|| आशीष अरविंद ठाकूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या लेखातील वाक्य होते – ‘‘येणाऱ्या दिवसात सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक ३८,७०० / ११,६५०चा स्तर पार करण्यात अपयशी ठरल्यास, निर्देशांक ३८,००० /११,३५० ते ११,२५० पर्यंत खाली घसरतील आणि या स्तरावर सेन्सेक्सवर दीड हजार अंशाची, तर निफ्टीवर ५०० अंशाची मंदी संपून सुखद तेजी अवतरेल.’’ काळाच्या कसोटीवर हे वाक्य तपासले असता, गेल्या आठवडय़ाच्या पूर्वार्धात सोमवार-मंगळवारी दररोज निफ्टीने मंदीचे शतक ठोकून अचूक ५०० अंशाची आणि सेन्सेक्सवर १५०० अंशाची घसरण संपवली. पुढे बाप्पाचे आगमन तेजीचे फटाके उडवून धूमधडाक्यात केले गेले. गेल्या आठवडय़ात निफ्टीने जो अचूक तेजी-मंदीचा गुगलीसदृश डाव गुंतवणूकदारांबरोबर खेळला त्याला कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या ‘लाजून हासणे अन् हासून ते पहाणे.. मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे’ या काव्यपंक्ती चपखल बसतात. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया.

शुक्रवारचा बंद भाव –

  • सेन्सेक्स : ३८,०९०.६४
  • निफ्टी : ११,५१५.२०

या आणि पुढील आठवडय़ात सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक अनुक्रमे सातत्याने ३८,०००/११,५०० स्तरावर टिकण्यात यशस्वी ठरल्यास निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य ३८,४५०/११,६५० आणि त्यानंतर ३९,०००/११,८००चे लक्ष्य असेल. अन्यथा ३८,०००/११,५०० चा स्तर राखण्यात निर्देशांक अपयशी ठरल्यास निर्देशांक पुन्हा ३७,३५०/ ११,२५०चा आधार घेताना दिसतील.

सोन्याचा किंमत-वेध

सोन्याच्या भावाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बँड) हा रु. ३०,५०० ते ३०,८०० असेल. रु. ३०,८००च्या सकारात्मक छेदाचे वरचे उद्दिष्ट हे रु. ३१,१०० असेल. जो पर्यंत सोन्याचे भाव रु. ३०,०००चा स्तर राखून आहेत तोपर्यंत सोन्यावर तेजी कायम आहे हे गृहीत धरावे. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित)

  • एबीबी लिमिटेड (बीएसई कोड – ५००००२)
  • शुक्रवारचा बंद भाव – रु. १,४४८.४०

विद्युत निर्माण क्षेत्रातील एबीबी ही नावाजलेली बहुराष्ट्रीय कंपनी. कालानुरूप बदल करत पर्यावरणस्नेही विजेवर चालणाऱ्या मोटारींचे विद्युतसंचांचा (बॅटरी) चार्जर तिने विकसित केला आहे. या चार्जरच्या साहाय्याने एकदा बॅटरी चार्ज केल्यावर २०० किलोमीटर एवढे अंतर वाहनाद्वारे कापले जाते. उल्लेखनीय म्हणजे ही बॅटरी चार्ज करायला फक्त आठ मिनिटे लागतात. एबीबी आज ही सेवा ६८ देशात ८,००० सेवा केंद्रांमार्फत (चार्जिग स्टेशन) पुरवली जाते.

एबीबी समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु. १,२५० ते रु. १,५०० असा आहे. रु. १,५००च्या स्तरावर शाश्वत तेजी सुरू होऊन अत्यल्प मुदतीचे प्रथम उद्दिष्ट हे रु. १,७५० आणि त्यानंतर रु. २,००० हे दुसरे उद्दिष्ट असेल. दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट हे रु. २,२५० असेल. गुंतवणूकयोग्य रक्कम २५ टक्कय़ांच्या चार तुकडय़ात विभागून प्रत्येक घसरणीत या समभागाचा विचार करावा. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला रु. १,१०० चा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

 

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse nse nifty sensex
First published on: 17-09-2018 at 04:51 IST