22 November 2019

News Flash

बिम्स्टेक

आशिया खंडात नव्याने उदयास येत असलेल्या भूराजकीय समीकरणांमध्ये ‘बिम्स्टेक’ देशांचा नव्याने उल्लेख करावा लागेल.

|| कौस्तुभ जोशी

आशिया खंडात नव्याने उदयास येत असलेल्या भूराजकीय समीकरणांमध्ये ‘बिम्स्टेक’ देशांचा नव्याने उल्लेख करावा लागेल. मागच्या महिन्यात नव्याने सत्ता प्राप्त केल्यानंतर शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिम्स्टेक देशांच्या प्रतिनिधींना आवर्जून आमंत्रित केले होते.

दक्षिण आशियाई देशांच्या सार्क या संघटनेशी आपण परिचित आहोत पण, ‘बिम्स्टेक’चे भूराजकीय आणि आर्थिक गणित आपल्याला समजून घ्यावे लागेल. बिम्स्टेक म्हणजेच ‘बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टर टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन’. बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड या देशांचा समावेश बिम्स्टेकमध्ये होतो.

बिम्स्टेक देशातील आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विचार करता दक्षिण आशियाई देशात होणाऱ्या व्यापारापैकी मोठा व्यापार या भौगोलिक क्षेत्रातून होतो. दक्षिण आशियाई राष्ट्रातील व्यापारी संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने बिम्स्टेक देश भारतासाठी महत्त्वाचे आहेत. बिम्स्टेक देशातील परस्पर सहकार्य, परराष्ट्र व्यापार, तंत्रज्ञान आदानप्रदान, ऊर्जा स्त्रोत, वाहतूक, पर्यटन आणि मासेमारी या मूलभूत क्षेत्रात व्हावे अशी अपेक्षा आहे. बंगालच्या उपसागरातील भौगोलिकदृष्टय़ा जवळीक असणाऱ्या देशांनी कृषी, उद्योग, सार्वजनिक आरोग्य, दारिद्य्र निर्मूलन, दहशतवादाचा सामना, पर्यावरणाचे रक्षण, संस्कृतीची देवाणघेवाण आणि हवामान बदलामुळे निर्माण झालेले प्रश्न या मुद्दय़ावरही एकत्रितरित्या काम करावे अशी अपेक्षा आहे. बिमस्टेक देश नैसर्गिक साधनसंपत्ती आणि मनुष्यबळ या दोन्हींसंदर्भात महत्त्वाचे आहेत. जगाच्या २२ टक्के एवढी लोकसंख्या आणि २.७ ट्रिलियन डॉलर एवढय़ा जीडीपीचा वाटा या देशांचा आहे.

बिम्स्टेक देशांनी जागतिक पातळीवर स्पर्धात्मक व्यापार करण्यासाठी परस्पर सहकार्य करावे यासाठी भरीव प्रयत्न केले जात आहेत. तांदूळ, चहा, मसाल्याचे पदार्थ, ज्यूट, चामडय़ाच्या वस्तू, जड-जवाहिर या वस्तूंच्या जागतिक  व्यापारात बिम्स्टेक देशांनी एकत्रितपणे आपले वर्चस्व निर्माण करावे असे प्रयत्न केले जात आहेत.

बिम्स्टेक देशाशी भारताचा व्यापार हा मागच्या दोन दशकांपासून वाढता राहिला आहे. वार्षिक दहा टक्कय़ांपेक्षा जास्त दराने हा व्यापार वाढत आहे. कृषी, कृषी-अवजारे आणि उपकरणे यांचा व्यापार हा दोन बिलियन डॉलर्स इतका आहे. बिम्स्टेक देशातील कृषिक्षेत्राचा मोठा आवाका बघता भारतासाठी ही एक मोठी संधी आहे.

दक्षिण आशियातील चीनचे वाढते प्राबल्य रोखण्याच्या दृष्टीने विचार करता, बिम्स्टेक देशातील भारताची गुंतवणूक सामरिकदृष्टय़ा महत्त्वाची असणार आहे. भारताच्या पूर्वेकडील चार राज्यातील आणि ईशान्येकडील दुर्गम प्रदेशातील राज्यांचा बांगलादेश, म्यानमार आणि थायलंड या बंगालच्या उपसागरातील देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित होणे हे महत्त्वाचे ठरणार आहे. भारतातून बांगलादेशमार्गे म्यानमार आणि थायलंडपर्यंत पोहोचणारे वाहतुकीचे नवे मार्ग निर्माण करणे हे मोठे आव्हान आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की या संघटनेमध्ये पाकिस्तान या आपल्या शेजारी राष्ट्रांचा समावेश नाही!  गेल्या तीन वर्षांत पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायात एकटे पाडून आपले भूराजकीय स्थान बळकट करण्याच्या दृष्टीने भारताने मोठी पावले उचलली आहेत. बिम्स्टेक देश महत्त्वाचे ठरतात ते यामुळेच.

joshikd28@gmail.com

(लेखक वित्तीय नियोजनकार, अर्थशास्त्राचे प्राध्यापक)

First Published on June 17, 2019 12:05 am

Web Title: bimstec 2019
Just Now!
X