|| आशीष ठाकूर

मे महिन्यातील लोकसभेच्या मतदानोत्तर चाचण्या ते प्रत्यक्ष निकालाच्या दरम्यान निर्देशांकावर जी भरीव वाढ झाली ती अनुक्रमे सेन्सेक्सवर तीन हजार अंशांची व निफ्टीवर हजार अंशांची होती. ही संधी हुकलेल्या गुंतवणूकदारांना, आपण या तेजीत सहभागी होऊ शकलो नाही याची सतत खंत वाटत होती. तेव्हा ती संधी केव्हा येणार? या विषयावर गेल्या दोन लेखात विस्तृतपणे विवेचन केले गेले आहे.  ती संधी आता दृष्टीपथात येत आहे. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

  • सेन्सेक्स: ३९,१९४.४९
  • निफ्टी: ११,७२४.१०

गेल्या लेखातील वाक्य होतं.. पुढल्या महिन्यात ५ जुलैला अर्थसंकल्प सादर होईल. तेव्हा जूनअखेपर्यंत सेन्सेक्स ३९,३०० ते ३८,५०० आणि निफ्टी ११,८०० ते ११,५५० पर्यंत खाली येऊ शकतो. हे अपेक्षित असल्याने, गुंतवणूकयोग्य रक्कम एकदम न गुंतवता, गुंतवणूकयोग्य रकमेची २० टक्कय़ांच्या पाच तुकडय़ात विभागणी करून सेन्सेक्सवर ३९,३०० ते ३८,५०० आणि निफ्टीवर ११,८०० ते ११,५५० पर्यंतच्या प्रत्येक घसरणीत २० टक्के रक्कम चांगल्या प्रतीच्या समभागात गुंतवत जावी अस सुचविले होते.

(आताच्या घडीला जोपर्यंत निर्देशांक – सेन्सेक्सवर ४०,००० व निफ्टीवर १२,००० च्या स्तरावर सातत्याने दहा दिवस टिकत नाही तोपर्यंत निर्देशांकावर उपरोक्त स्तरापर्यंतच्या घसरणीची शक्यता कायम राहणार हे गृहीत धरावे.)

तिमाही निकालांचे विश्लेषण –

बायोकॉन लिमिटेड

यापूर्वीच्या २२ एप्रिलच्या लेखातील समभाग होता बायोकॉन लिमिटेड. समभागाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर हा ६०० रुपये होता, निकालाअगोदर १८ एप्रिलचा बंद भाव हा ६१५ रुपये होता. निकाल निराशादायक असल्यास ६०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत समभाग ५५० रुपयांपर्यंत घसरण होईल, असे सुचविले गेले होते. प्रत्यक्ष निकाल निराशादायक असल्याने १८ जूनला ४८० रुपयांचा नीचांक नोंदविला. व आज दोन महिन्यानंतरही, बायोकॉन लिमिटेड समभागाचा बाजारभाव हा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तराखालीच आहे. दरम्यानच्या काळात बायोकॉन लिमिटेडने १:१ बक्षीस समभागाचे वाटप केल्याने १२ जूनपासून समभागाची किंमत अर्धी झाली आहे. त्यामुळे त्या वेळचा १८ एप्रिलचा भाव ६१५ रुपये होता तो आता ३०७.५० रुपये झाला. भविष्यात महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर हा ३०० रुपये असेल. समभागाने १८ जूनला २४० रुपयांचा नीचांक नोंदवला हे ध्यानात घ्यावे. यात अधोरेखित करण्याचा मुद्दा असा की, निकाल निराशादायक असेल, तर कितीही प्रलोभन/आमिष दाखविले गेले तरी समभाग कोसळायचा तो कोसळतोच. हे सर्व बाजार नवीन उच्चांकावर असताना घडत होते.

येस बँक

आता दुसरा समभाग हा २२ एप्रिलच्या लेखातील येस बँक. समभागाचा महत्वाचा केंद्रबिंदू स्तर हा २३० रुपये होता. निकालाअगोदर १८ एप्रिलचा बंद भाव हा २५५ रुपये होता. जर निकाल निराशादायक असल्यास २३० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत समभागाची १७५ रुपयांपर्यंत घसरण होईल, असे सुचविले गेले होते. हे प्रत्यक्ष निकालाअगोदरच विश्लेषण होते. प्रत्यक्षात येस बँकला १,५०० कोटी रुपयांचा तोटा झाल्याने येस बँकेच्या समभागाचा बाजारभाव आजतागायत खालीच कोसळत आहे. २० जूनला येस बँकेने ९९ रुपयांचा नीचांक नोंदविला.          (क्रमश:)

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.