|| वसंत कुलकर्णी

कोणत्याही रोख्याला ‘ट्रिपल ए’वरून ‘डी’ होण्यास किमान तीन वर्षे लागली असती ही सहा पायऱ्यांची पत घसरण ७२ तासांतच झाली. हे सगळ्यांना चक्रावून टाकणारे आहे. कोणत्याही बाजारात व्यवहारात जोखीम असतेच आणि डेट फंडही त्याला अपवाद नाहीत, हेच खरे..

ध्रुव पावशेचा मोबाइल किणकिणला. मोबाइलच्या पडद्यावर ‘समेळ अंकल’ अशी अक्षरे दिसू लागताच यांचा सकाळी कशाला फोन आला असा विचार ध्रुव पावशेच्या मनात येऊन गेला. चाळीतील रहिवासी ‘अपार्टमेंट’मध्ये आले तरी जुन्या चाळकऱ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप असल्याने एकमेकाशी संवाद शक्यतो जीभेऐवजी हाताच्या अंगठय़ानेच होत असे. त्यात समेळ अंकलना सतत तांबुल सेवन करण्याची सवय असल्याने, तोंड उघडण्याऐवजी ‘अंगुष्ठी संवादा’वर त्यांचा भर असे. ध्रुव पावशेने फोन उचलला आणि त्याला उलगडा झाला. समेळ अंकलच्या फोनवरून आंटींनी फोन केला होता. त्यांनी रविवारी सकाळी चहा आणि ब्रेकफास्टलाच ये असा त्यांनी आग्रह धरला. अंकल आंटींनी इतक्या तातडीने का बोलावले असेल असा प्रश्न ध्रुव पावशेला पडला होता.

हे समेळ अंकल म्हणजे जुन्या चाळीच्या तळमजल्यावरच्या ‘धी न्यू गजकर्ण औषधालया’चे मालक मुकुंद गणाजी समेळ यांचे नातू. अंकलच्या तीर्थरूपांनी आपल्या पारंपरिक ‘धी न्यू गजकर्ण औषधालया’चे रूपांतर फार्मसीत केले तर अंकलनी बी फार्मची पदवी घेतली आणि पारंपरिक धंद्याला आधुनिकतेची जोड दिली, धंदा वाढवला, किरकोळ विक्रीच्या जोडीला काही कंपन्यांची एजन्सी घेतली आणि गिरगावाच्या आजूबाजूच्या मोठय़ा रुग्णालयांच्या फार्मसींना ते औषध पुरवठा करीत. चार पैसे हातात राखून असल्याने आणि ‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’चे नियमित वाचक असल्याने त्यांनी धंद्यातील अतिरिक्त रोकड लिक्विड फंडात गुंतवावी असे वाचल्याने त्यांनी काही पैसे ‘डेट फंडां’त गुंतविले होते. डेट फंडातील गुंतवणुकीवर नुकसान दिसू लागल्याने हवालदिल झालेल्या अंकल आंटीनी ध्रुव पावशेला ब्रेकफास्ट आणि चहाला पाचारण केले होते. ध्रुव पावशेला मिसळ प्रिय असल्याने ‘विनय’च्या मिसळीचे पार्सल मागवले होते.

अंकलने केलेला पाहुणचार पाहून ध्रुव खुशीत येत म्हणाला, ‘‘खरं आहे तुमचे अंकल, डेट फंडातील गुंतवणुकीवर तोटा झाल्याने अनेक रोकड सुलभता बाळगणाऱ्या कंपन्यासुद्धा हवालदिल झाल्या आहेत. कारण या कंपन्यांना रोखे गुंतवणुकीत तोटा हा प्रकार माहीत नव्हता. सर्वच चाळकरी चिराबाजारात जाऊन हिरा कोळणीकडून मासळी घेत. तुम्हाला हा भांडवली बाजार हा चिराबाजारातल्या मासळी बाजारासारखा वाटला. हिराच्या नातीवर भरवसा ठेवून एक वेळ पापलेट खरेदी करा पण गुंतवणूक करताना अंध:विश्वास ठेवू नका. अनेक मोठय़ा फंड घराण्यांकडून नेमकी हीच चूक घडली. एखादा व्यवहार होण्यापूर्वी सौदापूर्व पडताळणी (डय़ू डिलिजन्स) केली जाते. ते करण्यात त्रुटी राहून गेल्याची कडू फळे गुंतवणूकदारांना भोगावी लागत आहेत.’’ ध्रुव पावशेने एका दमात माहिती दिली.

‘‘अंकल, कोणत्याही बाजारातील व्यवहारात जोखीम असतेच. काळ्या पाठीचा हलवा ताजा फडफडीत म्हणून घ्यावा आणि शिजल्यावर आमटीत त्याचे तुकडे झाले की ताज्या म्हणून घेतलेल्या हलव्याच्या शिळ्या कढीला ऊत आणल्याचे दु:ख होते. भांडवली बाजारातसुद्धा असे कधी तरी होते. या फंडांनी आयएलएफएसचे ‘ट्रिपल ए’ ही सर्वोच्च पत असलेल्या रोख्यांची पत ‘डी’ (डिफॉल्ट) झाली. शुक्रवारी बाजार बंद होताना ‘ट्रिपल ए’ असलेला रोख सोमवारी बाजार उघडताना त्याची पत ‘डी’ झाली. सामान्यपणे सहा महिन्यांतून एकदा रोख्यांचे पत निर्धारण होते. कोणत्याही रोख्याला ‘ट्रिपल ए’वरून ‘डी’ होण्यास किमान तीन वर्षे लागली असती, ही सहा पायऱ्यांची पत घसरण ७२ तासांतच झाली. हे सगळ्यांना चक्रावून टाकणारे आहे,’’ ध्रुव पावशे सुसाट वेगाने माहिती देत होता. .

‘‘म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजार जोखमींच्या अधीन असते, असे सेबी नेहमीच सांगते. या वैधानिक इशाऱ्याकडे गुंतवणूकदार आणि सवंग विक्रेते कायम दुर्लक्षच करीत आले आहेत. ‘क्रेडिट रिस्क’ म्हणजे रोख्याची पत कमी होण्याचा धोका, ‘लिक्विडिटी रिस्क’ म्हणजे तुम्ही खरेदी केलेला रोख्याला खरेदीदार ना मिळण्याचा धोका, जसे की सध्या डीएचएफएलच्या रोख्यांना १३ टक्के परतावा असूनही कोणी खरेदीदार नाही. एखाद्या प्रवर्तकाच्या समभागांच्या किमतीत घसरण झाल्याचा रोख्यांच्या किमतींवर परिणाम होण्याचा धोका. जसे की येस बँकेच्या काही समूह कंपन्यांनी आणि झी समूहाच्या कंपन्यांनी आपली मातृकंपनी असलेल्या येस बँकेचे आणि झी एन्टरटेनमेंटचे समभाग तारण ठेवून कर्ज उचल केली. बाजारात काही कारणांनी येस बँक आणि झीच्या समभागांची घसरण झाल्याचा फटका या कंपन्यांच्या उपकंपन्यांना बसला. परिणामी ज्या म्युच्युअल फंडांनी या उपकंपन्यांच्या कर्ज रोख्यांत गुंतवणूक केली होती त्यांना या रोख्यांचे पैसे मुदतपूर्तीनंतर वेळेत मिळाले नाहीत तर पैसे बुडाले असे समजून सेबीच्या नियमांनुसार तितक्या रकमेची तरतूद करावी लागली. परिणामी फंडांच्या ‘एनएव्ही’त घट झाल्याने गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागला. भविष्यात, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजार जोखमींच्या अधीन असते या वाक्याची अनेकांना आठवण होईल.’’

‘‘आम्ही डेट फंडात आमच्याकडची अतिरिक्त रोकड गुंतवण्यात चूक केली काय,’’ समेळ आंटी अवसान गोळा करीत म्हणाल्या.

‘‘आंटी, जे घडले त्यामुळे अनेक फंड घराण्यांचे पितळ उघडे पडले. अनेक मोठी फंड घराणी आपली ‘क्रेडिट अ‍ॅनालिसिस’ करण्याची पद्धत आणि आपल्याकडे असलेली ‘क्रेडिट अ‍ॅनालिसीस’ची संख्या असले दावे पोकळ होते हे लक्षात आले.’’

काही फंड घराण्यांनी पैसे बुडाले असे कळूनदेखील आपल्या खास गुंतवणूकदारांच्या हितास बाधा येऊ नये म्हणून आपल्या फंडांच्या एनएव्हीत लगेचच घट न केल्याने या गुंतवणूक केलेल्या खास गुंतवणूकदारांना तोटा न होता पैसे काढून घेता आले. या रोखे गुंतवणुकीतील नुकसानीचा हा फटका लहान गुंतवणूकदारांना सोसावा लागत आहे. फंड घराण्यांनी लगेचच एनएव्हीत घट न केल्याचा हा निष्काळजीपणा नसून ठरावीक गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे हा हेतू असावा अशी शंका यावी असे हे वर्तन आहे. बाजार पडझडीने आधीच त्रस्त झालेल्या या फंड घराण्यांची उरलीसुरली विश्वासार्हता कशीबशी टिकून ठेवणे मोठय़ा फंड घराण्यांना कठीण झाले आहे. रोखे गुंतवणुकीसाठी फंड निवड करताना समभाग गुंतवणुकीसाठी फंड निवड करताना घेतल्या जाणाऱ्या काळजीपेक्षा अधिक काळजी घेणे गरजेचे असते. माध्यमातील बातम्यांच्या आधारे यूटीआय डायनॅमिक बाँड फंड, यूटीआय बँकिंग अ‍ॅड पीएसयू डेट फंड, एचडीएफसी डायनॅमिक बाँड फंड, आदित्य बिर्ला सनलाईफ मीडियम टर्म प्लान, या फंडांची मालमत्तेच्या पाच टक्कय़ांहून अधिक रक्कम या कलंकित रोख्यांत गुंतवलेली असल्याने या फंडांत गुंतवणूक असलेल्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. अनेक आकाराने लहान असलेले रोखे गुंतवणूक फंड यात अडकलेले नाहीत. विमा कंपनीने प्रवर्तित केलेल्या फंड घराण्याच्या एकही फंडाची ‘झी’शी संबंधित रोख्यांत गुंतवणूक नाही हे तुम्हाला माहीत आहे काय? अशी किती तरी फंड घराणी आहेत ज्यांनी या कलंकित रोख्यांत गुंतवणूक करणे टाळले आहे. हे कशाचे द्योतक आहे? ‘‘‘झी’शी संबंधित रोख्यांची मुदत मार्च २०२० ते एप्रिल २०२१ दरम्यान असल्याने तोपर्यंत हे पैसे मिळतील किंवा नाही या बाबत खात्रीशीर सांगता येत नाही,’’ ध्रुव पावशे माहिती देत म्हणाला.

‘‘एखाद्याच्या पोर्टफोलिओत डेट फंडातील गुंतवणूक किती असावी,’’ समेळ अंकलनी तांबुल थुंकून विचारले.

‘‘अंकल, कधी तरी कोलंबी बाधते आणि एका चविष्ट बांगडय़ाच्या प्रेमात पडल्याने आपले कसोटी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकरांना कसोटी सामन्याला मुकावे लागले होते. म्हणून त्यांनी बांगडा खाणे सोडले असेल असे वाटते काय तुम्हाला? डेट फंडांना गुंतवणुकीतून हद्दपार करता येणार नाही. डेट फंडात गुंतवणूक करणे अनेकदा टाळले जाते हे माझे दु:ख आहे. त्या शिवाय पोर्टफोलिओला आधार कसा मिळणार? सध्याच्या भांडवली बाजाराच्या अस्थिर परिस्थितीत डेट फंड गुंतवणुकीत हवेच. फंड निवडताना विशेष दक्षता बाळगणे गरजेचे आहे,’’ ध्रुव पावशेने समेळ अंकलना आश्वस्त केल्याने समेळांनासुद्धा रविवारची सकाळ ‘माघामधली प्रभात सुंदर’ भासू लागली.

shreeyachebaba@gmail.com