वित्त- वेध
आज जगभरात ३६ देशात कार्यान्वित असलेला भारतातील बिर्ला उद्योगसमूह आणि मॉन्ट्रियल येथे १८८५ साली स्थापन झालेली सन इन्श्युरन्स ही जागतिक कंपनी यांच्या सहयोगाने स्थापन झालेल्या तसेच भारतीय विमा व्यवसायामध्ये ‘युलिप’ ही संकल्पना रुजविणाऱ्या बिर्ला सन लाइफ इन्श्युरन्स कंपनीची आजीवन विमा प्रकारातील ही पॉलिसी.

ठळक वैशिष्टय़े
*    आजीवन प्रकारातील पॉलिसी असल्याने पॉलिसीची टर्म विमाधारकाच्या वयाच्या शंभरीपर्यंतची आहे.
*    पॉलिसीच्या टर्ममध्ये विमाछत्राची रक्कम वाढविण्याची सोय आहे.
*    पॉलिसीचा परतावा मिळण्याची तारीख विमाधारक ठरवू शकतो.
*    १ वर्षांपासून ६५ वर्षांपर्यतच्या व्यक्तीला ही पॉलिसी मिळू शकते.
*    परतावा मिळण्याचा काळ आहे पाच ते ३५ वर्षे. हा परतावा विमाधारकाच्या वयाच्या कमीत कमी १८ व्या वर्षी किंवा जास्तीत जास्त ७५व्या वर्षांपर्यंत मिळतो.
*    परतावा मिळण्याच्या वयापर्यंतच प्रीमियम भरावे लागते.
उदाहरण
* विमाधारकाचे वय – ३२ वष्रे
* विम्याची रक्कम – ३० लाख रु.
* प्रतिवषी प्रीमियम –  ९९,४७७ रु. (करांसह)
* परतावा मिळण्याचा काळ – ३० वष्रे
* प्रीमियम भरण्याचा काळ – ३० वष्रे
* ३० वर्षांनंतर हमी परतावा – ५३,०१,०००/- रु.
पॉलिसीचे लाभ
विमाधारकाच्या वयाच्या ६१ वर्षांपर्यंत त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या नामनिर्देशकाला ३० लाख रु. आणि त्याच्या खात्यामधील जमा बोनस इतकी रक्कम मिळणार.
जर तो ३० वर्षांचा काळ तरून गेला तर कंपनीने हमी दिलेली ५३,०१,०००/- रु. इतकी रक्कम तर त्याला प्राप्त होणारच आणि त्याचबरोबर कंपनीने गुंतवणुकीमध्ये जास्त नफा कमावला तर अतिरिक्त रक्कमही त्याला मिळणार.
विमाधारकाच्या वयाच्या ६१ वर्षांनंतर त्याला प्रीमियम भरण्याची गरज नाही. परंतु त्याचे विमाछत्र (३० लाख रु.) मात्र चालूच राहणार आणि तेही त्याच्या वयाच्या शंभरीपर्यंत.
विश्लेषण
जो विमा इच्छुक त्याच्या वयाच्या ३२ व्या वर्षी १ लाख रुपयांचे वार्षकि प्रीमियम भरू शकतो, त्याच्या ‘हय़ुमन इकॉनॉमिक व्हॅल्यू’चा विचार केला तर विमाछत्राची रक्कम फारच कमी आहे. विमाक्षेत्राच्या परिभाषेत त्याला ‘अंडरइन्श्युअर्ड’ म्हणतात. म्हणजे ही पॉलिसी मुख्यत: विमाछत्राच्या नव्हे, तर गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून घेण्यात आलेली आहे. त्यानंतरचे प्राधान्य देण्यात आलेले आहे ते प्राप्तिकरामध्ये सूट मिळविण्यासाठी करावयाच्या गुंतवणुकीला.
आता गुंतवणुकीचा विचार केला तर काय प्राप्त होते ते पाहूया. विमाइच्छुक दरवर्षी ९९,४७७ रु. ची गुंतवणूक करणार आणि ३० वर्षांनंतर कंपनी त्याला हमी दिलेले ५३,०१,००० रु देणार. परताव्याचा दर होतो. द.सा.द.शे. ३.४८%. कंपनीने गुंतवणुका मध्ये मिळविलेल्या नफ्याचा भाग विमा इच्छुकाच्या खात्यामध्ये जमा केला आणि या हमीच्या रकमेच्या दीडपड रक्कम जर विमा इच्छुकाला देऊ केली (७९,५१,५०० रु.) तर परताव्याचा दर होतो ५.७४%, आणि दुप्पट रक्कम (१,०६,०२,०००रु.) देऊ केली, तर परताव्याचा दर होतो ७.२८%. परंतु या अतिरिक्त रकमेबाबत कंपनी कोणतीही हमी देत नाही. विमाइच्छुकासाठी ती एक प्रकारची जोखीमच आहे.
आजीवन विमाछत्र या प्रकाराला काही अर्थ नाही. विमाछत्र हे मुळात घरात येणाऱ्या पशाचा स्रोत बंद झाला तर त्या बिकट परिस्थितीचा सामना करण्यासाठी घ्यायचे असते. त्यामुळे सर्वसाधारणपणे वयाच्या ६० ते ६५ वर्षांनंतर विमाछत्राची गरज नसते. या पॉलिसीमध्ये १०० वर्षांपर्यंतचे विमाछत्र आहे. आजचा वाढीव वयोमर्यादेनुसार या विमाधारकाचे ८०व्या वर्षी निधन झाले तर त्याच्या नामनिर्देशकाला विमाछत्राची ३० लाख रु.ची रक्कम प्राप्त होणार. सर्वसामान्य माणसाला लागू होणाऱ्या भाववाढीच्या निर्देशांकाचा (१०%) विचार केला तर आजपासून ४८ वर्षांनी प्राप्त होणाऱ्या ३० लाख रु.च्या विमाछत्राच्या रकमेची आजची किंमत होते ३०,९२२ रु. म्हणजे आज हा विमाधारक जे वार्षकि प्रीमियम भरतो आहे (९९,४७७ रु.) त्याच्या ३१%. समजा तो विमाधारक १०० वर्षांपर्यंत जगला तर त्याला विमा कंपनी ३० लाख रु. देणार. भाववाढीचा विचार केला तर आजपासून ६८ वर्षांनी मिळणाऱ्या ३० लाख रु.चे आजचे मूल्य होते, ४५९६ रु. आजच्या वार्षकि प्रीमियमच्या अवघे ४.६२%.
सारांशात
विमाछत्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा विमाधारक अंडर इन्श्युअर्ड आहे आणि गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हमी दिलेल्या रकमेच्या बाबतीत परतावा फारच क्षुल्लक आहे आणि जास्तीची रक्कम मिळू शकेल पण कंपनी त्याची हमी देत नाही, म्हणजे ‘सब कुछ भगवान भरोसे.’  
आता त्या विमाधारकाला तितक्याच रकमेमध्ये (वार्षकि ९९,४७७ रु.) जास्तीचे विमाछत्र आणि ठोस परतावा मिळू शकतो का याचा विचार करूया.
सदर विमाधारक ३० वर्षांमध्ये एकूण २९,८४,३१० रु.(९९,४७७ x ३०) इतकी रक्कम प्रीमियमपोटी भरणार आहे. उच्च प्रीमियमच्या बाबतीत मिळणारी सवलत वगरे जमेस धरली तर एकूण प्रीमियमची रक्कम होते. सुमारे २९,५०,००० रु. त्याने भारतातील दोन प्रमुख विमा कंपन्यांच्या जास्त विमाछत्राच्या प्युअर टर्म पॉलिसी घेतल्या तर काय होऊ शकते त्याचा विचार करूया.
विमाछत्राची रक्कम ५० लाख रुपये आणि टर्म ३० वष्रे.
कंपनी क्र.१ :
वार्षकि प्रीमियमची रक्कम २१,३४८ रु.(सíव्हस टॅक्ससकट). ३० वर्षांच्या टर्मची एकूण प्रीमियमची रक्कम ६,४०,४१०रु. व्हिजन प्लॅनच्या एकूण प्रीमियमच्या तुलनेत बचत २३,०९,५९०रु. ही रक्कम त्याने दरवर्षी ७६,९८० रुपयांप्रमाणे गुंतवणुकीच्या अशा पर्यायामध्ये ३० वष्रे गुंतविली की, ज्यामध्ये प्राप्तिकरामध्ये सूट आहे आणि परतावाही करमुक्त आहे, तर त्याच्या वयाच्या ६२ व्या वर्षी त्याची गंगाजळी होईल १,०७,८६,४७९ रु. आणि तीही खात्रीलायक.
कंपनी क्र.२ :
वार्षकि प्रीमियमची रक्कम ८,०८२ रु. (सíव्हस टॅक्ससकट). ३० वर्षांची एकूण प्रीमियमची रक्कम २,४२,४६० रु. व्हिजन प्लॅनच्या तुलनेत बचत २७,०७,५४०रु. ही रक्कम दरवर्षी ९०,२५०रु. प्रमाणे वरील सेफ पर्यायामध्ये ३० वष्रे गुंतविली तर विमाधारकाच्या ६२ व्या वर्षी त्याला १,२६,४५,८७८ रु. इतकी प्रत्याभूत रक्कम प्राप्त होते.
तुलना
१.    व्हिजन प्लानपेक्षा कंपनी क्र.१ आणि २ मध्ये विमाछत्राची रक्कम ४०% पेक्षा जास्त आहे.
२.    व्हिजन प्लानच्या प्रत्याभूत मॅच्युरिटीच्या रकमेपक्षा (५३,०१,०००/-रु), कंपनी क्र.१ च्या विमाछत्राच्या टर्मनंतर विमाधारकाला मिळणारी रक्कम (१,०७,८६,४७८ रु.) १००% पेक्षा जास्त आहे. कंपनी क्र.२ च्या बाबतीत तर ती  त्याहूनही, म्हणजे (१,२६,४५,७८७ रु.) १३८% पेक्षा जास्त आहे.
थोडक्यात कंपनी क्र.१ किंवा २ च्या प्युअर टर्म पॉलिसीपासून विमाधारकाच्या मृत्यूच्या संभावनेतही जास्त लाभ आहे आणि विमाधारक पूर्ण टर्म तरून गेला तर त्याला प्राप्त होणारी ठोस रक्कमही जास्त आहे.
सदर लेखाचा उद्देश पूर्णत: समीक्षात्मक असून माहिती त्या त्या वेबस्थळांवरून घेण्यात आलेली आहे.