05 March 2021

News Flash

निर्देशांकांची उद्दिष्टपूर्ती!

गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे सोन्यावर एक संक्षिप्त विश्रांती अपेक्षित होती

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| आशीष अरविंद ठाकूर

कर्जरोखे अर्थात बॉण्डचे व्याजदर तीन टक्क्यांवर झेपावणे, खनिज तेलाचे सातत्यपूर्ण चढे दर यामुळे अमेरिकी आणि अन्य आंतरराष्ट्रीय बाजार कोसळताना दिसले. तर आपल्याकडे महिन्यातील शेवटचा वायदापूर्ती गुरुवार असताना देखील सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांनी आपले प्रथम वरचे उद्दिष्ट अनुक्रमे ३५,०००/१०,७०० गाठून गुंतवणूकदारांच्या कोमेजलेल्या मनाला उभारी दिली. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव –

  • सेन्सेक्स : ३४,९६९.७०
  • निफ्टी :      १०,६९२.३०

या आठवडय़ात निर्देशांकाचा भरभक्कम आधार हा ३४,०००/ १०,४०० असेल आणि वरचे इच्छित उद्दिष्ट हे ३५,३५०/ १०,७५० ते १०,८०० असेल. आता आपण निर्देशांकाचे मिशन २०२०च्या तिसऱ्या भागाकडे वळू. यात संभाव्य उच्चांक आणि उच्चांकाची तारीख काय असेल त्याचा आढावा घेऊ या.

गॅन कालमापन पद्धतीनुसार (गॅन टाइम सायकल) मे महिन्याचा पहिला पंधरवडा हा सर्वात महत्त्वाचा कालावधी आहे. यातील ३, ७, १५ ते १८ मे या महत्त्वपूर्ण तारखा आहेत. या कालावधीत निर्देशांकाच्या तेजीच्या धारणेला कलाटणी मिळू शकते. या दिवसात निर्देशांकाचा संभाव्य उच्चांक हा ३३,३५० ते ३६,००० आणि  १०,८०० ते ११,००० असून नंतरच्या घसरणीत निर्देशांक प्रथम ३४,०००/ १०,४०० आणि त्यानंतर ३३,०००/ १०,२५० पर्यंत निर्देशांक खाली येऊ शकतो. तेव्हा अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांनी (गुंतवणुकीचा कालावधी तीन महिन्याहून कमी) फायदा पदरात पाडून घेणे श्रेयस्कर ठरेल. ही घसरण झाल्यानंतर निर्देशांक पुन्हा ३६,४४३/ ११,१७१ उच्चांकांना गाठेल.

सोन्याचा किंमत-वेध

गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे सोन्यावर एक संक्षिप्त विश्रांती अपेक्षित होती आणि ती आपण गेल्या आठवडय़ात अनुभवली. सोन्याने रु. ३१,६००चा उच्चांक मारून सोने रु. ३१,२०० पर्यंत खाली घसरले. येणाऱ्या दिवसात सोन्याचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु. ३१,१०० ते ३१,६०० असेल. रु. ३१,१०० चा स्तर टिकवण्यात सोने अपयशी ठरल्यास सोने रु. ३०,८५० पर्यंत खाली घसरू शकते. (सोन्याचे भाव एमसीएक्स व्यवहारांवरील)

  • प्राज इंडस्ट्रीज (बीएसई कोड : ५२२२०५)
  • शुक्रवारचा बंद भाव – रु. ९३.२५

एकीकडे खनिज तेलाचे गगनाला भिडणारे भाव, तर बरोबर उलट ऊस, साखरेच्या विक्रमी उत्पादनामुळे साखरेचे कोसळणारे भाव या दोन्ही समस्यांचे एकच उत्तर म्हणजे ‘इथेनॉल’. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण केल्यास पेट्रोल थोडे स्वस्त होईल आणि खनिज तेलाची आयातही कमी होईल. इथेनॉल बनविण्यासाठी कच्चा माल म्हणून उसाची मळी वापरण्यात येते. त्यामुळे ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळेल. इथेनॉलवरचा वस्तू व सेवा कर १५ टक्क्य़ांवरून ५ टक्क्य़ांवर आणण्याची शिफारस आहे. या सर्व घटकांचा लाभार्थी म्हणजे प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड. समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा ७५ ते १०० रुपये आहे. १०० रुपयांच्यावर शाश्वत तेजी सुरू होऊन प्रथम वरचे उद्दिष्ट ११० ते १३० रुपये असेल. दीर्घमुदतीचे उद्दिष्ट १६० रुपये असेल. या गुंतवणुकीला ६५ रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

lashishthakur1966@gmail.com

(अस्वीकृती:  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 12:07 am

Web Title: bse nse nifty sensex 41
Next Stories
1 नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा
2 ज्येष्ठ नागरिकांना पन्नास हजार रुपयांच्या व्याजावर करातून सूट
3 भूगोलाची तयारी
Just Now!
X