|| आशीष अरविंद ठाकूर

येणाऱ्या दिवसात आपण मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक अनुभवणार आहोत आणि तिचे वरचे लक्ष्य सेन्सेक्स-निफ्टीवर अनुक्रमे ३५,८०० / १०,८०० असे असेल, असे गेल्या आठवडय़ात या स्तंभातून सुचविले गेले होते. तथापि हे लक्ष्यही सहजासहजी गाठले जाणार नाही, या इतक्याशा वाटेतही घातक चढ-उतार दिसून येतील, असेही सुचविले गेले होते.

येणाऱ्या दिवसातील हे चढ-उतार पुढीलप्रमाणे असतील. निर्देशांक ३४,००० / १०,२०० चा आधार घेत वाटचाल करतील आणि त्यांचे प्रथम लक्ष्य हे ३५,२०० /१०,५५० ते १०,६०० असेल. या स्तरावरून एक संक्षिप्त घसरण ही ३४,४०० /१०,३५० ते १०,४०० पर्यंत असेल. गेल्या वेळच्या लेखातील या संकेतांना कसोटीवर तपासता, सरलेल्या बुधवारी दिवसांतर्गत सुखद तेजी अवतरली आणि पहिले वरचे उद्दिष्ट ३५,२००/ १०,६०० गाठले गेले. पण हा स्तर राखण्यात निर्देशांक अपयशी ठरून अभिप्रेत असलेल्या घातक उताराला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया.

शुक्रवारचा बंद भाव-

  • सेन्सेक्स : ३४,३१५.६३
  • निफ्टी : १०,३०३.५०

येणाऱ्या दिवसात निर्देशांक सातत्याने ३२,५०० / १०,००० चा स्तर राखण्यात यशस्वी ठरल्यास निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य हे ३५,२०० / १०,६०० आणि त्यानंतर सेन्सेक्सवर ३५,८०० ते ३६,५०० आणि निफ्टीवर १०,८०० ते ११,००० असे असेल.

सोन्याचा किंमत-वेध

सोन्याच्या भावाने आपले प्रथम वरचे उद्दिष्ट रु. ३२,३०० हे गेल्या सोमवारी गाठले. येणाऱ्या दिवसात सोन्याचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बँड) हा रु. ३१,५०० ते रु. ३२,३०० असेल. ३२,३००च्या सकारात्मक वरच्या छेदाचे प्रथम उद्दिष्ट हे ३२,६०० रुपये व नंतर ३२,९०० रुपये असेल. जोपर्यंत सोन्याचे भाव ३०,८०० रुपयांचा स्तर राखून आहेत, तोवर सोन्यात तेजी कायम आहे हे गृहीत धरावे. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित)

आयसीआयसीआय बँक

(बीएसई कोड – ५३२१७४)

शुक्रवारचा बंद भाव – रु. ३१५.४५

विविध वित्तीय सेवा पुरवणारी देशातील ही एक अग्रेसर बँक. आयसीआयसीआय बँकेच्या समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बँड) हा रु. ३०० ते ३२५ आहे. रु. ३२५ च्या स्तरावर शाश्वत तेजी सुरू होऊन अत्यल्प मुदतीचे प्रथम उद्दिष्ट हे रु. ३५० असेल. त्यानंतर रु. ३७५ हे दुसरे उद्दिष्ट असेल. दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट हे ४५० रुपये असेल. सध्या निर्देशांकात घातक उतार चालू असल्याने गुंतवणूकयोग्य रक्कम एकदम न गुंतविता, २५ टक्क्यांच्या चार तुकडय़ांत विभागून प्रत्येक घसरणीत या समभागाचा विचार करावा. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला २५० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.