|| आशीष ठाकूर

तेजीत सहभागी होण्याची संधी हुकलेल्या गुंतवणूकदारांना ती संधी, गेल्या मंगळवारी जेव्हा निर्देशांक – सेन्सेक्स ३८,९४६ आणि निफ्टी ११,६५१ वर आला, तेव्हा अर्धी रक्कम गुंतवण्याची संधी प्राप्त झाली. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स: ३९,३९४.६४

निफ्टी : ११,७८८.९०

गुंतवणूकयोग्य रक्कम एकदम न गुंतविता, या रकमेचे २० टक्क्यांच्या पाच तुकडय़ांत विभागणी करून प्रत्येक घसरणीत ती गुंतवावी. या धोरणाचा सर्वात मोठा फायदा गुंतवणूकदारांना झाला. तेजीच्या वातावरणात उच्चांकासमीप गुंतवणूक करून नंतर तोटा, अपेक्षाभंग, निराशा होण्यापेक्षा, नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्येक घसरणीत २० टक्क्यांची गुंतवणूक केल्यामुळे अमेरिका-चीन, अमेरिका-इराण या आंतरराष्ट्रीय समस्या या मंदीतील खरेदीच्या सुवर्णसंधी ठरल्या. या समस्यांबरोबरच लांबलेला पाऊस, इंधनाचे चढे दर, अशक्त रुपया व सर्वात महत्त्वाचे अर्थसंकल्पाकडून वारेमाप अपेक्षा व त्या पूर्ण झाल्या नाहीत की बाजाराचे कोसळणे वगैरे. या सर्व निराशाजनक घटनांचा, ल.सा.वि. सेन्सेक्सवर ३८,५०० ते ३८,००० व निफ्टीवर ११,५५० ते ११,४५० चा स्तर असा असेल. हा स्तर राखण्यात निर्देशांक यशस्वी ठरल्यास भविष्यात सेन्सेक्स ४१,५०० व निफ्टी १२,५०० च्या नवीन उच्चांकाला गवसणी घालतील.

तिमाही निकालांचे विश्लेषण

१. आयसीआयसीआय बँक

या स्तंभातील ६ मे २०१९ च्या लेखातील आयसीआयसीआय बँकेचा बंद भाव ४०२ रुपये होता. वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर हा ३७० रुपये होता. लेखात म्हटल्याप्रमाणे, जर निकाल उत्कृष्ट असेल तर ३७० रुपयांचा स्तर राखत ४२५ रुपयांचे प्रथम वरचे लक्ष्य सूचित केले होते. हे प्रत्यक्ष निकालाअगोदरचे विश्लेषण होते. आयसीआयसीआय बँकेचा प्रत्यक्ष निकाल हा उत्कृष्ट होता. समभागांनी ३७० रुपयांचा स्तर राखत २८ मेला ४३७ रुपयांचा उच्चांक नोंदवला.

याचा फायदा गुंतवणूकदारांनाही झाला. हा समभाग ज्या गुंतवणूकदारांचा, दीर्घ मुदतीच्या गुंतवणूक धारणेअंतर्गत घेतला असेल त्यांनी तो राखून ठेवला व अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांना (शॉर्ट टर्म ट्रेडर) अल्पावधीत सहा टक्के परतावा मिळविला. आजही (दीड महिन्यानंतर) आयसीआयसीआय बँक ३७० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर राखून आहे.

२) लार्सन अँण्ड टुब्रो :

याच लेखातील दुसरा समभाग लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचा बंद भाव १,३६३ रुपये होता. वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर हा १,३३० रुपये होता. लेखात म्हटल्याप्रमाणे, जर निकाल उत्कृष्ट असेल तर १,३३० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य १,४०० रुपये व त्या नंतर १,५२५ रुपयांचे वरचे लक्ष्य सूचित केले होते. हे प्रत्यक्ष निकाला अगोदरचे विश्लेषण होते. लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचा प्रत्यक्ष निकाल हा उत्कृष्ट होता. समभागांनी १,३३० रुपयांचा स्तर राखत २८ मेला १,६०० रुपयांचा उच्चांक नोंदविला.

याचा फायदा गुंतवणूकदारांनाही झाला. दीर्घ मुदतीच्या गुंतवणूक धारणा असणाऱ्या गुंतवणूकदारांनी अर्थातच तो राखून ठेवला असणार, तर अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांना (शॉर्ट टर्म ट्रेडर ) अल्पावधीत ११ टक्के परतावा मिळविला. आजही (दीड महिन्यानंतर) लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो १,३३० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर राखून आहे.

(क्रमश:)

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.