18 April 2019

News Flash

हालचाल शिस्तबद्धच!

निफ्टी पुन्हा ११,७००च्या आसपास घुटमळत आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| आशीष अरविंद ठाकूर

गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे निफ्टी निर्देशांक ११,६०० स्तरावर पंधरा दिवस टिकल्यास निफ्टीचे ११,८०० हे वरचे इच्छित उद्दिष्ट साध्य होईल. सरलेल्या आठवडय़ात निफ्टीने ११,८०० चे इच्छित उद्दिष्ट साधल्याचा आनंद थोडक्यात हुकला. निफ्टी पुन्हा ११,७००च्या आसपास घुटमळत आहे. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया.

शुक्रवारचा बंद भाव –

  • सेन्सेक्स :३८,६४५.०७
  • निफ्टी : ११,६८०.५०

आंतरराष्ट्रीय पटलावरील अमेरिका विरुद्ध सर्व जग यामधील व्यापार युद्ध, चलन विनिमय दरात सशक्त डॉलर आणि कमकुवत रुपया, खनिज तेलाच्या भडकलेल्या किमतीमुळे अर्थव्यवस्थेवर येणारा ताण या सर्व निराशाजनक बातम्या धडकत होत्या. त्याकडे दुर्लक्ष करून निर्देशांकांनी आपली चढती कमान कायम राखली आहे. सगळं आलबेल चालू आहे असा एकूणच बाजाराचा आविर्भाव आहे. त्यामुळे तर्कसंगत विचाराने वागणाऱ्या गुंतवणूकदारांची फारच मोठी कुचंबणा होत आहे. थोडक्यात, धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशा द्विधावस्थेत गुंतवणूकदार आहेत. या स्थितीवर तोडग्यासाठी आपण तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेऊया. सध्या सेन्सेक्सवर ३८,४०० ते ३९,००० (असा ६०० अंशांचा) आणि निफ्टीवर ११,६०० ते ११,८०० (असा २०० अंशांचा) पट्टा निर्माण झाला आहे. सेन्सेक्सवर ३९,००० आणि निफ्टीवर ११,८०० च्या सकारात्मक छेदाचे वरचे उद्दिष्ट (अप टार्गेट) हे सेन्सेक्सवर ३९,६०० आणि निफ्टीवर १२,००० असे असेल. (सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या अपेक्षेपेक्षा सरस आलेल्या आकडेवारीमुळे हे उद्दिष्ट शक्य आहे) अथवा या घडीला एक संक्षिप्त घसरण ही ३७,५००/ ११,३५० ते ११,४०० पर्यंत येऊन नंतर ३९,६००/ १२,००० चे शिखर गाठले जाईल.

सोन्याचा किंमत-वेध

गेले दोन महिने सोन्याचे भाव हे शाश्वत तेजीचा रु. ३०,२०० चा स्तर ओलांडण्यात वारंवार अपयशी ठरत होते. पण गेल्या आठवडय़ात सोन्याने हा स्तर पार करून आशेची पालवी जागवली. येणाऱ्या दिवसांत सोन्याचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु. ३०,२०० ते रु. ३०,५०० आणि नंतर रु. ३०,८०० असा असेल. जोपर्यंत सोन्याचे भाव रु. २९,७०० चा स्तर राखून आहेत, तोपर्यंत सोन्यावर तेजी कायम आहे हे गृहीत धरावे. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित)

  • हुतामाकी- पेपर प्रोडक्ट लिमिटेड (बीएसई कोड – ५०९८२०)
  • शुक्रवारचा बंद भाव – रु. २६९.६५

अन्नधान्य, द्रव पदार्थाच्या हाताळणीसाठीची सुविधा (पॅकिंग मटेरियल) बनवणारी हुतामाकी- पेपर प्रोडक्ट (जुने नाव पेपर प्रोडक्ट लिमिटेड) समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा हा रु. २५० ते २७५ आहे. रु. २७५ च्या स्तरावर समभागाची किंमत टिकल्यास अत्यल्प मुदतीचे उद्दिष्ट हे रु. ३०० ते ३१५ असेल. हुतामाकी- पेपर प्रोडक्ट समभागात शाश्वत तेजी ही रु. ३२० च्या स्तरावर सुरू होऊन दीर्घ मुदतीचे प्रथम उद्दिष्ट हे रु. ३५० आणि त्यानंतर रु. ४०० हे दुसरे उद्दिष्ट असेल. गुंतवणूकयोग्य रक्कम २५ टक्क्यांच्या चार तुकडय़ात विभागून प्रत्येक घसरणीत अथवा शाश्वत तेजी स्तरावर हा समभाग खरेदीचा विचार करावा. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला रु. २४०चा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

(गेल्या लेखातील लक्षणीय समभाग ‘आयओएल केमिकल’चा भाव चुकून रु. ६२९ असा छापला गेला, प्रत्यक्षात तो रु. १३०.९० असा वाचावा.)

First Published on September 3, 2018 1:34 am

Web Title: bse nse nifty sensex 57