|| अजय वाळिंबे

काही कंपन्यांबद्दल विशेष काही बोलावे लागत नाही. आज सुचविलेली ग्लॅक्सो स्मिथक्लाइन कन्झ्युमर हेल्थकेअर लिमिटेड (जीएसके) जागतिक स्तरावर एक आघाडीची हेल्थकेअर कंपनी असून जगातील काही प्रमुख आणि सुप्रसिद्ध ब्रँड कंपनीच्या मालकीचे आहेत आणि जगभरात १०० हून अधिक देशांच्या बाजारपेठांमध्ये ते यशस्वी आहेत. जीएसकेचा आरोग्यनिगा व्यवसाय मुख्यत्वे पाच गोष्टींवर केंद्रित असून त्यांत वेदना निवारण, श्वसन, ओरल हेल्थकेअर, पोषण / गॅस्ट्रो आणि त्वचा यांचा समावेश होतो. कंपनीच्या उत्पादनांच्या पोर्टफोलिओमध्ये सेन्सोडाइन, व्होल्टारेन, थेरॅफ्लू, पॅराडोंटाक्स, पॅनाडोल, पॉलिटिअन, ऑट्रिव्हिन, हॉíलक्स आणि फिजिओगल या जगातील काही विश्वासार्ह आणि सर्वाधिक विक्री असणाऱ्या ब्रँड्सचा समावेश आहे. भारतात जीएसके हेल्थ फूड ड्रिंक्स उद्योगात अग्रगण्य असून हॉíलक्स बाजारात अग्रेसर आहे, तर बूस्ट पहिल्या तीन हेल्थ फूड ड्रिंक ब्रँडपैकी एक आहे. या उत्पादनांखेरीज कंपनी इनो, क्रोसिन, आयोडेक्स आणि सेन्सोडाइन, टी-मिनीक, सेंडोकल आणि ऑस्टोकलसारख्या आरोग्याच्या उत्पादनांचे विपणन आणि वितरण ही कंपनी करते.

गेल्या आर्थिक वर्षांत ४,७८२.०१ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ९८२.५२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावणाऱ्या या कंपनीने जून २०१९ अखेर समाप्त पहिल्या तिमाहीसाठी १,१९४.३२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २४८.०८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो २४ टक्क्य़ांनी अधिक आहे. मागील काही लेखांमध्ये म्हटल्याप्रमाणे शेअर बाजारात मंदीसदृश वातावरण असताना शक्यतो उत्तम लार्ज कॅप कंपन्यांच्या शेअर्सचे खरेदीचे धोरण ठेवा.

या ब्ल्यू चिप कंपनीचा शेअर ज्या वाचकांकडे असेल त्यांना या कंपनीने आतापर्यंत किती फायदा करून दिला ते सांगायची गरज नाही. जीएसकेसारख्या कंपन्यांचे शेअर्स हे फक्त ठेवून द्यायचे असतात, विकायचे नसतात.

जगातील काही विश्वासार्ह आणि सर्वाधिक विक्री असणाऱ्या ब्रँड्सचा समावेश असलेली ही ब्ल्यू चिप कंपनी. सध्याच्या मंदीसदृश वातावरणात उत्तम लार्ज कॅप कंपन्यांच्या शेअर्सचे खरेदीचे धोरण असायला हवे..

  • सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.