|| आशीष ठाकूर

निफ्टीच्या मोहक गिरकीचे, तुरुतुरु चालीचे रूपांतर आता ऑलिम्पिक शर्यतीला सज्ज धावपटूत होऊन डोळ्याचं पातं लवते न लवते तोच निफ्टी ११,५०० च्या समीप पोहोचलीदेखील.

या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

  • सेन्सेक्स: ३८,०२४.३२
  • निफ्टी : ११,४२६.९०

या स्तरावरून एक हलकीशी घसरण अपेक्षित असून तिचे खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३७,५५० ते ३७,२०० आणि निफ्टीवर ११,३०० ते ११,१०० असे असेल. या स्तरावर निर्देशांक आधार घेऊन नंतर निर्देशांक नवीन उच्चांकाला गवसणी घालेल, तो अनुक्रमे सेन्सेक्सवर ३९,३०० आणि निफ्टीवर ११,८५० असेल.

मागील लेखाचे सूत्र पकडून आपण आता १९९० च्या दशकाकडे वळू या.

पंतप्रधानपदी असताना चंद्रशेखर यांनी सोने तारण ठेवून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा कर्जावरील व्याजाचा हप्ता आणि सरकारचे आर्थिक उत्तरदायित्व पूर्ण केल्यामुळे भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळली ज्याचा फायदा पुढे नरसिंह राव सरकारला झाला. तथापि चंद्रशेखर यांचे सरकारदेखील अल्पायुषी ठरून लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकांच्या दरम्यान दुसरा धक्का बसला. निवडणूक प्रचारादरम्यान राजीव गांधी यांची तमिळनाडूतील पेरम्बूदूरमध्ये हत्या झाली.

लोकसभेच्या निवडणुकांनंतर नरसिंह राव पंतप्रधान झाले. या अल्पमतातील, इतरांच्या पाठिंब्यावरील सरकारने आर्थिक आघाडीवर ३६० अंशात्मक परिवर्तनाला सुरुवात केली. अर्थक्षेत्रातील तज्ज्ञ व रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थमंत्रिपदाची धुरा दिली गेली. राव-मनमोहन सिंग यांनी आर्थिक उदारीकरणास सुरुवात केली; परमिट, लायसन्स, कोटा या शब्दांना पूर्णविराम मिळाला. निर्यातीला चालना मिळण्यासाठी रुपयाचे अवमूल्यन केले गेले, सरकारी अनुदानाला कात्री लावली गेली. या सर्व आर्थिक निर्णयाची त्वरेने, काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली.

या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेने भारताला सवलतीच्या दरात कर्ज दिले. (चंद्रशेखर यांच्या दूरगामी निर्णयाचा परिणाम) ९० च्या दशकातील पूर्वार्धात इतिहासात प्रथमच राजकारणातदेखील ३६० अंशात्मक परिवर्तनाला सुरुवात झाली. सत्ताधारी व विरोधी पक्षाचे मित्रत्वाचे संबंध निर्माण झाले याचे श्रेय नरसिंह राव यांना आहेच, पण कांकणभर अधिक श्रेय हे विरोधी पक्षातील जाणते, द्रष्टे नेतृत्व अटलबिहारी वाजपेयी यांना जाते. अल्पमतातील सरकार, त्यामुळे खासदार फोडाफोडीचे राजकारण करून केंद्र सरकार अस्थिर करण्याची पुरेपूर संधी, पण हे सर्व गलिच्छ राजकारण टाळत विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी त्यांनी विधायकपणे पार पडली. या गुणांची, अनुभवाची दखल घेत इतिहासात प्रथमच युनोच्या आमसभेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व विरोधी पक्षाच्या नेत्याने म्हणजे अटलबिहारी वाजपेयी यांनी केले.

वर्ष १९९० मध्ये देश दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर असताना, ज्यांनी लोकसभेच्या निवडणुका अगोदर गुंतवणूक केली, त्यांचा नफा जाणून घेऊ.

फेब्रुवारी १९९० ला टाटा स्टील अवघा १०३ रुपयांवर होता, तो एप्रिल १९९२ मध्ये ६९० रुपये झाला. टाटा मोटर्स ११० वरून ५९० रुपये.   आयटीसी ५० वरून ९०० रुपये आणि मुंबई शेअर बाजार निर्देशांक – सेन्सेक्स ७०० वरून ४,५४६ झाला.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.