21 March 2019

News Flash

किंतु-परंतुमध्ये अडकलाय निर्देशांक

तेजीची खरी कसोटी ही सेन्सेक्सवर ३५,३४५ आणि निफ्टीवर १०,७३३ च्या स्तरावरच लागेल.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| आशीष अरविंद ठाकूर

गेल्या लेखातील वाक्य होते.. तेजीची खरी कसोटी ही सेन्सेक्सवर ३५,३४५ आणि निफ्टीवर १०,७३३ च्या स्तरावरच लागेल. येणाऱ्या दिवसांत हा स्तर ओलांडण्यास निर्देशांक यशस्वी ठरला तरच ३६,००० / १०,९००चा स्तर दृष्टिपथात येईल. गुरुवारी संध्याकाळी सकल राष्ट्रीय उत्पादनाचे उमद्या आकडय़ांचे उत्तम खतपाणी मिळूनही शुक्रवारी हा स्तर पार करण्यास निर्देशांक अपयशी ठरले. दोन्ही निर्देशांक अनुक्रमे ३५,३४५ / १०,७३३ स्तराजवळच घुटमळत असल्याच्या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव –

  • सेन्सेक्स :       ३५,२२७.२६
  • निफ्टी :      १०,६९६.२०

गेल्या आठवडय़ातील पूर्वार्धात मंगळवार, २९ मे रोजी सेन्सेक्सवर ३५,२४० आणि निफ्टीवर १०,७१७ चा उच्चांक मारून युरोपीय आíथक समुदायातील इटलीची समस्या, अमेरिकन बाजार कोसळल्याचे कारण देत आपल्या इथे निर्देशांक खाली घसरायला लागला. पण त्यात भरीव अशी घसरण होत नव्हती. जी निर्देशांकांची मजबूत स्थिती दर्शवत होती. या आठवडय़ात निर्देशांक पुन्हा ३५,३४५ / १०,७३३ चा स्तर गाठण्याचा प्रयत्न करेल. त्यात यशस्वी झाल्यास ३६,००० / १०,९०० चा स्तर दृष्टिपथात येईल. अन्यथा ३४,८०० ते ३४,२५० / १०,६०० ते १०,४५० स्तरावर आधार घेऊन निर्देशांक ३७,००० / ११,३५० ते ११,४०० च्या नवीन उच्चांकावर झेपावेल.

सोन्याचा किंमत-वेध

  • सोन्याचे भाव ३१,००० रुपयांच्या स्तराखाली बंद झाल्याने तेजीवाल्यांच्या गोटात चलबिचल सुरू झाली. सोन्याने मंदीवाल्यांच्या गोटात पक्षांतर तर केले नाही ना, अशी शंका येऊ लागली आहे. सोन्यावरील तेजीचा विश्वासदर्शक ठराव हा ३१,३०० ते ३१,५०० स्तरावरच संमत होईल. अन्यथा ३१,००० च्या स्तराखाली सोन्याचे पक्षांतर हे मंदीवाल्यांच्या गोटात होऊन सोने ३०,५०० रुपयांपर्यंत खाली घसरू शकते. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित)

लक्षणीय समभाग

धामपूर शुगर मिल्स लि. (बीएसई कोड – ५००११९)

शुक्रवारचा बंद भाव – रु. १०५.३०

  • ‘साखरेचे खाणार त्याला देव देणार’ अशी एक म्हण आहे. साखर उद्योगातील धामपूर शुगर ही शतकोत्तर जुनी कंपनी, पण जसे रक्तात साखरेचे प्रमाण जास्त वाढल्यावर मधुमेह होतो तसेच काहीसे साखर उद्योगाचे झाले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उसाच्या विक्रमी उत्पादनामुळे साखरेचे भाव कोसळलेले आहेत. आता मंदीच्या गत्रेत सापडलेला हा उद्योग तारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बठकीत साखर उद्योगाला सवलती (पॅकेज) मिळण्याच्या प्रतीक्षेत या उद्योगातील मंडळी डोळे लावून बसली आहेत. धामपूर शुगरचा सामान्य मार्गक्रमण पट्टा हा ७४ ते १०५ रुपये आहे. १०६ रुपयांच्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन अत्यल्प मुदतीचे उद्दिष्ट हे ११८ रुपये असेल. धामपूर शुगर १२० रुपयांच्या वर टिकल्यास प्रथम वरचे उद्दिष्ट १५० रु व दीर्घमुदतीचे उद्दिष्ट २०० रुपये असेल. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला ७४ रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published on June 4, 2018 12:03 am

Web Title: bse nse nifty sensex 48