07 March 2021

News Flash

बाजारावर भरवसा नाय काय?

गेल्या आठवडय़ात बाजार ज्या कारणांमुळे कोसळत होता.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| आशीष अरविंद ठाकूर

गेल्या आठवडय़ात बाजार ज्या कारणांमुळे कोसळत होता, त्या कारणांचे सूतोवाच हे निर्देशांक ऐन टिपेला / उच्चांकावर असताना या स्तंभातून केलेले आहे. ती कारणं म्हणजे.. आंतरराष्ट्रीय पटलावरील अमेरिका विरुद्ध सर्व जग असे व्यापार युद्ध, चलन विनिमय दारात सशक्त डॉलर आणि कमकुवत रुपया, खनिज तेलाच्या भडकलेल्या किमतीमुळे अर्थव्यवस्थेवर येणारा ताण. या सर्व निराशाजनक बातम्यांकडे त्या वेळेला दुर्लक्ष करून जसे काही सगळे आलबेल चालू आहे असा एकूणच बाजाराचा आविर्भाव होता. वास्तवतेकडे डोळेझाक चालू होती. रोम जळत असताना नीरो फीडल वाजवत होता, तसेच हे होते. त्यामुळे त्या वेळच्या तेजीवर भरोसा नसल्याने या स्तंभातून त्यावर उपाय त्या वेळेला सुचविला होता. सप्टेंबरमध्ये समभाग उच्चांकावर खरेदी करून नंतर बाजार कोसळल्यावर आर्थिक नुकसान ओढवून घेण्यापेक्षा सप्टेंबरमधील सर्व लक्षणीय समभाग त्या वेळेला खरेदी न करता नजरेसमोर ठेवून जेव्हा निर्देशांक ३५,०००/१०,६०० स्तरावर येईल त्या वेळेला खरेदी करावेत, असे सुचविण्यात आले. या सावध भूमिकेमुळे गुरुवार, शुक्रवारच्या समभाग मूल्यांच्या रक्तपातापासून नव्याने गुंतवणूक करू पाहत असलेले वाचक सुरक्षित राहिले याचे समाधान वाटते. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव –

  • सेन्सेक्स :३४,३७६.९९
  • निफ्टी : १०,३१६.४५

येणाऱ्या दिवसात आपण मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक (रिलीफ रॅली) अनुभवणार आहोत. त्याचे प्रथम वरचे लक्ष्य हे ‘सेन्सेक्स’वर ३५,३५० / निफ्टीवर १०,८०० आणि नंतर ३६,५०० / ११,००० असे असेल. यासाठी मुख्य अट.. निर्देशांकांनी ३२,५०० / ९,९५० चा स्तर टिकविणे नितांत गरजेचे आहे.

सोन्याचा किंमत-वेध

इतके दिवस सोन्यावर प्रलंबित असलेले रु. ३१,००० प्रथम वरचे उद्दिष्ट गेल्या आठवडय़ात गाठले गेले. येणाऱ्या दिवसात सोन्याचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा ३०,८०० ते ३१,३०० रुपये असेल. ३१,३०० रुपयांच्या सकारात्मक छेदाचे वरचे उद्दिष्ट हे ३१,६०० रुपये आणि नंतर ३१,९०० रुपये असेल. जोपर्यंत सोन्याचे भाव ३०,३०० रुपयांचा स्तर राखून आहेत तोपर्यंत सोन्यावर तेजी कायम आहे हे गृहीत धरावे. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित)

  • कोचीन शिपयार्ड लिमिटेड (बीएसई कोड – ५४०६७८)
  • शुक्रवारचा बंद भाव – रु. ३८०.७५

भारतीय नौदलासाठी विमानवाहू युद्धनौका बांधणे, नौदलाबरोबरच इतर खासगी बोटींची व्यापारी तत्त्वावर देखभाल व दुरुस्ती करणे आणि सागरी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी कोचीन शिपयार्ड लिमिटेड ही देश-विदेशात प्रसिद्ध असलेली कंपनी आहे. समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा ३५० ते ४०० रुपये आहे. ४१० रुपयांच्या स्तरावर शाश्वत तेजी सुरू होऊन अत्यल्प मुदतीचे प्रथम उद्दिष्ट हे ४२५ ते ४५० रुपये असेल. त्यानंतर ५०० रुपये हे दुसरे उद्दिष्ट असेल आणि दीर्घमुदतीचे उद्दिष्ट हे ६०० रुपये असेल. गुंतवणूकयोग्य रक्कम २५ टक्क्यांच्या चार तुकडय़ांत विभागून प्रत्येक घसरणीत या समभागाचा विचार करावा या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला ३२५ रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा..

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2018 1:02 am

Web Title: bse nse nifty sensex 62
Next Stories
1 पैल तो गे काऊ कोकताहे
2 घरभाडे उत्पन्नातील तोटय़ाची वजावट फक्त दोन लाखांपर्यंतच!
3 माझी जोखीम क्षमता जास्त आहे – खरंच?
Just Now!
X