|| आशीष अरविंद ठाकूर

सरलेल्या आठवडय़ात निर्देशांकात गुरुवापर्यंत दिवसांतर्गत घसरण व्हायची, पण ती क्षणिक ठरून दिवसाचा बंद हा आशादायक असायचा, पण शुक्रवारी मात्र अपेक्षित असलेली मध्यकालीन घसरण आली या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया.

शुक्रवारचा बंद भाव:

  • सेन्सेक्स : ३५,७४२.०७
  • निफ्टी : १०,७५४.००

येणाऱ्या दिवसात निर्देशांकांना-  सेन्सेक्सवर ३५,५०० ते ३५,१५० आणि निफ्टीवर १०,६५० ते १०,५५० हा भरभक्कम आधार असेल. या स्तरावर निर्देशांक थोडी विश्रांती घेऊन, पायाभरणी करून निर्देशांक आपले वरचे लक्ष्य सेन्सेक्सवर ३७,३०० व निफ्टीवर ११,२०० साठी सज्ज होईल, यासाठी आर्थिक आघाडीवर पूरक, असे वातावरण तयार होत आहे ते खालीलप्रमाणे-

रिझव्‍‌र्ह बँक व सरकारमधील संघर्ष निवळण्यास सुरुवात झाली आहे. सरकारी बँकांना त्यातही कमकुवत सरकारी बँकांना ८३,००० कोटींचे वाढीव अर्थपुरवठय़ाच्या दिशेने पावले पडत आहेत. तसेच त्वरित सुधारात्मक कृती (पीसीए) आराखडय़ाबाबत शिथिलता येण्याची शक्यता आहे. दोन-तीन कमकुवत/अशक्त बँकांचे एका सशक्त बँकेत विलीनीकरण करून एका सशक्त बँकेच्या निर्मितीसाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. खनिज तेलाचे आंतरराष्ट्रीय दर कोसळत आहेत तसेच भारत हा खनिज तेलाचा मोठा ग्राहक असल्याने भारताला सवलतीच्या दरात तेलपुरवठा करावा, अशी मागणी भारताने तेल उत्पादक राष्ट्रांकडे केली आहे. औद्योगिक उत्पादन दर हा ८.१ टक्क्यांवर नोंदवला गेला, किरकोळ किमतीवर आधारित महागाई दरही तीन टक्क्यांखाली आला आहे, चलन विनिमय दरात हळूहळू रुपया सशक्त होत आहे.

एकंदरीत आर्थिक आघाडीवर सुंदर, आकर्षक असा नाताळचा केक तयार होत आहे. एकदा का सरकार व व्यापारी वर्गाला हवी असलेली कर्जावरील व्याजदर कपातीची चेरी लावली की हा..हा.. म्हणता सेन्सेक्सवर ३७,३०० आणि निफ्टीवर ११,२००चा पल्ला गाठलाच म्हणून समजा.

सीजी पॉवर लिमिटेड

  • (बीएसई कोड – ५०००९३)
  • शुक्रवारचा बंद भाव – रु. ४३.३५

ऊर्जा व विद्युत वाहनातील ट्रान्सफार्मर, स्विचगीअर बनवणारी सीजी पॉवर ही आघाडीची कंपनी. सीजी पॉवर समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा हा रु. ३६ ते रु. ४४ आहे. रु.४४ च्या स्तरावर शाश्वत तेजी सुरू होऊन अत्यल्प मुदतीचे प्रथम लक्ष्य हे रु. ४८ व त्यानंतर रु. ६०चे लक्ष्य असेल. दीर्घ मुदतीचे लक्ष्य हे रु. १०० असेल. गुंतवणूकयोग्य रक्कम २५ टक्क्यांच्या चार तुकडय़ांत विभागून प्रत्येक घसरणीत या समभागाचा विचार करावा या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला रु.३०चा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.