23 February 2019

News Flash

प्रश्न हाच.. तेजीत समभाग विकायचे की राखून ठेवायचे ?

जे गेल्या आठवडयात साध्य झाल्यमुळे या आठवडय़ाची वाटचाल कशी असेल ते जाणून घेऊया.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| आशीष अरविंद ठाकूर

सध्याच्या बाजार तेजीची सुरुवात ही २३ मार्चपासून झाली आणि त्या वेळेला निर्देशांकाचे वरचे इच्छित उद्दिष्ट सेन्सेक्स-निफ्टीसाठी अनुक्रमे ३८,३००/११,६०० असे होते. जे गेल्या आठवडयात साध्य झाल्यमुळे या आठवडय़ाची वाटचाल कशी असेल ते जाणून घेऊया.

शुक्रवारचा बंद भाव –

  • सेन्सेक्स : ३८,२५१.८०
  • निफ्टी: ११,५५७.१०

येणाऱ्या दिवसात निर्देशांक ३९,०००/ ११,८०० चा नवीन उच्चांक गाठणार की सेन्सेक्सवर १,००० आणि निफ्टीवर ३०० ते ५०० अंशांची घसरण होणार? या प्रश्नाच्या उत्तराचे दिशानिर्देशन निर्देशांकाचे ३८,३००/ ११,६०० हे स्तर करतील. येणाऱ्या पंधरा दिवसात निर्देशांक सातत्याने या स्तरावर टिकल्यास ३९,०००/ ११,८०० चा स्तर दृष्टीपथात येईल अन्यथा घसरणीची मानसिक तयारी ठेवायला हवी. या मागची कारणे अशी:

१) हल्ली तेजी-मंदीचे स्वरुपच बदलले आहे. बाजारात तेजी र्सवकष नाही तर ‘अ’ वर्गातील / वायदा बाजारातील (एफ अँड ओ) मधील मोजक्या दहा समभागांना हाताशी धरून तेजीचा पतंग उडवत ठेवला गेला आहे. ज्यात सामान्य गुंतवणूकदारांकडे असलेल्या चांगल्या प्रतीच्या समभागांचा या तेजीत सहभाग शून्य! पण मंदीत मात्र याच समभागांमध्ये रक्तपात आणि किंमतीचा पाळापाचोळा असा क्रम राहिला आहे. याचा अनुभव आपण मे महिन्यात घेतला आहे. त्यामुळे अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांनी (गुंतवणूक कालावधी तीन महिन्यांहून कमी, तसेच दहा ते पंधरा टक्के परताव्याची अपेक्षा आहे अशांनी) विषाची परीक्षा न पाहता नफारूपी विक्री करणे श्रेयस्कर.

दुसर महत्त्वाचे कारण म्हणजे नवीन तेजीची सुरुवात ही नेहमी दुर्लक्षित असलेले उद्योग क्षेत्र व त्या क्षेत्रातील समभागांपासून होते. हा मुद्दा स्पष्ट करण्याठी औषधक्षेत्राचे (फार्माचे) उदाहरण घेऊया. गेली दोन वर्ष हे क्षेत्र मंदीत होते. ज्या गुंतवणूकदारांनी त्या वेळेला औषध कंपन्या घेतल्या त्यांना डॉक्टरांकडून औषध घ्यायची वेळ आली इतके भाव कोसळले. पण जेव्हा या क्षेत्रातील मंदी सरते आहे हे जेव्हा आलेखांवर सूचीत झाले तेव्हा.. २५ जूनच्या लेखातील वाक्य होते – ‘सर्व औषध कंपन्या या प्रदीर्घ मंदीतून बाहेर येत आहेत’, तेव्हापासून या स्तंभात बहुतांश वेळेला लक्षणीय समाभागात औषधकंपन्या सुचविल्या उदाहरणार्थ, रू. २९ ला सुचवलेला मार्कसन्स फार्मा, सनफार्मा (रू.५५९) लुपिन (रू.८१५), ग्लेनमार्क (रू. ५९७) आणि सुवेन लाईफ (रू. २३४) या समभागांनी अवघ्या दोन महिन्यात १० ते १५ टक्के परतावा दिला आहे. त्यानंतर आता औषधक्षेत्र सर्वतोमुखी बनले आहे. तेव्हा अधोरेखित करायचा मुद्दा हाच की, आता चालू असलेल्या तेजीत अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांनी नफ्यातील समभाग विकून मंदीसाठी भांडवल निर्माण करावे. भविष्यात उत्कर्ष / विकसित पावणारे क्षेत्र, त्यातले समभाग निवडून त्यात पैसे त्यांना गुंतविता येतील.

सोन्याचा किंमत-वेध

आजही सोने रु. २९,४०० स्तराचा आधार घेत २९,८०० ची वाटचाल करत आहे. पण २९,८०० चा स्तर पार करण्यास वारंवार अपयश येत असल्याने आता सोने रू. २९,४०० चा स्तर तरी टिकवेल का, हा प्रश्न आहे. रू. २९,४०० च्या स्तराखाली सोने २९,१०० ते २८,८०० पर्यंत खाली घसरू शकते.  सोन्यावर शाश्वत तेजी ही रू. ३०,२०० वरच सुरु होईल. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित)

आयओएल केमिकल अ‍ॅण्ड फार्मास्युटिकल्स लि.

(बीएसई कोड – ५००४९३) शुक्रवारचा बंद भाव – रु. ६२९.४५

  • मधुमेह, रक्तदाब,अशा विविध व्याधींवर कार्यरत असलेली आयओएल केमिकल अ‍ॅण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेड ही औषध कंपनी. या समभागाचा सामान्य मार्गRमण पट्टा (बँण्ड) हा रु. १०० ते १३२ आहे. रु. १३२च्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन अत्यल्प मुदतीचे उदिष्ट हे रु. १४५ आणि नंतर रू. १६०असेल. दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट हे रु. १९०असेल. गुंतवणूकयोग्य रक्कम २५ टक्क्य़ांच्या चार तुकडय़ात विभागून प्रत्येक घसरणीत अथवा शाश्वत तेजी स्तरावर या समभागाच्या खरेदीचा विचार करावा. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला रू. ९० चा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published on August 27, 2018 12:04 am

Web Title: bse nse nifty sensex 53