|| अजय वाळिंबे

सी. के. बिर्ला समूहाने ऑटोमोबाइल्स, अर्थमूव्हिंग इक्विपमेंट्स, इंजिनीयरिंग प्रॉडक्ट्स, बॉल बेअरिंग्ज, बिल्डिंग मटेरियल्स, केमिकल आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इत्यादीसारख्या विविध प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या औद्योगिक प्रकल्पांची स्थापना केली आहे. ओरिएंट पेपर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड ही याच सुप्रसिद्ध सी. के. बिर्ला समूहातील कंपनी होय. ८० वर्षांपूर्वी म्हणजे १९३९ मध्ये एका पेपर मशीनद्वारे सुरुवात करणारी ही कंपनी आज एक विविध प्रकारचे पेपर उत्पादन करणारी मोठी कंपनी समजली जाते. कंपनी सामान्य लिखाणांच्या पेपरखेरीज छपाईचे तसेच औद्योगिक वापराचे कागद, टिश्यू पेपर तसेच स्पेशालिटी पेपरचे उत्पादन करते. कंपनीचा अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प मध्यप्रदेश येथील अमलईमध्ये असून तेथून विविध प्रकारच्या आणि श्रेणीचे कागदाचे उत्पादन घेतले जाते. कंपनीची पेपर आणि पेपर बोर्ड्सना जगभरात मागणी असून कंपनी आपली उत्पादने आफ्रिका, आखाती देश, बांगलादेश, श्रीलंका तसेच नेपाळ येथे निर्यात करते. सध्या पेपर उद्योगाला बरे दिवस आले आहेत. अपेक्षेप्रमाणे डिसेंबर २०१८ अखेर समाप्त तिमाहीसाठी कंपनीने १९७.२९ कोटी (गेल्या वर्षी १७१.३८ कोटी) रुपयांच्या उलाढालीवर २०.८५ कोटी (गेल्या वर्षी १०.५० कोटी) रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो दुप्पट आहे.

अत्यल्प कर्ज असलेल्या ओरिएंट पेपरचे ‘रिटर्न ऑन इक्विटी (आरओई)’ गुणोत्तर कमी असले तरीही कंपंनीच्या उत्तम आर्थिक कामगिरीमुळे नजीकच्या कालावधीत ते वाढेल अशी अपेक्षा आहे. सध्या पुस्तकी मूल्याच्या अर्ध्या किमतीत उपलब्ध असलेला हा शेअर खरेदीसाठी आकर्षक वाटतो.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.