18 February 2019

News Flash

बाजार निर्देशांक वळणबिंदूवर!

अर्थसंकल्प म्हणजे सरकारच्या उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक

गेल्या लेखात नमूद केलेली आपली वरची इच्छित उद्दिष्टे निर्देशांक आणि सोन्याच्या किमतीने गेल्या आठवडय़ात गाठली आणि आता भांडवली बाजार निर्देशांक महत्त्वाच्या अशा वळणिबदूवर उभा आहे. या पाश्र्वभूमीवर अर्थसंकल्प सादर झाल्यावर निर्देशांकांची वाटचाल कशी असेल त्याचा आढावा घेऊ या.

गुरुवारचा बंद भाव –

  • सेन्सेक्स : ३६,०५०.४४
  • निफ्टी : ११,०६९.७०

अर्थसंकल्प म्हणजे सरकारच्या उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक, ज्यात कर रूपाने नवनवीन उत्पन्नाच्या स्रोतांबरोबरच जनतेचे राहणीमान सुधारण्यासाठी विविध आíथक सवलती देखील असतात. तसेच सरकारची भविष्यकालीन कृषी, व्यापार उद्योगांविषयीची ध्येयधोरणे त्या दस्तऐवजात असतात. ही ध्येयधोरणे कागदावरून प्रत्यक्ष कृतीत आल्यावर कृषी, औद्योगिक विकासदर वृद्धिंगत होऊन सकल राष्ट्रीय उत्पादनाचा (जीडीपी) दर वाढीला लागतो हा एक भाग झाला.

दुसऱ्या भागाशी गुंतवणूकदारांचा संबंध येतो. अर्थव्यवस्थेच्या विकासाचे, कृषी, औद्योगिक, जीडीपीच्या वृद्धीचे प्रतिबिंब म्हणजे भांडवली बाजाराचा वाढता/तेजीत असलेला निर्देशांक (स्टॉक मार्केट इज द बॅरोमिटर ऑफ द इकॉनॉमी!) मानला जातो.

पहिल्या भागातील सरकारची ध्येयधोरणे प्रत्यक्ष कृतीत आणताना श्रम, मेहनत, कष्ट घ्यावे लागतात आणि ते प्रामाणिकपणे घेतल्यास अर्थव्यवस्था सदृढ, बाळसेदार होते. पण कृत्रिमरीतीने (स्टेरॉइड्स) निर्देशांक चढता, वाढता ठेवल्यास तो विनाशास कारणीभूत ठरतो. जे आपण १९९२, २००८ साली अनुभवले. मुख्यत्वे ‘बाळसे आणि सूज’ यामधील फरक समजला पाहिजे. आताच्या घडीला सर्व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ सध्याच्या तेजीला ‘तेजीचा फुगा’ म्हणून संबोधतात आणि त्यात अर्थसंकल्पाकडून वारेमाप अपेक्षा असल्याने व तो प्रत्यक्षात सादर झाल्यावर बहुतांश वेळेला अपेक्षाभंग होतो. त्यामुळे गुरुवारी सादर होणारा अर्थसंकल्प बाजाराला निराशाजनक वाटल्यास निर्देशांक प्रथम ३४,७००/ १०,८५० ते १०,७०० आणि  त्यानंतर ३४.००० / १०,५०० पर्यंत खाली घसरू शकतो. अर्थसंकल्प ‘जो जे वांच्छिल तो ते लाभो’ असा सर्व क्षेत्रांना समाधानकारक वाटल्यास निर्देशांकांचे ३७,५०० / ११,५०० हे वरचे इच्छित उद्दिष्ट असेल.

सोन्याचा किंमत-वेध

आज्ञाधारक विद्यार्थ्यांची नेत्रदीपक प्रगती म्हणजे सोन्याच्या किमतीची वाटचाल. अवघ्या दीड महिन्यापूर्वी सोन्याचे भाव रु. २८,००० होते हे कोणाला सांगून खरे वाटणार नाही. (अर्थसत्ता, १६ डिसेंबर, ‘बाजार तंत्रकल’) तेव्हापासून आजतागायत सोन्याच्या आलेखांनी वाचकांसाठी नवनवीन तेजीची दालने उघडली आहेत. नवीन २०१८ साल तर मौल्यवान धातूतील मूल्यवृद्धीसाठी खासच ठरले आहे. सोन्याच्या किमतीला रु. २९,८०० चा भरभक्कम आधार असून रु. ३०,५०० हे वरचे इच्छित उद्दिष्ट असेल.(सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित).

लक्षणीय समभाग

  • बीजीआर एनर्जी लिमिटेड (बीएसई कोड – ५३२९३०)
  • शुक्रवारचा बंद भाव : रु. १३६.४०

बीजीआर एनर्जी समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु. १३० ते रु. १५५ आहे.  तेजीच्या दृष्टीने रु. १५५ ही महत्त्वाची ‘कलनिर्धारण पातळी’ आहे. रु. १५५च्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन प्रथम वरचे उद्दिष्ट हे रु. १७० असे असेल. त्यानंतरचे लक्ष्य हे रु. १८५ ते रु. २०० असे असेल, तर दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट हे रु. २५० असेल. येणारे दिवस हे नाटय़पूर्ण घडामोडीचे (अर्थसंकल्प, तिमाही निकाल) असल्यामुळे समभाग आपल्या नजरेसमोर (रडारवर) ठेवून प्रत्येक घसरणीत २५ टक्क्यांच्या चार तुकडय़ात खरेदी करावी. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला रु. १२० चा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

आशीष अरविंद ठाकूर

ashishthakur1966@gmail.com

First Published on January 29, 2018 2:41 am

Web Title: bse nse nifty sensex 36