|| आशीष अरविंद ठाकूर

सरलेल्या सप्ताहाच्या सुरुवातीच्या दिवसांत निदान सकाळी तरी निफ्टीवर सुखद अशी शतकी अंशांची तेजी अवतरताना दिसत असे. पण सप्ताहाच्या अखेरच्या दोन दिवसांत, निफ्टीवर  प्रत्येक दिवशी शतकी अंशांची घसरण होऊन, या निर्देशांकाने १०,००० चा स्तर कसाबसा राखल्याचे दिसले आहे. यावर वाचकांना ‘गेली तेजी कुणीकडे’ असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. येत्या दिवसात निफ्टीवर १०,००० चा स्तर राखला जाईल काय, हा सध्या कळीचा प्रश्न आहे. या स्तंभातील अगोदरच्या लेखातील वाक्याचे प्रत्यंतरदेखील बाजार आपल्या चालीने सध्या करून देत आहे. पडझडीनंतरची सुधारणा / तेजी ही सहजासहजी न येता ती घातक चढ उतारांनी युक्त असेल आणि ही सुधारणा ‘मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक असेल’ या चालीचा प्रत्यक्ष प्रत्यय आपण घेतलाच आहे. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या..

शुक्रवारचा बंद भाव –

  • सेन्सेक्स :       ३३,३४९.३१
  • निफ्टी :      १०,०३०.००

या आठवडय़ात सेन्सेक्स ३३,०००/ १०,००० चा स्तर राखण्यात यशस्वी ठरल्यास मंदीला तात्पुरता अटकाव होऊन क्षीण स्वरूपाची सुधारणा ( रिलीफ रॅली) अपेक्षित आहे जिचे  वरचे प्रथम लक्ष्य हे ३३,६५० ते ३४,४०० / १०,२५० ते १०,४०० असे असेल आणि नंतर ३५,६००/१०,७०० असे असेल.

या उलट येणाऱ्या दिवसात निर्देशांक सातत्याने ३२,५०० / ९,९५० च्या स्तराखाली राहिल्यास प्रथम खालचे लक्ष्य हे ३१,५०० / ९,८०० आणि त्यानंतर ३०,९०० / ९,५०० असे असेल.

सोन्याचा किंमत-वेध

मराठीत एक म्हण आहे.. पंत मेले राव चढले. ही म्हण आजच्या सोने आणि शेअर बाजार निर्देशांकाच्या संबंधांवर तंतोतंत लागू पडते. एका बाजूला निर्देशांक मरणासन्न अवस्थेत आहे तर सोन्याची चढती कमान कायम आहे. येणाऱ्या दिवसांत सोन्याचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु. ३१,७०० ते रु. ३२,३०० असेल. ३२,३०० रुपयांच्या सकारात्मक वरच्या छेदाचे प्रथम उद्दिष्ट हे ३२,६०० रुपये आणि नंतर ३२,९०० रुपये असेल. जोपर्यंत सोन्याचा भाव ३१,००० रुपयांचा स्तर राखून आहे तोपर्यंत सोन्यावर तेजी कायम आहे हे गृहीत धरावे. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित)

बायोकॉन लिमिटेड

  • (बीएसई कोड – ५३२५२३)
  • शुक्रवारचा बंद भाव – रु. ६०४.०५

कर्करोग, मधुमेह या व्याधींवर औषध बनवणारी आणि निर्यात करणारी बायोकॉन ही आघाडीची कंपनी. बायोकॉन लिमिटेड कंपनीच्या समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा ५७५ ते ६५० रुपये आहे. ६५० रुपयांच्या स्तरावर शाश्वत तेजी सुरू होऊन अत्यल्प मुदतीचे प्रथम उद्दिष्ट हे ६८० रुपये असेल. त्यानंतर ७१५ रुपये हे दुसरे उद्दिष्ट असेल. दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट हे ८०० रुपये असेल. सध्या निर्देशांकात घातक उतार चालू असल्याने गुंतवणूकयोग्य रक्कम एकदम न गुंतवता २५ टक्क्यांच्या चार तुकडय़ांत विभागून प्रत्येक घसरणीत या समभागाचा विचार करावा. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला ५४० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.