|| आशीष अरविंद ठाकूर

निर्देशांक जराही उसंत न घेता नवनवीन शिखर सर करत असल्यामुळे या स्तंभात २३ मार्चपासून सुरू केलेल्या ‘मिशन २०२०’ या शृंखलेत उल्लेखल्याप्रमाणे, निफ्टी १२,००० चे उद्दिष्ट आताच गाठणार का? हा एका बाजूला पडलेला प्रश्न तर दुसऱ्या बाजूला निर्देशांकात भूमिती श्रेणीतील होणारी वाढ (जिओमेट्रिकल प्रोग्रेशन – जी.पी. राईज) हा तेजीचा फुगा (बबल) तर नाही ना? अशा विविध शंका आजच्या घडीला निर्माण होत आहेत. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव –

  • सेन्सेक्स :       ३७,८६९.२३
  • निफ्टी :      ११,४२९.५०

येणाऱ्या दिवसात निर्देशांकाचे वरचे इच्छित उद्दिष्ट हे ११,५५० ते ११,६०० असेल. येथून निफ्टी निर्देशांकावर ३०० ते ५०० अंशांची घसरण अपेक्षित आहे. तेव्हा अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांनी (गुंतवणूक कालावधी तीन महिन्यांहून कमी) जोपर्यंत ही घसरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत बाजारापासून दूर राहणे श्रेयस्कर. कारण आता निर्देशांकाची सर्व वरची इच्छित उद्दिष्टे गाठली जात आहेत. या हर्षोन्मादात आता घसरण ही ‘अशक्यप्राय गोष्ट आहे’ अशी जेव्हा गुंतवणूकदारांची भावना बळावते त्या गाफील क्षणी मंदी अवतरते. याचा अनुभव आपण २९ जानेवारीला घेतला आहे. या महिना अखेपर्यंत निफ्टीवर ११,६०० ते ११,८०० चे स्तर पण येतील. पण हे मोहाचे क्षण ‘लबाडाघरचं आवतण हे जेवल्याखेरीज खरं नाही’ अशा स्वरूपाचे असतील.  त्यामुळे हा मोह आणि मृगजळामागे धावायचे सोडून शांत बसण्याची गरज आहे. कारण शांत बसण्याची एक किंमत असते, ती शांत बसूनच द्यावी लागते. अन्यथा ती पैशाच्या स्वरूपात मोजावी लागते. तेव्हा या तेजीत अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांनी निर्देशांकाच्या प्रत्येक वाढीव टप्यावर २५ टक्क्य़ांच्या चार तुकडय़ात नफ्यात असलेल्या समभागाची विक्री करून नफा गाठीला बांधून घेणे श्रेयस्कर!

सोन्याचा किंमत-वेध

  • आजही सोने २९,४०० स्तराचा आधार घेत २९,७०० ते ३०,००० ची वाटचाल करीत आहे. सोन्यावर रुपये ३०,२०० स्तरावरच शाश्वत तेजी सुरू होत असल्याने हा स्तर ओलांडण्यात सोने वारंवार अपयशी ठरल्यास सोने पुन्हा २९,४०० आणि त्यानंतर २९,००० ते २८,८०० पर्यंत खाली घसरू शकते. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित)

लक्षणीय समभाग भारत फोर्ज लिमिटेड

(बीएसई कोड – ५००४९३)

शुक्रवारचा बंद भाव – रु. ६२९.४५

  • कल्याणी उद्योग समूहातील फोर्जिंग क्षेत्रातील ही आघाडीची कंपनी. या कंपनीची उत्पादने पोलाद, ट्रक, संरक्षण, क्षेत्रात वापरली जातात. भारत फोर्ज समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु. ५७५ ते रु. ६५५ आहे. रु. ६५५ च्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन अत्यल्प मुदतीचे उद्धिष्ट हे रु. ६७५ ते रु. ७०० असेल. दीर्घमुदतीचे उद्दिष्ट हे रु. ८०० असेल. या दीर्घमुदतीच्या गुतंवणुकीला रु. ५७० चा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.