|| अनुराधा सहस्रबुद्धे

मागील महिन्यात ‘लोकसत्ता’चे वाचक दशरथ ननावरे यांनी निवृत्तीपश्चात नियोजनासाठी माझी भेट घेतली होती. निवृत्तीपश्चात मिळालेल्या ३५ लाखांचे नेमके नियोजन कसे करावे, हा त्यांचा प्रश्न होता.

कौटुंबिक पार्श्वभूमी: दशरथ ननावरे (६०) त्यांची पत्नी संध्या (५७) आणि मुलगा अपूर्व (२५) हे सध्या एकत्र राहतात. मोठा मुलगा, त्याची पत्नी आणि दीड वर्षांचा मुलगा हे स्वतंत्र राहतात. दशरथ ननावरे यांची वित्तीय ध्येये खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली.

१. सेवानिवृत्तीपश्चात मासिक खर्चासाठी नियमित उत्पन्नासाठी गुंतवणूक

२. अपूर्वच्या लग्नाच्या खर्चाच्या तरतुदीसाठी गुंतवणूक

३. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एक युरोप टूरसाठी तरतूद

४. दर वर्षी पर्यटनासाठी वार्षकि किमान ५० हजार उत्पन्न असेल इतक्या रकमेची तरतूद करणे.

दशरथ ननावरे यांना निवृत्तीपश्चात मिळालेल्या ३५ लाखांव्यतिरिक्त १२ लाखांची बचत, पीपीएफ, बँकेच्या मुदत ठेवी आणि म्युच्युअल फंडांच्या ईएलएलएसएसच्या गुंतवणुकीच्या रूपात असून ही गुंतवणूक येत्या दोन ते पाच वर्षांत रोकडसुलभ होईल.

वित्तीय नियोजकाचा सल्ला: सर्वसामान्यपणे ३०-३५ वर्षांच्या नोकरीपश्चात मिळणारी पीएफ, ग्रॅच्युइटी, अर्जति रजेचा पगार इत्यादी मिळणारी रक्कम पुरेशी आहे, असा अनेकांचा समज असतो. निरामय निवृत्त जीवनासाठी वास्तवात जितकी रक्कम सेवानिवृत्तीला मिळते तितकीच रक्कम सेवानिवृत्त होताना बचतीच्या रूपात उपलब्ध असणे गरजेचे असते. या वास्तवाकडे दुर्लक्ष केल्यामुळे निवृत्तीपश्चात उदरनिर्वाहाच्या खर्चात अनेक तडजोडी कराव्या लागतात. दशरथ ननावरे यांचा सध्याचा मासिक खर्च २५ हजार रुपये आहे. महागाई ८ टक्के दराने वाढली तर हा मासिक खर्च पाच वर्षांनंतर ३६ हजार, दहा वर्षांनंतर ५३ हजार, पंधराव्या वर्षी ८० हजार आणि वीस वर्षांनंतर १.१६ लाख रुपये होईल. महागाईचा दर यापेक्षा अधिक राहिल्यास या खर्चात वरील अंदाजित खर्चापेक्षा अधिक वाढ होईल. भविष्यातील खर्चाचा विचार केल्यास दशरथ ननावरे यांच्याकडे निवृत्तीपश्चात मिळालेली ३५ लाखांची रक्कम पुरेशी नाही.

ननावरे यांच्या गुंतवणुकीवर सध्या ८ टक्के आणि पुढील पंचवीस वर्षांत अपेक्षित उत्पन्न सरासरी ६ टक्के धरल्यास त्यांच्याकडे किमान ६५ लाखांचा निधी असणे गरजेचे होते. उपलब्ध रक्कम पुरेशी नसल्याने वित्तीय ध्येये कमी करणे आवश्यक आहे. युरोप टूर आणि वार्षकि पर्यटन या दोन वित्तीय ध्येयांसाठी सध्याच्या उपलब्ध रकमेत तरतूद करणे शक्य नाही. निवृत्तीपश्चात मिळालेल्या ३५ लाखांचे विभाजन हे ३० लाख मासिक खर्चासाठी नियमित उत्पन्न मिळण्यासाठी गुंतवणूक करणे आणि ५ लाख अपूर्वच्या लग्नाच्या खर्चाच्या तरतुदीसाठी गुंतविण्याचे निश्चित केले.  (खालील फंड निवड चौकट पाहावी.)

जेव्हापासून हायब्रीड इक्विटी फंडांनी मासिक लाभांश जाहीर करण्यास सुरुवात केली तेव्हापासून म्युच्युअल फंड टाळणारे आणि बँक मुदत ठेवीव्यतिरिक्त अन्य गुंतवणूक साधनांचा विचार न करणारे गुंतवणूकदार नियमित उत्पन्नासाठी हायब्रीड इक्विटी फंडांना पसंती देऊ लागल्याचे दिसून आले आहे; परंतु मासिक लाभांश हा फंड घराण्यास वाटेल तेव्हा आणि फंडातील गुंतवणुकीवरील नफ्यातून जाहीर केला जातो,

तर सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लान अर्थात एसडब्ल्यूपीमध्ये गुंतवणूकदारांच्या मर्जीने गुंतवणुकीतून पसे काढले जातात. या दोहोंचा समतोल राखण्यासाठी १५ लाख लाभांश आणि १५ लाख सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लानद्वारे मासिक उत्पन्न मिळेल अशा पद्धतीने गुंतविण्याचा सल्ला दिला आहे. लग्न होण्यास तीन ते चार वर्षांचा कालावधी शिल्लक असल्याने भांडवली वृद्धीसाठी वेगळ्या समभाग फंडांची शिफारस केली आहे.

यानिमित्ताने वॉरेन बफे यांच्या एका वाक्याची आठवण होते. बफे म्हणतात – If you buy things you do not need, soon you will have to sell things you need. युरोप टूर आणि दर वर्षीच्या पर्यटनावर पसे खर्च केले तर म्हातारपणी वित्तीय आणीबाणीस तोंड द्यावे लागेल. सेवानिवृत्ती नियोजन ही पहिल्याच पगारापासून करावयाची गोष्ट आहे ते यासाठीच!

(लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आहेत, akswealth@gmail.com ई-मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल)