|| आशीष ठाकूर

कविवर्य मंगेश पाडगांवकर यांची शब्दरचना, पु.लं.चं संगीत आणि अभिषेकीबुवांच्या स्वर्गीय स्वरांनी अजरामर या वरील गीताचे शब्द हे येथे आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या ‘केंद्रिबदू स्तर’ संकल्पनेला चपखल बसतात. कसे ते पाहू.

आपण २२ एप्रिलच्या लेखातील येस बँकेच उदाहरण घेऊ. निकाल जाहीर झाल्यानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर होता २३० रुपये.(त्या वेळला येस बँकेचा भाव होता २५५ रुपये) त्रमासिक निकालात येस बँकेला १,५०७ कोटी रुपयांचा तोटा झाल्यामुळे अर्थातच आपण मांडलेला तिसऱ्या शक्यतेचा पर्याय प्रत्यक्षात आला. तो म्हणजे निराशादायक निकालानंतर २३० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत येस बँकेची १७५ रुपयांपर्यंत घसरणीचे भाकीत खरे ठरले. हे खालचे १७५  रुपयांचे लक्ष्य तांत्रिक व मूलभूत विश्लेषणातील महत्त्वाच्या संकल्पना एकत्र घेऊन काढलेले होते.

येस बँकेचा हा दातखिळी बसवणारा १,५०० कोटी रुपयांचा तोटा, त्यात हृदयात धडकी भरणारी २५५ रुपयांपासूनची घसरण. एवढी सगळी उलथापालथ होऊन देखील येस बँकेचा साप्ताहिक बंद मात्र बरोबर १७५ रुपयांवर.. ‘शब्दावाचून कळले शब्दांच्या पलीकडले’ किमयाच!

‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ ही पध्दत का विकसित करावी लागली?

आर्थिक अहवालावर (ताळेबंद पत्रक) सही करायच्या शेवटच्या क्षणाला प्रमुख आर्थिक अधिकाऱ्याला (सीएफओ) त्यांचा ‘आतील आवाज’ वैगेरे एैकू येतो व त्यांच्यातील ‘रामशास्त्री’ जागा होतो. अहवालावर सही करायचे नाकारून पदाचा राजीनामा दिला जातो. शेवटच्या घटकेला घेतलेल्या या रामशास्त्री बाण्यामुळे गुंतवणूकदारांचा गोंधळ तर उडतोच, पण समभागाचे भाव देखील कोसळतात. यात गुंतवणूकदारांचा काहीही दोष नसताना त्यांना मात्र प्रायश्चित मिळते. तसेच इतर घटना – कंपनीच्या संचालक मंडळाच्या आर्थिक अहवालांवर सनदी लेखापालांचे (ऑडिटर) गंभीर ताशेरे, मग यात खरे काय? अशा या गोंधळलेल्या अवस्थेत गुंतवणूकदारांना दीपस्तंभ, ध्रुवताऱ्यासारखे मार्गदर्शन करण्यासाठी तांत्रिक व मूलभूत विश्लेषणातील महत्त्वाच्या संकल्पना एकत्र करून ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ ( ट्रेंड डिसायडर लेव्हल) ही संकल्पना विकसित केली. या स्तरावर लक्ष केंद्रित करून त्रमासिक निकाल जाहीर झाल्यानंतर समभागाचा बाजारभाव महत्त्वाच्या केंद्रिबदू स्तरावर टिकला, तर त्रमासिक निकाल चांगला, अन्यथा वाईट! थोडक्यात किचकट, अगम्य शब्दाच्या / भाषेच्या वाटेला न जाता कंपनीचे आर्थिक अंतरंग उलगडून दाखविणारी ही साधी, सोपी पण उद्देश साध्य करणारी ‘शब्दावाचून कळले शब्दांच्या पलीकडले’ पद्धत विकसित झाली.

आता आपण त्रमासिक निकालाकडे वळू या.

१. आयसीआयसीआय बँक

  • तिमाही निकालाची नियोजित तारीख – सोमवार, ६ मे
  • ३ मेचा बंद भाव – ४०१.८० रुपये
  • निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ३७० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाने ३७० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य ४२५ रुपये. भविष्यात ४२५ रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ४५० ते ५०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ३७० ते ४२५ रुपयांच्या पट्टय़ात (बॅण्ड) मध्ये वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ३७० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत प्रथम ३४० व नंतर ३०० ते २७५ रुपयांपर्यंत घसरण.

२) लार्सन अँण्ड टुब्रो  

  • निकालाची नियोजित तारीख – शुक्रवार, १० मे
  • ३ मेचा बंद भाव – १,३६३.६० रुपये
  • निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – १,३३० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाने १,३३० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य १,४०० रुपये. भविष्यात १,४०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १,४७० ते १,५२५ रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : १,३३० ते १,४०० रुपयांच्या पट्टयात (बॅण्ड) मध्ये वाटचाल.

क) निराशादायक निकाल : १,३३० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत प्रथम १,३०० व नंतर १,२५० ते १,२०० रुपयांपर्यंत घसरण.

ashishthakur1966@gmail.com