|| आशीष ठाकूर

अतिवेगवान गाडीला थांबवण्याचा वा अकस्मात ब्रेक लावण्याचा प्रयत्न केल्यास ती तात्काळ न थांबता पुढे काही अंतर चालून जाऊन थांबते. अगदी त्याप्रमाणे पूर्ण तेजीत असलेला बाजार मंदीत येण्यास थोडा वेळ हा लागणारच; पण मधल्या वेळेत वाचकांच्या मनाची तयारी करण्यासाठी गेल्या लेखात ‘फेबुनासी कालमापन’ पद्धतीचा आधार घेत निर्देशांकाच्या उच्चांकाची शक्यता व्यक्त केली होती. त्याप्रमाणे ७ ते ११ जानेवारी हा महत्त्वपूर्ण कालावधी बाजारातील तेजीच्या धारणेला कलाटणी देणारा ठरेल आणि त्या वेळेला निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३६,००० ते ३६,६००, तर निफ्टीवर १०,८०० ते ११,००० असे असेल. गेल्या लेखातील हे विधान काळाच्या कसोटीवर तपासता बरोबर बुधवारी ९ जानेवारीला सेन्सेक्सवर ३६,२७० व निफ्टीवर १०,८७० चा उच्चांक मारून नंतर निर्देशांकांच्या घसरणीला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव

  • सेन्सेक्स: ३६,००९.८४
  • निफ्टी: १०,७९५.००

येणाऱ्या दिवसांत सेन्सेक्सवर ३६,३०० व निफ्टीवर १०,९००चा स्तर केंद्रबिंदू ठेवून या स्तरावर निर्देशांक सातत्य राखून टिकल्यास निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३६,६०० ते ३७,००० व निफ्टीवर ११,००० ते ११,२०० असेल. अन्यथा सेन्सेक्स ३६,३०० व निफ्टी १०,९०० स्तराखाली आल्यास निर्देशांकावर एक संक्षिप्त घसरण अपेक्षित असून तिचे प्रथम खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३५,६०० व निफ्टीवर १०,७०० व नंतर ३४,९५० / १०,४५० असे असेल.

आता आपण बाजारातला त्रिवेणी संगमातील दुसऱ्या कारणाकडे वळू या. ते म्हणजे.. इतिहासात डोकावून पाहता निर्देशांकाचा उच्चांक हा बहुतांश वेळेला जानेवारी महिन्यात होतो. तांत्रिक विश्लेषणात नेहमीच ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ होत असते. या गृहीतकात जानेवारीबरोबर फेब्रुवारी महिन्याची जोड दिल्यास या दोन महिन्यांत ऐतिहासिक उच्चांक होतात हे खालील उदाहरणावरून स्पष्ट होईल.

  • फेब्रुवारी २००० साली माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या (डॉटकॉम बुम / केतन पारेख घोटाळा) तेजीत सेन्सेक्सचा उच्चांक ६,१५० व निफ्टीवर १,८१८ असा होता.
  • जागतिक वित्तीय अरिष्टाच्या अगोदर १० जानेवारी, २००८ ला सेन्सेक्सचा उच्चांक २१,२०६ व निफ्टीवर ६,३५७ होता.
  • अगदी अलीकडे गेल्या वर्षी २९ जानेवारी २०१८ ला सेन्सेक्सवर ३६,४४३ व निफ्टीवर ११,१७१ उच्चांक नोंदवला गेला.
  • या महत्त्वाच्या घटनांव्यतिरिक्त ३० जानेवारी २००४ ला सेन्सेक्सवर ६,२४९ व निफ्टीवर २,०१४ उच्चांक नोंदवला गेला. फेब्रुवारी २०१२ ला सेन्सेक्सवर १८,५२३ व निफ्टीवर ५,६२९ उच्चांक नोंदवला गेला.
  • १ फेब्रुवारी २०१३ ला सेन्सेक्सवर २०,२०३ व निफ्टीवर ६,१११ उच्चांक नोंदवला गेला.
  • ३० जानेवारी २०१५ सेन्सेक्सवर २९,८४४ व निफ्टीवर ८,९९६ चे उच्चांक नोंदवून बाजारात घातक उतार आले आहेत.

सध्या आपण जानेवारी महिन्यातच असल्याने आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होणार का, हाच काय तो प्रश्न.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.