच माझ्या दीर्घकाळ गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित होते.

नियमित होणाऱ्या बचतीच्या सवयीमुळे खर्चावर नियंत्रण राखता येते हे मी माझ्या गुंतवणुकीतून शिकले. Experience makes man Perfect या उक्तीप्रमाणे बाजारात चढ-उतारांचा अनुभव घेऊ न आज मी सक्षमपणे नोकरी आणि घरातील जबाबदारीबरोबरच, कुटुंबाच्या गुंतवणुकीची जबाबदारीही व्यवस्थितरीत्या हाताळत आहे.  – तृप्ती तावडे, शीव-धारावी, मुंबई

तज्ज्ञ टिप्पणी : बाजारात कितीही पडझड झाली तरी न डगमगता आपल्या वित्तीय उद्दिष्टांशी प्रामाणिक राहून गुंतवणूक सुरू ठेवणे हे नेहमीच फायद्याचे ठरते. गुंतवणुकीतील सातत्य खूपच महत्त्वाचे आहे. दुसरे म्हणजे तृप्ती तावडे या स्वत: गुंतवणुकीबाबत माहिती आणि ज्ञान मिळवीत गेल्या. स्वानुभवातून मिळालेली ही शिकवण फार मोलाची आहे. अशी शिकवण गुंतवणुकीबाबत आपल्या गैरधारणा आणि भीती दूर करण्यास मदतकारक ठरतात.  – सुयोग काळे (आर्थिक सल्लागार)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2019 12:08 am

Web Title: best investment options in india 7
Next Stories
1 कालच्या चुका, आजचं शहाणपण आणि उद्याचं पाऊल!
2 वित्तीय तूट
3 ट्राम गेली, मेट्रो आली!
Just Now!
X