|| आशीष अरविंद ठाकूर

गेल्या लेखातील वाक्य होते.. ‘‘बाजार महत्त्वाच्या अशा वळणिबदूवर उभा आहे. जर कर्नाटक निवडणुकांचे निकाल भाजपच्या बाजूने लागल्यास सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक प्रथम ३६,०००/११,००० या पातळ्यांना गवसणी घालतील. तसेच गॅन कालमापन पद्धतीप्रमाणे मे महिन्याचा पहिला पंधरवडा हा सर्वात महत्त्वाचा कालावधी आहे. या कालावधीत निर्देशांकाच्या तेजीच्या धारणेला कलाटणी मिळू शकते..’’ याचा प्रत्यय आपण गेल्या आठवडय़ात घेतला. निर्देशांकांनी १५ मेला (कर्नाटक निकालाच्या दिवशी) ३५,९९३ / १०,९२९ चा उच्चांक मारला. पण उत्तरोत्तर निकालाचा कल बदलत गेला आणि दिवसांतर्गत सेन्सेक्सवर ४५० अंशांची आणि निफ्टीवर १२८ अंशांची घसरण नोंदवून बाजारातील तेजीच्या धारणेला कलाटणी मिळाली या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया.

शुक्रवारचा बंद भाव –

  • सेन्सेक्स : ३४,८४८.३०
  • निफ्टी :      १०,५९६.४०

गुंतवणूकदारांना समभाग खरेदी करण्यासाठी जी एक संक्षिप्त घसरण हवी आहे ती संधी आता मिळत आहे. शनिवारी विधानसभेत भाजपच्या मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी बहुमत सिद्ध अपयश स्वीकारून दिलेल्या राजीनाम्याने ही शक्यता आणखीच अधोरेखित केली आहे. आगामी घसरणीत पहिला आधार हा सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांवर अनुक्रमे ३४,६५३/१०,५५४ आणि नंतर ३४,२३८ /१०,४३९ हा दुसरा आधार असेल. वरीलपकी एखादा स्तर टिकवण्यात निर्देशांक यशस्वी ठरल्यास निर्देशांकात पुन्हा भरीव सुधारणा दिसून येईल.

आता आपण निर्देशांकांचे मिशन २०२०च्या पाचव्या भागाकडे वळूया. तांत्रिक विश्लेषण शास्त्राच्या आधारे २९ जानेवारीच्या उच्चांकाचे भाकीत हे १५ जानेवारीच्या लेखात केले गेले आणि त्यानंतरच्या मंदीच्या घातक उताराबद्दल सावध करण्यात आले होते. तत्पश्चात निर्देशांकावर १० टक्के आणि ‘ब’ वर्गातील (मिड कॅप) समभागामध्ये तर २० टक्क्यांची घसरण झाली आहे. या घातक उतारामुळे-मंदीने त्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांच्या कोमेजलेल्या मनाला उभारी देण्यासाठी निर्देशांकाचे मिशन २०२०ची मालिका सुरू करून, त्यात २०२० साली सेन्सेक्स ४०,००० आणि निफ्टी १३,०००चे शिखर गाठेल याचे सूतोवाच केले. याचा प्रत्यय अवघ्या दोन महिन्यांत आला सेन्सेक्सवर पुन्हा ३,५०० अंशांची आणि निफ्टीवर ९७८ अंशांची भरीव सुधारणा होऊन बाजार मंदीच्या गत्रेतून बाहेर आला. येणाऱ्या दोन ते तीन महिन्यांत सेन्सेक्सवर ३७,००० ते ३७,५०० आणि निफ्टीवर ११,२०० ते ११,३७५ चा नवीन उच्चांक दृष्टिपथात येईल.

सोन्याचा किंमत-वेध

सोन्याने आपले रु. ३१,६००चे वरचे उद्दिष्ट गाठले पण या स्तराला सकारात्मक वरचा छेद देण्यास अपयश आल्याने सोन्यावर नफारूपी विक्री होऊन सोने पुन्हा रु. ३०,८००च्या महत्त्वाच्या कल निर्धारण पातळीच्या आसपास आले. येणाऱ्या दिवसात सोने रु. ३१,३००चा स्तर ओलांडण्यास अपयशी ठरले आणि रु. ३०,८००ची भरभक्कम पातळी देखील राखण्यात अपयशी ठरल्यास सोने रु. ३०,५०० पर्यंत खाली घसरू शकते. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित).

बोडल केमिकल्स ही डाइज, डायस्टफ व सल्फर रसायनाचे उत्पादन आणि निर्यातीमधील अग्रेसर कंपनी. या समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा ११० रुपये ते १४५ रुपये असा आहे. बोडल केमिकल्स १३० रुपयांचा स्तर या आठवडय़ात सातत्याने टिकवण्यात यशस्वी ठरल्यास अत्यल्प मुदतीचे उद्दिष्ट १४५ रुपये आहे. १४५ रुपयांच्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन प्रथम वरचे उद्दिष्ट १६० रुपये आणि दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट १८० रुपये आणि २०० रुपये असेल. गुंतवणूकयोग्य रक्कम २५ टक्क्यांच्या चार तुकडय़ात विभागून प्रत्येक घसरणीत हा समभाग खरेदी करण्याचा विचार करावा. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला १०० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.