18 February 2019

News Flash

दुग्धशर्करा योग!

या आठवडय़ाचा आढावा घेऊ या.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

गेल्या आठवडय़ात अगोदर भाकीत केलेली वरची इच्छित उद्दिष्टे निर्देशांकांबरोबरीनेच सोन्याने देखील गाठून गुंतवणूकदारांना ‘दुग्धशर्करा योग’ घडवला. या आठवडय़ाचा आढावा घेऊ या.

शुक्रवारचा बंद भाव –

  • सेन्सेक्स : ३५,५११.५८ 
  • निफ्टी :     १०,८९४.७०

गेल्या आठवडय़ात निर्देशांक नवनवीन शिखर सर करत असताना एका घटनेकडे लक्ष वेधू इच्छितो. ती म्हणजे, एका बाजूला निर्देशांक नवनवीन शिखर गाठत असताना ‘ब’ वर्गातील (मिड कॅप) समभागात तीव्र स्वरूपाची घसरण होत आहे आणि मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांची जास्त गुंतवणूक ही ‘ब’ वर्गातील समभागात असल्याने त्यांना ही परिस्थिती कशी हाताळावी हे समजत नाही. ही तेजीच्या सुखद वातावरणात मंदीचे चटके सोसावे लागणाऱ्यांसाठी हे विवेचन.

तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेता निर्देशांकावर ३४,४००/ १०,६०० ही ‘महत्त्वाची कल निर्धारण’ (ट्रेंड डिसायडर लेवल) पातळी आहे. एखाद्या संक्षिप्त घसरणीत निर्देशांक हा स्तर राखण्यात यशस्वी ठरल्यास निर्देशांक पुन्हा ३५,८००/ ११,००० आणि नंतर ३६,०००/ ११,१०० असे ऐतिहासिक उच्चांक प्रस्थापित होताना ‘ब’ वर्गातील समभाग त्या तेजीत सहभागी होतील.

सोन्याचा किंमत-वेध

  • तांत्रिक विश्लेषणशास्त्राचा आज्ञाधारक विद्यार्थी कोण? या प्रश्नाचे उत्तर सोन्याचे आलेख हे असेल. गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे सोन्याची घोडदौड ही रु. २९,८००च्या टप्प्याकडे असेल आणि गेल्या आठवडय़ातच सोन्याच्या किंमतीने हे वरचे उद्दिष्ट तर गाठलेच व त्यानंतर नफारूपी विक्री होऊन सोन्याच्या भावाने पुन्हा रु. २९,६००चा आधार घेतला. अशा या आलेखावरील शिस्तबद्ध हालचालीमुळे सोने तर झळाळून उठत आहे त्याचबरोबर आमचे तांत्रिक विश्लेषणशास्त्र देखील सोन्यात न्हाऊन निघत आहे असा हा मणीकांचन योग जुळून येत आहे.
  • सोन्याचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु. २९,४०० ते २९,८०० आहे. रु. २९,८००च्या सकारात्मक वरच्या छेदाचे उद्दिष्ट (अप टारगेट) हे रु. ३०,००० ते ३०,१०० असेल. सोन्याचा भाव जोपर्यंत २९,०००चा स्तर राखून आहे तोपर्यंत सोन्याच्या भावात तेजीची पालवी कायम आहे हे गृहीत धरावे. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित).

मर्केटर लिमिटेड (बीएसई कोड – ५२६२३५)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ४२.८५

  • मर्केटर लिमिटेडचा आजचा बाजारभाव हा २०० (४२), १०० (४०), ५० (३९), २० (४१) या सर्व दिवसांच्या चलत् सरासरीवर बेतलेला आहे. मर्केटरची तेजीच्या दृष्टीने महत्त्वाची कल निर्धारण पातळी ही ४७ रुपये आहे. ४७ रुपयांच्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन प्रथम वरचे उद्दिष्ट रु. ५५ ते ६० आणि नंतरचे उद्दिष्ट रु. ७५ असेल. दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट रु. १२५ असेल. येणारे दिवस हे नाटय़पूर्ण घडामोडीचे (अर्थसंकल्प, तिमाही निकाल) असल्यामुळे समभाग आपल्या नजरेसमोर (रडारवर) ठेवून प्रत्येक घसरणीत २५ टक्क्यांच्या चार तुकडय़ांत खरेदी करावी. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला ३० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

 

आशीष अरविंद ठाकूर

ashishthakur1966@gmail.com

First Published on January 22, 2018 12:10 am

Web Title: bse nse nifty sensex 35