|| आशीष ठाकूर

ते आले. त्यांनी पाहिले. त्यांनी जिंकले.. असे यथार्थ वर्णन मोदींच्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारापासून ते पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्यापर्यंतच्या प्रवासाचे करता येईल.

ते आले ऐकून बाजार तेजीने बहरला, पण या नितांत सुंदर तेजीत गुंतवणूकदारांना सहभागीच होता आले नाही. ती संधी कधी मिळणार ते या लेखात जाणून घेऊया. तत्पूर्वी यावर भाष्य करण्याअगोदर गेल्या आठवडय़ाचा निर्देशांकाचा बंद भाव जाणून घेऊया.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ३९,७१४.२०

निफ्टी : ११,९२२.८०

या महिन्यात सेन्सेक्सवर ४०,१५० ते ४०,५०० आणि निफ्टीवर १२,०५० ते १२,२०० च्या नवीन उच्चांकाला गवसणी घालून एका संक्षिप्त घसरणीचे प्रथम खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३९,००० निफ्टीवर ११,८०० असे असेल. त्यानंतरचे खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३८,५०० व निफ्टीवर ११,५५० पर्यंतच असेल. या स्तरावर ज्या गुंतवणूकदारांची तेजीत सहभागी होण्याची संधी हुकली आहे, त्यांनी या स्तरावर चांगल्या प्रतीचे समभाग खरेदी करण्याचा विचार करावा.

आता बहुतांश कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ या संकल्पनेचे ‘हा सूर्य हा जयद्रथ’ या न्यायाने या संकल्पनेची चिकित्सा होणे गरजेचे आहे. या संकल्पनेचा मुख्य उद्देश हा कंपन्यांच्या तिमाही निकालाअगोदर वाचकांची मानसिकता तयार करून, प्रत्यक्ष निकालानंतर त्या अनुषंगाने कृती करणे हा आहे. कंपनीचा तिमाही निकाल उत्कृष्ट असेल तर, समभाग महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर राखत आपले वरचे लक्ष्य साध्य करेल. या उलट तिमाही निकाल निराशाजनक असतील तर वाचक समभाग विकून संभाव्य नुकसान/ तोटा टाळू शकतील.

प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर समभागाच्या किमतीत जे घातक चढ-उतार होतात त्यात ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ ही संकल्पना तावून-सुलाखून, काळाच्या कसोटीवर उतरली का? ती या व पुढील लेखांमधून जाणून घेऊया.

या स्तंभातील १५ एप्रिलच्या लेखातील टीसीएसचा बंद भाव २,०१३ रुपये होता व निकाल जाहीर झाल्यानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर हा २,००० रुपये होता. लेखात म्हटल्याप्रमाणे, जर निकाल उत्कृष्ट असेल तर २,००० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य २,२०० रुपये सूचित केले होते. प्रत्यक्षात टीसीएसचा निकाल हा उत्कृष्ट होता. टीसीएसने २,००० रुपयांचा स्तर राखत ३० एप्रिलला २,२६६ रुपयांचा उच्चांक नोंदवला. लेखात सुचविल्याप्रमाणे समभागाने आपले पहिले वरचे लक्ष्य गाठले व त्यानंतर नफारूपी विक्री झाली.

याचा फायदा गुंतवणूकदारांनाही झाला. ज्या वाचकांकडे दीर्घ मुदतीच्या गुंतवणूक धारणेने टीसीएसचे समभाग राखून ठेवले व अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांना (शॉर्ट टर्म ट्रेडर) अल्पावधीत दहा टक्के परतावा मिळविला. आजही (दीड महिन्यानंतर) टीसीएस २,००० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर राखून आहे.   (क्रमश)

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.