13 August 2020

News Flash

दोघांचं भांडण, अन्..

भाजपची तीनही राज्यांतून सत्ता गेल्यामुळे, गेल्या लेखात मांडलेली तिसरी शक्यता बाजारात प्रत्यक्षात आली.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| आशीष अरविंद ठाकूर

भाजपची तीनही राज्यांतून सत्ता गेल्यामुळे, गेल्या लेखात मांडलेली तिसरी शक्यता बाजारात प्रत्यक्षात आली. ती म्हणजे.. सेन्सेक्सने ३५,२५० व निफ्टीने १०,५५० चा भरभक्कम आधार तोडला आणि निर्देशांक अनुक्रमे ३४,४२६ आणि १०,३३३ पर्यंत (त्या क्षणापुरता का होईना) गडगडले. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया.

शुक्रवारचा बंद भाव:

  • सेन्सेक्स : ३५,९६२.९३
  • निफ्टी : १०,८०५.५०

गेल्या आठवडय़ातील नाटय़मय घडामोडीत निर्देशांकानी सेन्सेक्सवर ३३,२९० आणि निफ्टीवर १०,००० चा स्तर राखत चढत्या भाजणीतील नीचांक (हायर बॉटम) अनुक्रमे सेन्सेक्सवर ३४,४२६ आणि निफ्टीवर १०,३३३ नोंदवून सुखद धक्का तर दिलाच, पण भविष्यात निर्देशांकाची वाटचाल ही सेन्सेक्सवर ३६,००० व निफ्टीवर ११,००० च्या दिशेने होण्याची शक्यताही यातून निर्माण झाली. आताच्या घडीला एक संक्षिप्त घसरण ही सेन्सेक्सवर ३५,५०० ते ३५,२५० आणि निफ्टीवर १०,६५० ते १०,५५० पर्यंत असेल, या स्तराचा आधार घेत निर्देशांक पुन्हा ३६,०००/११,००० वर झेपावेल. कारण या थंडीत अर्थव्यवस्थेसाठी मात्र उबदार वातावरण निर्माण होत आहे. औद्योगिक उत्पादन दर हा ८.१ टक्यांवर झेपावला, जो गेल्या ११ महिन्यातील उच्चांकी स्तर आहे. किरकोळ किमतींवर आधारित महागाई दरही तीन टक्क्यांखाली आला. या सर्व  आशादायक घटकांमुळे येणाऱ्या दिवसात कर्जावरील व्याजदर कपातीची शक्यता वाटते. त्याच वेळेला निर्देशांक आपले वरचे लक्ष्य सेन्सेक्सवर ३७,३०० व निफ्टीवर ११,२०० गाठेल.

आज आपण आंतरराष्ट्रीय व्यापारयुद्धाचे भारतावर होणारे परिणाम व त्यातून निर्माण होणारी गुंतवणुकीची लाभार्थी क्षेत्रे जाणून घेऊया. अमेरिका व चीन या दोघांच्या भांडणामुळे –  व्यापार युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहेत. पण वाइटातून चांगलं म्हणजे.. खनिज तेल स्वस्त झाले आहे, चलन विनिमय दरात रुपया सशक्त बनला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेवरचा ताण तात्पुरता निवळला आणि नवीन व्यापाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. भारताकडून चीनला वाढीव प्रमाणात बासमती तांदूळ, साखरेची निर्यात सुरू झाली आहे. त्यामुळे एलटी फूड, धामपूर शुगर, बलरामपूर चिनी हे समभाग प्रकाशझोतात आले आणि ते पुढेही राहतील.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञ सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2018 12:59 am

Web Title: bse nse nifty sensex 82
Next Stories
1 गुंतवणूक कर-बचतीसाठी करताना..
2 ‘एफएमपी’ एक सुरक्षित आणि कर कार्यक्षम गुंतवणूक साधन
3 गुंतवणूकदारांचे ध्यान-आकर्षण, पुन्हा एकवार!
Just Now!
X