17 February 2019

News Flash

रुसण्यात उगीच ते हसणे!

आज बाळ कोल्हटकरांच्या काव्यपंक्ती, वसंत देसाई यांचे संगीत आणि पं. कुमार गंधर्व व वाणी जयराम यांच्या अजरामर गीताची ही खास आठवण..

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| आशीष अरविंद ठाकूर

आज बाळ कोल्हटकरांच्या काव्यपंक्ती, वसंत देसाई यांचे संगीत आणि पं. कुमार गंधर्व व वाणी जयराम यांच्या अजरामर गीताची ही खास आठवण.. बाजाराच्या चढ-उतारांमुळे या काव्यपंक्ती डोळ्यासमोर आपसूकच आणल्या.

बाजाराच्या तेजी-मंदीच्या चक्रात, मंदीत.. मंदीच्या दाहकतेमुळे कोमेजलेल्या वाचकांच्या मनाला धीर आणि उभारी देण्यासाठी तेजीचे भाकीत केले की, वाचकांचे ‘मनोहर ते हसणे’ आणि हीच तेजी अंतिम टप्यात येते तेव्हा वाचकांना सावध करणारे लिखाण. जे अर्थातच वाचकांच्या मनाविरुद्ध असते. त्यामुळे वाचकांचे माझ्यावरचे रुसणे.. वगैरे सारे ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी.. त्या या स्तंभलेखनाचा अपरिहार्य भाग बनल्या आहेत. अशा या रुसव्या-फुगव्यात आठवडा कसा निघून जातो ते कळत नाही. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव –

  • सेन्सेक्स : ३८,३८९.८२
  • निफ्टी : ११,५८९.१०

गेल्या दोन लेखात नमूद केल्याप्रमाणे सेन्सेक्सवर ३९,००० आणि निफ्टीवर ११,८०० चा अडथळा ठरला. तिथून अपेक्षित असलेली सेन्सेक्सवर १००० व निफ्टीवर ३०० अंशाची घसरण गेल्या आठवडय़ात सोमवार ते बुधवारदरम्यान येऊन गेली. या आठवडय़ात सेन्सेक्सवर ३८,७०० / निफ्टीवर ११,६५०चा अवघड अडथळा असेल. तेजीच्या दृष्टीने निर्देशांक या आणि पुढील आठवडय़ात सातत्याने ३९,००० / ११,७५० च्या स्तरावर टिकणे नितांत गरजेचे आहे. तरच ३९,६०० /१२,००० चा नवीन उच्चांक दृष्टिपथात येईल. अन्यथा येणाऱ्या दिवसात ३८,७०० /११,६५० चा स्तर पार करण्यात निर्देशांक अपयशी ठरल्यास निर्देशांक ३८,००० /११,३५० ते ११,२५० पर्यंत खाली घसरेल. या स्तरावर सेन्सेक्सवर दीड हजार अंशाची व निफ्टीवर ५०० अंशाची मंदी संपून सुखद तेजी पुन्हा अवतरेल. जिचे वरचे लक्ष्य हे ३९,६०० / १२,००० असे असेल.!

सोन्याचा किंमत-वेध

गेल्या आठवडय़ात देखील सोन्याच्या भावाने रु. ३०,२०० चा स्तर राखत रु. ३०,५०० पर्यंत घोडदौड सुरू ठेवली होती. रु. ३०,५०० च्या सकारात्मक छेदाचे वरचे उद्दिष्ट हे रु. ३०,८०० आणि नंतर रु. ३१,१०० असेल. जोपर्यंत सोन्याचे भाव रु. २९,७०० चा स्तर राखून आहेत तोपर्यंत सोन्यावर तेजी कायम आहे हे गृहीत धरावे. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित)

विप्रो लिमिटेड

  • (बीएसई कोड – ५०७६८५)
  • शुक्रवारचा बंद भाव – रु. ३२४.७०
  • माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील ही आघाडीची कंपनी. गेल्याच आठवडय़ात विप्रोला दहा हजार कोटींची ऑर्डर मिळाल्याने कंपनी प्रकाशझोतात आली. विप्रो समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु. २८५ ते रु. ३२७ असा आहे. रु. ३३० च्या स्तरावर शाश्व्त तेजी सुरू होऊन अत्यल्प मुदतीचे प्रथम उद्दिष्ट हे रु. ३४५ आणि त्यानंतर रु. ३७५ हे दुसरे उद्दिष्ट असेल आणि दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट हे रु. ४५० असेल. विप्रोचा समभाग नव्याने आलेल्या ऑर्डरच्या सुखद बातमीमुळे अल्पावधीत वाढल्याने तो आता खरेदी न करता नजरेसमोर (रडारवर) ठेवून रु. २९० च्या पातळीवर खरेदी करावा. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला रु. २६० चा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published on September 10, 2018 1:56 am

Web Title: bse nse nifty sensex 58