|| आशीष अरविंद ठाकूर

गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे निफ्टी निर्देशांक ११,५५० ते ११,६००च्या लक्ष्याकडे वाटचाल करीत आहे. यात एखाददिवशी निफ्टीवर ८० ते १०० अशांची घसरण ही क्षणिक ठरून दुसऱ्या दिवशी निर्देशांक पुन्हा सावरून वरची वाटचाल कायम राखत आहे. असा तेजी मंदीचा खो-खो गेल्या आठवडय़ात निर्देशांकावर चालू होता. अशा पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया.

शुक्रवारचा बंद भाव –

  • सेन्सेक्स : ३७,९४७.८८
  • निफ्टी : ११,४७०.८०

तुर्कस्तानच्या चलनाचा प्रश्न, डॉलर ७०च्या पल्याड झेपावणे, वाढती व्यापारी तूट या निराशाजनक बातम्या दुर्लक्षून सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकानी आपले वरचे लक्ष्य अनुक्रमे ३८,३०० / ११,५५० ते ११,६०० च्या दिशेने घोडदौड सुरू ठेवली आहे. या महिन्याअखेरीपर्यंत ते साध्य पण होईल (यात एक संक्षिप्त घसरण ३७,००० /११,२०० पर्यंत गृहीत धरावी.) हे लक्ष्य म्हणजे ३८,३०० / ११,५५० ते ११,६०० साध्य झाल्यावर, अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांनी या उच्चांकावर नफ्यातील समभाग विकणे श्रेयस्कर! कारण त्या नंतर सेन्सेक्सवर १,००० ते १,५०० अंशांची आणि निफ्टीवर ३०० ते ५०० अंशांची घसरण संभवते.

सोन्याचा किंमत-वेध

गेल्या लेखातील वाक्य होते.. आजही सोने २९,४०० स्तराचा आधार घेत २९,७०० ते ३०,००० ची वाटचाल करत आहे. सरलेल्या आठवडय़ात ‘याची देहा याची डोळा’ प्रचीती येऊन, सोन्याने वरचे इच्छित उद्दिष्ट रु. २९,८०० चा उच्चांक सोमवारी नोंदवला. त्यानंतर घसरण सुरू झाली आणि शुक्रवारी रु. २९,२६८ चा नीचांकही नोंदवला. येणाऱ्या दिवसात सोन्याचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बँड) हा रु. २९,१०० ते २९,४०० असा आहे. २९,४००च्या स्तरावर सोने सातत्याने टिकल्यास २९,७०० ते २९,८०० चा स्तर दृष्टिपथात येईल. अन्यथा २९,४०० च्या स्तराखाली सोने रु.२९,१०० ते २८,८०० पर्यंत खाली घसरू शकते.(सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित)

सुवेन लाइफ सायन्सेस लिमिटेड (बीएसई कोड –५३०२३९) शुक्रवारचा बंद भाव – रु. २३४

  • मेंदूच्या व्याधीवर (विस्मृती, अल्झायमर), नैराश्य अशा विविध व्याधींवर कार्यरत असलेली सुवेन लाइफ सायन्सेस ही औषध कंपनी. सुवेन लाइफ सायन्सेस समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु. २०० ते रु. २४० आहे. रु. २४०च्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन अत्यल्प मुदतीचे उद्दिष्ट हे रु. २६० ते रु. २८० असेल. दीर्घमुदतीचे उद्दिष्ट हे रु. ३३० ते रु. ३५० असेल. गुंतवणूकयोग्य रक्कम २५ टक्क्याच्या चार तुकडय़ांत विभागून प्रत्येक घसरणीत अथवा शाश्वत तेजी स्तरावर हा समभाग खरेदीचा विचार करावा. या दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला रु. १९० चा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

बाजारातील तेजीने लार्ज कॅप फंडांत गुंतवणुकीची संधी

  • भांडवल बाजारातील ताज्या सुरू असलेल्या तेजीने निर्देशांकांनी नवा उच्चांक स्थापित केला आहे. मात्र अजूनही बाजारातील लार्जकॅप शेअर्सच्या किंमती आकर्षक आहेत. मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या तुलनेत लार्ज कॅप शेअर गुंतवणुकीस पोषक असल्याने बहुतांश फंड घराणी लार्ज कॅप फंडांना पसंती देत आहेत.

लार्ज कॅप समभागांमधून दीर्घ कालावधीत चांगला परताव्याची शक्यता असते. लार्ज कॅप फंडातून समभाग आणि समभागाशी संलग्न पर्यायांमध्ये गुंतवणूक केली जाते. याच श्रेणीतील ऑगस्ट २००९ मध्ये सुरू झालेल्या इन्व्हेस्को इंडिया लार्ज कॅप फंडामधून मुख्यत्वे लार्ज कॅप समभागांमध्ये गुंतवणूक होते. वर्षांच्या सुरुवातीच्या काळातील घसरणीत, मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या तुलनेत लार्जकॅप फंडाचे कमी नुकसान झाले आहे. जानेवारी २००४  ते जून २००४ या कालावधीत मिडकॅप २१.२८ टक्के आणि स्मॉल कॅप निर्देशांकात २८.४६ टक्क्यांची घट झाली होती. याच कालावधीत लार्ज कॅपमध्ये १८.९३ टक्के घट झाल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे २९ जानेवारी २०१८ ते २७ जून २०१८ या कालावधीत मिड कॅपमध्ये १२.९० टक्के आणि स्मॉल कॅपमध्ये १६.५१ टक्के घट नोंदवण्यात आली. त्या उलट लार्ज कॅपमध्ये केवळ २.९४  टक्के घट झाली आहे.

इन्व्हेस्को इंडिया लार्ज कॅप फंडातील ८० टक्के निधी हा नेमक्या २० ते ३० लार्ज कॅप समभागांमध्ये गुंतविण्यात येतो. ३० जून २०१८ पर्यंत यातील ७२.५० टक्के गुंतवणूक १० प्रमुख समभागांमध्ये केली गेली आहे. पाच वर्षांमध्ये सरासरी १५.८३ टक्के परतावा या फंडाने दिला आहे. तो त्याचा मानंदड असलेल्या निफ्टी निर्देशांकाच्या याच काळातील १४.२८ टक्के परताव्यापेक्षा सरस आहे. सात वर्षांचा विचार करता या योजनेतून वार्षिक ११.९६ टक्के दराने परतावा गुंतवणूकदारांनी मिळविला. तर निफ्टी-५०  निर्देशांकाने १०.९३ टक्के परतावा दिला आहे. पाच वर्षांमध्ये दरमहा नियोजनबद्ध अर्थात ‘एसआयपी’तील गुंतवणुकीचा परतावा १३.२७ टक्के आणि निफ्टी-५० बेंचमार्कचा परतावा १२.७९ टक्के असा आहे.

सध्याच्या घडीला लार्ज कॅपचे मूल्यांकन(पी/ई) २५.९० पटीत आहे, त्या उलट सपाटून मार खाऊनही मिड कॅपचे मूल्यांकन ४८ पट असे चढे आहे.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.