|| नीलेश साठे

 

कसा, किती आणि केव्हा?

‘बोनस’ म्हटले की आपल्याला दिवाळीची आणि त्या वेळी कायद्यानुसार मिळणाऱ्या बोनसची आठवण येते. अर्थात आजकाल फारच कमी कर्मचाऱ्यांना बोनस मिळतो म्हणा. जे शेअर बाजाराशी संबंधित आहेत त्यांना बोनस म्हटले की, कंपन्या भागधारकांना जे बक्षीसरूपात बोनस-शेअर देतात ते आठवते; पण विम्याचा जेव्हा विचार होतो तेव्हा नफ्यासह पॉलिसीवर दरवर्षी विमा कंपनी आपल्या लाभातून जो हिस्सा पॉलिसीवर जमा करते तो म्हणजे बोनस.

आपण जेव्हा विमा एजंटमार्फत पॉलिसी घेतो तेव्हा एजंट आपल्याला या पॉलिसीवर मुदतीच्या शेवटी अमुक रक्कम मिळेल असे सांगतो. त्या वेळी तो आपल्याला काही आकडेमोडही करून दाखवतो. बरेचदा ती आपल्याला समजत नाही हा भाग वेगळा; पण तो समजावून सांगतो मात्र, की विमेदाराचा मृत्यू झाल्यास विमा रक्कम (सम अश्युअर्ड) अधिक तोवर जमा झालेला बोनस आणि मुदतीपश्चात विमा रक्कम अधिक संपूर्ण मुदतीचा बोनस अशी मिळेल.

तर आजच्या लेखात आपण बोनस म्हणजे काय, त्याचे विविध प्रकार, त्याचे वेगळेपण, याविषयी जाणून घेऊ  या.

प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की, विम्याच्या सर्वच पॉलिसींवर बोनस मिळत नसतो. ज्या पॉलिसी नफ्यात भागीदार असतात, त्यांनाच नफ्याच्या (खरे तर सरप्लसच्या) ९०/९५ टक्के त्यांच्या विमा रकमेच्या प्रमाणात बोनस मिळतो. आता हा सरप्लस कसा काढतात ते पाहू.  मागील लेखात विमा हप्ता निर्धारण करताना विमा कंपन्या मृत्युदर, गुंतवणुकीवर मिळणारे संभाव्य उत्पन्न, पॉलिसीवर होणारा खर्च वगैरे बाबी बिमांकक (अ‍ॅक्च्युअरी) गृहीत धरतात हे सांगितले होते. आता वर्षाच्या शेवटी संभाव्य आणि प्रत्यक्ष आलेला अनुभव यांचा ते अभ्यास करतात. उदाहरणार्थ, समजा विशिष्ट वयाच्या १० विमेदारांना मृत्युदावे दिले जातील जे एक कोटीचे असतील अशी शक्यता गृहीत धरली असताना त्या वर्षी केवळ सहा मृत्युदावेच आले आणि ६० लाखांची रक्कमच त्यापोटी द्यावी लागली तर या संभाव्यतेपोटी ४० लाखांचा सरप्लस जमा झाला. समजा, गुंतवणुकीवर ६ टक्के व्याज गृहीत धरले असेल आणि प्रत्यक्षात ६.२ टक्के दराने व्याज मिळाले, तर पुन्हा सरप्लस जमा झाला तसेच खर्च समजा १ कोटी अपेक्षित धरला असेल आणि प्रत्यक्षात फक्त ८० लाखच झाला, तर पुन्हा २० लाख सरप्लस जमा झाला. असा एकूण सरप्लस जो वर्षाच्या शेवटी निघतो त्याच्या ९० ते ९५ टक्के सरप्लस नफ्यात भागीदार असलेल्या विमाधारकाच्या पॉलिसीवर जमा होतो. याचा दर हा प्रत्येक हजारामागे ४० रुपयेअशा प्रकारचा असतो. म्हणजे जर आपली एक लाख विमा रकमेची पॉलिसी असेल तर आपल्या पॉलिसीवर ४००० रु. बोनस जमा होतो. या बोनसची विशेषता ही की, हा अप्रत्यावर्ती म्हणजेच ‘इररिव्हर्सिबल’ असतो. अर्थात एकदा तो पॉलिसीवर जमा झाला की, कुठल्याही कारणाने कंपनी तो कमी करू शकत नाही. एलआयसी कायद्यानुसार विमाधारकांना ९५ टक्के सरप्लस हा बोनसच्या रूपात वाटला जावा (आणि ५ टक्के सरकारला लाभांश मिळावा) अशी तरतूद आहे. मात्र एलआयसीच्या खासगीकरणानंतर ९० टक्के सरप्लस विमेदारांना बोनस रूपात मिळणार आहे. म्हणजे एलआयसीचे शेअर, भांडवल बाजारात सूचिबद्ध झाल्यानंतर बोनसचे दर कमी होण्याची शक्यता आहे. खासगी विमा कंपन्या मात्र सरप्लसच्या ९० टक्के रक्कम विमाधारकांना बोनसच्या रूपाने वाटतात.

असा बोनस काढणे हे फार जिकिरीचे काम असते आणि ते दरवर्षी आर्थिक वर्ष संपले की बिमांककांना करावे लागते. कधी कधी अनपेक्षितपणे सरप्लस जास्त येतो तेव्हा त्यातील काही भाग हा पुढील वर्षासाठी राखून ठेवला जातो, जसा लाभांश समानता निधी (डिव्हिडंड इक्वलायझेशन फंड) असतो तसा.

सर्वच पॉलिसींवर बोनस मिळत नसतो. ‘युलिप’च्या योजना, पेन्शनच्या योजना, लाभात सहभागी नसलेल्या योजना किंवा खात्रीने वृद्धी देणाऱ्या योजना घेतलेल्या विमेदारांना बोनस मिळत नाही.

सामान्यत: बोनस हा साधा प्रत्यावर्तित न होणारा बोनस असतो, ज्याबद्दल वर लिहिले आहे. याव्यतिरिक्त अंतिम अतिरिक्त बोनसपण काही पॉलिसींमध्ये मिळतो. हा बोनस पॉलिसी मुदतपूर्तीपर्यंत सुरू राहिली तरच मिळतो. याला अंतिम बोनसपण म्हटले जाते. याव्यतिरिक्त अंतरिम बोनसदेखील दिला जातो. म्हणजे समजा, पॉलिसीची मुदत जूनमध्ये संपते आहे, पण मागील आर्थिक वर्षीचा बोनस सप्टेंबरमध्ये जाहीर होणार असेल तर या विमेदाराला जूनमध्ये अंतरिम बोनस दिला जातो व जर त्या आर्थिक वर्षाचा बोनस हा अंतरिम बोनसहून अधिक असेल तर अशा सर्व विमाधारकांना बोनसमधील फरकाची रक्कम सप्टेंबरनंतर पुन्हा दिली जाते. रोख बोनस हा प्रकार काही विमा कंपन्या अवलंबतात. यात ज्यांच्या पॉलिसीचे हप्ते नियमित आहेत अशांना रोखीने बोनस दरवर्षी दिला जातो, पण हा प्रकार खूपसा लोकप्रिय नाही.

पॉलिसीचे हप्ते नियमित भरले तरच बोनस जमा होतो. हप्ते खंडित झाले आणि विमा पॉलिसी बंद पडली तर पॉलिसीवर बोनस जमा होणे बंद होते. अशी बोनससकट जमा रक्कम विमेदारांना पॉलिसीच्या मुदतीशेवटी वा मुदतीपूर्वी विमेदाराचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला मिळते.

मुस्लिमांच्या धर्मग्रंथानुसार व्याज घेणे निषिद्ध मानले आहे, पण बोनस हे व्याज नसून अतिरिक्त जमा रकमेचे विचारपूर्वक वाटप असल्याने बोनस निषिद्ध नाही.

विमा हप्ता वेळच्या वेळी भरून विमा पॉलिसी सुरू ठेवणे हिताचे असते. खंडित झालेल्या विमा पॉलिसीवर बोनस जमा होत नाही हे लक्षात ठेवावे.

लेखक विमा नियामक ‘इर्डा’चे माजी सदस्य आणि ‘एलआयसी’मध्ये कार्यकारी संचालक पदावर कार्यरत होते.

ई-मेल : bsathe@gmail.com