|| आशीष ठाकूर

उष:काल होता होता भाग – ४

मुख्य निर्देशांकांमध्ये सेन्सेक्सने ३८,५०० आणि निफ्टीने ११,५००चा टप्पा अतिजलद गाठल्याने, आता क्षणिक विश्रांतीची गरज आहे. व ती विश्रांती आता आपण अनुभवत आहोत. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया.

शुक्रवारचा बंद भाव :

  • सेन्सेक्स : ३८,१६४.६१
  • निफ्टी : ११,४५६.९०

येणाऱ्या दिवसात निर्देशांकावर तेजीच्या वातावरणातील हलकीशी मंदीची झुळूक आपण अनुभवणार आहोत. ती सेन्सेक्सवर ३७,००० व निफ्टीवर ११,२०० पर्यंत असेल. या स्तरावर निर्देशांकांचा थकवा दूर होऊन, ते ताजातवाने होतील आणि पुन्हा नवीन उच्चांकाला गवसणी घालतील. हे उच्चांक अनुक्रमे सेन्सेक्सवर ३९,३०० आणि निफ्टीवर ११,८५० असे असतील.

मागील लेखाचे सूत्र पकडून आपण आता १९९० च्या दशकाकडे वळूया. नरसिंह राव व मनमोहन सिंग यांनी आर्थिक आघाडीवर ३६० अंशात्मक परिवर्तनाला – आर्थिक उदारीकरणांस सुरुवात केली. या सरकारने पहिल्या अर्थसंकल्पापासून कालबाह्य़, जुनाट धोरणांना तिलांजली देत कालानुरूप, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय धोरणे आखायला सुरुवात केली. दिवाळखोरीच्या चिखलात रुतलेला आर्थिक गाडा प्रगतीच्या मार्गावर धावायला सुरुवात होईल, अशी आशा त्यातून निर्माण झाली. उद्योगधंद्यांच्या आघाडीवर आश्वासक वातावरण निर्माण केले गेले. त्यामुळे प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ)चा बाजार बहरला. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार भारतीय भांडवली बाजारात परदेशस्थ गुंतवणूकदार संस्थांना (एफआयआय) समभाग खरेदी-विक्रीसाठी परवानगी मिळाली. विमा, बँकिंग व म्युच्युअल फंड ही सरकारी आरक्षित क्षेत्रे खाजगी क्षेत्रासाठी खुली केली गेली. त्यामुळे अशी काही हाकाटी पिटण्यात आली की, ‘आता जर समभाग घेतले नाहीत तर, पुढे औषधाला देखील समभाग मिळणार नाहीत.’ कारण परदेशस्थ गुंतवणूकदार संस्थांकडे अमाप पसा आहे, त्यामुळे स्वस्तात समभाग खरेदी करण्याची हीच एकमेव संधी आहे. त्यात भर पडली ती प्रारंभिक विक्री अर्थात आयपीओच्या समभागांची- त्यांची भांडवली बाजारातील नोंदणी ही दर्शनी मूल्याच्या किमान दहा पटीने अधिमूल्य मिळवीत व्हायला लागली. दहा रुपये दर्शनी मूल्याचा समभाग किमान शंभर रुपये व त्या पुढे भांडवली बाजारात नोंदला जायचा. अवघ्या तीन महिन्याच्या आत दहा पट परतावा त्या दिवसात मिळायला लागला. त्याच दिवसात अर्थक्षितिजावर हर्षद मेहता नावाच्या ताऱ्याचा उदय झाला. त्या दिवसात हर्षदभाईंच्या आवडत्या दहा समभागांना  ‘ईश्वरी आज्ञा (कमांडमेंट्स)’ सारखे महत्त्व होते. पाच रुपयावर रेंगाळणारा माझदा लििझगला हर्षदभाईंचा परिसस्पर्श झाल्यावर तो १६०० रुपये झाला, तर बंद पडलेली कंपनी, कर्नाटक बॉलबेअिरग हा अवघ्या आठ रुपयाचा समभाग १७५ रुपये झाला. चांगल्या प्रतीचे एसीसी, अपोलो टायर, आयसीआयसीआय या समभागांचे भाव चांगलेच वधारले. अल्पावधीत ‘कौन बनेगा करोडपती’ बनण्याचा राजमार्ग म्हणजे ‘भांडवली बाजार’ असा समज सर्वानी करून घेतला. एकंदरीत, भविष्यात औषधाला देखील समभाग मिळणार नाहीत हा समज दृढ करण्यात त्या वेळचे वातावरण यशस्वी ठरले. पण, पुढे असे काय घडले की, ‘औषधाला देखील समभाग मिळणार नाहीत’ सांगणाऱ्यांनाच, औषध घ्यावे लागले तर वंदनीय हर्षदभाई िनदनीय का झाले? ते पुढील लेखात जाणून घेऊया.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.